[ ७ ] अलीफ १४ जुलै १६५९.
आपले बराबरीचे राजांत श्रेष्ठ, सर्व उमरावांत थोर, महत्कृपेस पात्र, मुसलमान धर्मरक्षक शिवाजी यांणीं पादशाही कृपेचे उमेदवार होऊन जाणावें कीं :- ईश्वरें धर्मवृद्धि व न्याय यथास्थित होण्याबद्दल व जुलूम पृथ्वींतून नष्ट होण्याबद्दल आह्यांस जय होऊन, जे शत्रू धर्म व दौलत याविषयीं उदासीन होते त्यांस पादाक्रांत करुन, छ २४ रमजान रोज रविवार या दिवशीं आह्मांस सिंहासनाधीश्वर केलें. त्या प्रभूचा बहुत उपकार मानितों. तुमची अर्जदास्त अशा संतोष समयांत पावून मजकूर ध्यानांत आला. ऐशियांस तुह्मीं इकडील लक्षांत वागतच आहां, त्याअन्वयें वागून खैरखाही करीत जाणें. हालीं दक्षिणेकडील सुभ्याचे कामावर उमदेतुलमुलूक अमीरुलउमराव ह्मणोन जावयाची योजना करुन तेथील सर्व लोकांचा बंदोबस्त त्यांजकडे सांगितला आहे. तरी तुह्मींही त्याचे सलेंत वागून, वारंवार कोशीस करुन जसें पूर्वींचे बोलणे त्याप्रमाणें अमलांत आणावें. या काळीं ईश्वरकृपेनें जे मनोरथ होते ते मुलूक व दौलत येविषयीचे सिद्ध होऊन कोणतीही इच्छा राहिली नाहीं. जे जे शत्रू इकडील अपकर्षणाची वासना धरीत होते, ते ते आपले केलेले कर्मांचें शासन पावून शेवटीं मुलाबाळासुद्धां बाहेकाराचे सरहद्दीत हस्तगत जाले. ते लवकरच शिक्षाही पावतील. तुह्मीं इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असें जाणून लक्षांत वागोन कृपेचें इच्छीत असावें. तुह्मांकरितां येथून पोषाख पाठविला आहे हा घ्यावा. छ. ४ जिल्काद, सन १ जुलूस, सन १०६९ हिजरी.