[ ३ ] अलीफ ३० नोव्हेंबर १६४९
उमरावी सरदारीच्या योग्यतेचे, शूर पराक्रमी, दौलतीचे उत्तम अभीष्टचिंतक, राजनिष्ठशिरोमणी, महत्कृपेस पात्र शाहाजी भोसले यांणीं बादशाही कृपेस आपला सत्कार जाणोन समजावें कीं तुमचे पुत्र शिवाजी यांणीं अर्जदास्त हुजूर येण्याविशीं पाठविली. ती पावून कृपेस कारण जालें. पेशजीच्या गोष्टी मनांत न आणितां तुमची मोकळीक करण्याविषयीं लिहिलें आहे. त्यास हालीं आम्हीं दिल्लीकडे जात आहों. परंतु तुम्हांस खुषखबर देतों कीं तुम्ही सर्व प्रकारें खातरजमा ठेवावी. जे आम्हीं हुजूर पावलियावरी तुमचे मजकुराविषयीं अर्ज करुन बंदोबस्त करुन देऊ परंतु तुम्हीं आपला एक वकील इतबारी पाठवून द्यावा. म्हणजे त्यासमागमें फर्मान कौलाचे पंज्याचे निशाणसुद्धां पाठविण्यांत येईल. आणि तुमचे चिरंजीव संभाजी वगैरे सरकारकृपेस पात्र होऊन पेशजीप्रमाणें मनसबा व नूतन सरफराज पावतील. इकडील स्नेहांत व इकडील लक्षांत वागणें हें सर्व आपले मनोरथ पूर्ण करुन घेण्यास कारण आहे. ह्यणोन तसें वागोन खातरजमा ठेवावी. आणि तुह्याकरितां पोषाख पाठविला हा घेऊन आपणावर पूर्ण लोभ आहे असें मनांत आणावें. छ ५ माहे जिल्हेज, सन २३ जुलूस, सन १०५९ हिजरी.