[ १४ ] अलीफ . २६ आगष्ट १६६६.
आपले बराबरीचे राजात श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर, काबील कुल महत्कृपेचें पात्र, मुसलमानी धर्मरक्षक, शिवाजी राजे यांणीं बादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावें कीं - सांप्रत तुमचें पत्र बहुत नरमाईचें राजे जैसिंग यांचे भेटीबद्दल कळलें. कृत्य माफ व्हावें ह्मणोन घेतलेयाचें पाहून गोड ध्यानास आला. यापूर्वी तुमचे मनांतील हाशील सरकार कामगारांनी समजाविलें होतें की, तुह्मीं आपले कृत्यांचा पश्चाताप करुन, या दौलतीचे आश्रयास येऊन, तीस किल्ले आपणाकडील इकडील कामगाराचे स्वाधीन करुन, बारा किल्ले व त्यांजखालील मुलूक एक लक्ष होनांचा निजामशाहीचे किल्ले व मुलूक पैकीं, त्याचप्रकरें आणखी चार लक्ष होनांचा मुलूक तळकोंकणांतील विजापूरकरांचे इलाख्याचा जो हालीं तुह्माकडे चालूं आहे, व पाच लक्ष होनाचा मुलूक बालेघाटपैकीं, विजापूरचे इलाख्यापैकी, येणेप्रमाणें एकदराचा फर्मान बादशाही मागता व चाळीस लक्ष होन दरसाल तीन लक्षप्रमाणे पेशकसीबद्दल देऊ ह्मणता ऐशीयास, तुमच्या गोष्टी ज्या तुह्मीं तूट अंदेशा न पाहतां केल्या त्या माफीजोग्या नाहीत तथापि राजे जैसिग यांणी लिहिल्यावरुन ते सर्व माफ करुन तुमच्या मनोरथाप्रमाणे बारा केले ( देतो ) त्याचा त्यांचा तपशील खालीं लिहिला आहे व त्यांच्या खालचा मुलूक देऊन आणखी हुकूम केला आहे कीं, जो मुलूक नऊ लक्ष होनाचा त्यापैकी चार लक्ष होनाचा तळकोकणपैकी विजापूरकराचे इलाख्यापैकी हालीं तुह्मांकडे चालत आहे तो बदोबस्ताकरिता इकडील सरकारात आला. सबब, बालेघाटीं पांच लक्षाचा मुलूक, विजापूर आमचे हाती येईल त्या आधीं तुह्मी त्याजकडून घेतल्यास व चांगले फौजेसुद्धा राजे जैसिंग यास मिळोन बादशाही कामांत याचे मर्जीप्रमाणें कोशीस केल्यास, विजापूर फत्ते जाल्यानंतर तुह्मीं पेशकसीचे ऐवजाचा भरणा केल्यास, तुह्माकडे बहाल ठेवू. हाली आमचे चिरंजीवास पांच हजारी मनसब व पांच हजार स्वार - कीं एकएकाचीं दोन दोन तीन घोडीं असावी- याप्रमाणें देऊन, तुह्माकरितां पोषाख पाठवून, हा फरमान आपले पंज्याच्या चिन्हासुद्धां पाठविला आहे तरी तुह्मीं इकडील लक्षात वागोन, बादशाही काम लहान मोठेसुद्धां करुन, हें सर्व आपले ऊजिताचीच गोष्ट असें समजत जावें. छ ५ रबिलावल, सन ८ जुलूस, मु ।। सन १०७७ हिजरी.
किल्ल्यांचा तपशील राजे जैसिंग याचें लिहिल्याप्रमाणें :-
१ | राजगड | १ | तोरणा | १ | लिंगणगड |
१ | भोरप | १ | तळेगड | १ | महाडगड |
१ | घोसाळा | १ | अलवारी | १ | पाल |
१ | उधेदुर्ग | १ | रायरी | १ | कुंवारी |