[ ६ ] अलीफ २४ फेब्रुवारी १६५८
आपले बराबरीचे मंडळींत श्रेष्ठ, सर्व उमराव लोकांत श्रेष्ठ, महत्कृपेस पात्र, बादशाही कृपेस योग्य, शिवाजी भोसले बादशाही कृपेस आपला सत्कार मनांत आणून समजोत कीं - तुमची अर्जदास्त कृष्णाजी भास्कर पंडित यांच पत्रांसुद्धां रघुनाथपंत वकील यांबरोबर पाठवून ( दिलेली पाहून ) मजकूर ध्यानास आला. यद्यपि तुमच्या पेशजीच्या गोष्टी विसरावयाजोग्या नाहींत, तथापि तुह्मी आपले कृतकृत्यांचा पश्चात्ताप केला आणि हा दरबार उपेक्षेचा नाही जाणोन, वडिलांचें लक्ष निभ्रांत इकडे आहे असें समजोन, तुमचें पूर्वकृत्य मनांत आणीत नाहीं. येविषयींचा संतोष मानून, इकडील दौलतीविषयीं कोशीस करीत जावी. आपले " वतनी माहाल, किल्ले व कोकण देशसुद्धां नगरवाले खेरीज विजापूरकर आदिलखानाचे इलाख्यांत जे आहेत ते त्यांजकडून मुलूक हस्तगत जाल्यानंतर बंदोबस्त होण्याविषयी वचन असावें, ह्यणजे लोनोपंत यांस हुजूर पाठवितों आणि इकडील लक्षांत वागून सरकारी मुलुकाची सरहद्द रक्षण करुन कामदाराशीं परीक होतो कीं ज्यायोगें बंड वगैरे बखेडे न होवोत, ह्यणोन लिहिलें. त्यास, तुह्यीं लिहिल्याअन्वयें वर्तून हा फर्मान पाहातांच आपले मजकुराची अर्जी लेहून सोनोपंताबरोबर पाठवून देणें. ह्यणजे त्याप्रमाणें केलें जाईल. जाणोन लक्षांत वागोन आमचे लोभाची पूर्णता समजावी. छ १ माहे जमादिलाखर, सन १०६८ हिजरी.
ताजा कलम - महाराज जसवंतसिंग व कासमखान हे उभयता इकडील फौज आलीशी समजोन उज्जनीहून सहा कोस पुढे लढाईचें इराद्यानें आले होते. परंतु ईश्वरकृपेनें इकडील शूर अस्सल, लौकिकी सहा सात हजार स्वार त्यांजकडील कामास येऊन शेवटीं पळूं लागले. त्यांजकडीस खजीना व तोफखाना व हत्ती वगैरे बहुत कारखाने लुटले गेले. ईश्वरें अशा त-हेनें आमची फत्ते करविली. पुढें आणखी नाना प्रकारचें जें सर्वास संतोषदायक व शत्रूस पादाक्रांति देणार असें सत्वरच होईल. तुह्मीं याविषयींचा संतोष मानून इकडील लक्षांत राहून कल्याणाचे उमेदवार असावें. रा । छ मजकूर.