[ ४ ] अलीफ ३० नोव्हेंबर १६४९
नानाप्रकारच्या स्नेहकृपेस योग्य, महत्कृपेचें पात्र, उत्तम उमदेपणास लायक, शिवाजी भोसले याणीं बादशाही कृपेची इच्छा करुन जाणावें कीं तुमचें पत्र राघोपंत याजबराबर पाठविलें, तें पावलें, आणि बादशाही कृपेस कारण जालें. जुन्नर व अमदानगर येथील देशमुखीविषयीं लिहिलें, त्यास, आह्मी हुजूर गेल्यानंतर हा मजकूर घडोन येईल. खातरजमा ठेवावी. परंतु आपणाकडील एक वकील पाठवून द्यावा. ह्यणजे मजकूर समजून घेऊन अमलांत येईल. व वकीलास जो मजकूर विचांरू त्याचें उत्तर द्यावें, ह्यणजे काम होण्यास दिरंग लागणार नाहीं. जाणोन उद्योग करावा आणि लोभ पूर्ण जाणावा. छ ५ जिल्हेज, सन ५३ जुलूस, सन १०५९ हिजरी.