प्रस्तुत खंडांत श्रीमंत गगनबावडेकर यांच्या दप्तरांतील इ. स. १७२८ पर्यंतचे लेख येतील. पैकीं कांहीं लेख थोरले शिवाजी महाराज ह्यांच्या कारकीर्दीतील आहेत. बावडेकर यांचे पूर्वज सोनोपंत, निळो सोनदेव व रामचंद्र नीळकंठ ह्या तिघांच्या हयातींत शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, दुसरा शिवाजी व कोल्हापूरचा संभाजी इतक्या पुरुषांच्या कारकीर्दी येतात; व ह्या तिघांनीं ह्या सर्व छत्रपतींच्या अमदानींत मोठमोठीं हुद्यांचीं व जोखमींचीं कामें केलेलीं आहेत. तेव्हां श्रीमंत बावडेकर ह्यांचें दप्तर मूळचें मोठें महत्त्वाचें असेल ह्यांत संशय नाहीं. परंतु इतरत्र जो प्रकार पहाण्यांत येतो त्याला अनुसरूनच ह्या दप्तरांतीलही बहुत किंवा बहुतेक जुने कागदपत्र अजीबात गहाळ होऊन गेलेले आहेत.
त्यांतून जे कांहीं थोडेसे शाबूत राहिले होते ते सध्यां प्रसिद्ध होत आहेत. प्रसिद्ध होत असलेल्या ह्या पत्रांत महदानंदाची गोष्ट इतकीच कीं, शिवाजी महाराजांची कांहीं अस्सल पत्रें प्रथमतः जगापुढें आणण्याचें श्रेय ह्या आपल्या पिढीला मिळत आहे. आजपर्यंत शिवछत्रपतींची दोन तीन पत्रेंच काय तीं छापलीं गेलीं होतीं. त्यामुळें बखरींतून व मुसलमानी तवारिखांतून दिलेलें शिवाजीचें चरित्र अजमावून व पडताळून पहाण्यास बहुतेक कांहींच साधन नव्हतें. श्रीमंत बावडेकर ह्यांच्या दप्तरांतील पत्रांवरून व इतरत्र मिळालेल्या लेखांवरून हें साधन आतां- संपूर्ण किंवा समाधानकारक तर नव्हेच - परंतु थोडेंबहुत सिद्ध होण्याच्या रंगास आलें आहे. ह्या खंडांतील हीं पत्रें व पुढील एक दोन खंडांतींल पत्रे मिळून शिवकालीन राज्यपद्धतीवर व लोकस्थितीवर बराच प्रकाश पडेल असा अजमास आहे. ह्या पत्रांचे जर फोटोझिंको काढतां आले असते तर सतराव्या शतकांतील मोडी लिहिण्याचाहि मासला वाचकांना पहावयास मिळता; व हेमाडपंतानें महाराष्ट्रांत मोडी लिहिण्याचा प्रघात मूळ पाडला तेव्हांपासून आतांपर्यंत ह्या लिहिण्यांत काय काय फेरबदल होत आले तेही कळण्यास मार्ग झाला असता. परंतु अनेक गोष्टींच्या अभावामुळें तसें सध्यां करतां येत नाहीं. हा व पुढील एक दोन खंड ह्यांची मिळून एकच प्रस्तावना लिहिण्याचा संकल्प केला असल्याकारणानें प्रस्तुत खंडांतील पत्रांना अर्थनिर्णायक, प्रसंगविवेचक व अवांतर टीपा देण्याच्या भानगडींतहि सध्यां पडत नाहीं. मुख्य प्रस्तावनेंतच एकंदर सर्वप्रकारचा उलगडा करण्याचा मनोदय आहे. कां कीं प्रस्तुत छापिलीं जाणारीं पत्रें आतांपर्यंत छापिलेल्या इतर पत्रांहून फारच निराळ्या प्रकारचीं आहेत. ज्या काळीं महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाला प्रारंभ झाला, शिवस्वरूपी प्रौढप्रतापदिनकराच्या तेजानें हा देश देदीप्यमान झाला, आणि श्रीमत् समर्थादि थोर विभूतींच्या अरुणोदयानें ह्या देशांतील सर्व समाज खडबडून जागा झाला, त्या काळच्या पत्रव्यवहाराचा परिचय मोठ्या पूज्यभावानें व अदबीनें केला पाहिजे. मनुष्यप्राण्याच्या इतिहासांत अत्यंत जुने ग्रंथ म्हटले म्हणजे वेद हे होत. त्याप्रमाणेंच महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाचे अत्यंत जुने व महत्वाचे दाखले म्हटले म्हणजे प्रस्तुतचे हे लेख होत. अर्वाचीन महाराष्ट्राच्या संस्कृतीचें सर्व बीज ह्या लेखांच्या मार्मिक अध्ययनापासून कळणारें आहे. तेव्हां ह्या लेखांसंबंधीं किंवा ह्या लेखांवरतीं जें कांहीं व्याख्यान करावयाचें असेल तें, मिळण्यासारखी जेवढी म्हणून माहिती मिळवितां येईल तेवढी सर्व एकत्र संकलित केल्यानंतर, अत्यंत दक्षतेनें व जपून करणें जरूर आहे. केवळ दहा पांच तुटक लेख घेऊन त्यावर टीपा देण्यानें प्रस्तुत प्रसंगीं काम भागणार नाहीं. भाषा, व्यवहार, राजकारण, विद्या, कला, कारखाने, दरबार, पद्धती, मायने, किल्ले, लष्कर, लढाया, तह, वगैरे अनेक बाबींसंबंधीं ह्या पत्रांवरून किती अनुमानें निघतील, किती शंका उद्धवतील व कदाचित् किती वाद माजतील ह्याचा अंदाज सध्यांच करतां येत नाहीं. तेव्हां हीं पत्रे व पुढील एक दोन खंडांतील पत्रे प्रसिद्ध होऊन मर्मज्ञ टीकाकारांचें त्यांवर काय म्हणणें पडतें हें पाहिल्यानंतर त्यासंबंधीं जें कांहीं व्याख्यान करावयाचें तें करावें असा बेत आहे. निरनिराळ्या ठिकाणांहून मिळालेले निरनिराळे लेख स्वतंत्र छापावयाचे आहेत. अर्थात् दर एक ठिकाणचीं पत्रें कालानुक्रमानें निराळ्या संचानें छापिलीं जातील.