[ ५ ] अलीफ २३ एप्रिल १६५७
सर्व उमरावांत श्रेष्ठ, आपले बराबरीचे मंडळींत थोर, नाना प्रकारचे कृपेस पात्र, शिवाजी भोसले, बादशाही कृपेस पात्र, कृतकृत्यता पावून जाणोत कीं तुमची अर्जदास्त इकडील पंज्याचे निशाणाचे फर्मान पोहोचल्यानंतर चिट्टी पावली. हरएकविषयीं जें सांगणें तें तुह्यांकडील वकील सोनाजी यांजपाशी सांगितलें. त्याणीं तुह्यांसी बोलोन खातरजमा केलीच असेल- सांप्रत जे किल्ले व मुलूक विजापूरकरांकडील तुमचे हातीं होते ते पेशजीप्रमाणें होऊन तुमचे मनोगताअन्वयें बंदर दाभोळ व त्याजखालील मुलूख तुह्यांस दिल्हा असे. ऐशीयास, इकडील दौलतीची किफायत मदत जी करणें असेल तिचा समय हाच आहे, जाणोन करण्यांत आणावें, आणि हुजूर भेटीस यावे. याखेरीज जे मतलब तुमचे मनांत असतीलं ते सर्व घडोन येतील. हालीं तुमचे वकील यांस परत जाण्याची जलदी होती, सबब निरोप दिल्हा आहे. त्यांचे जबानीं इकडील लक्ष दिसोन दिवस तुमचा उत्कर्षाचा करण्याचा वगैरे सर्व ध्यानांत येईल. याजकरितां इकडील दौलतीचे लहान मोठे कामाकाजाची तर्तूज आपले ऊर्जिताचें कारण समजून करीत जावी व वारंवार इकडील कृपेचें इच्छित असावें सांप्रत ईश्वरकृपा व आमचें दैवशालित्व व फौजेचे शेरपणा यानीं इकडील वाईट इच्छिणार नाहीसे जाले. दिवसानुदिवस इकडे जय येत चालला. तो असा कीं, किल्ला बेदर हा मोठा मजबूत, आजपावेतों त्यास कोणीच सर केला नव्हता, व कोणाचे मनांत कल्याणदेखील सर करावयाची येत नव्हतीं, तो एकंदर दक्षण व कर्नाटक देशाचा दरवाजा. तो एक दिवसांत हस्तगत जाला. इतरांसी वर्षांचीं वर्षेही वश जाला नाहीं. ईश्वराचें सर्व कृत्य । इकडील प्रतापशूरांचे शौर्यामुळें तुह्मीं येविषयींचा संतोष मानून, वरचेवर जसे आमचे जय होतील तसे त्या संतोषाचे वर्तमानावर कान ठेवीत जाणें, आणि आमचा लोभ पूर्ण आहे असें मानीत जाणें. छ १८ रजब सन ३१ जुलूस, सन १०६७ हिजरी.