उपोद्धात
आतापर्यंत 'मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे' पांच खंड छापून प्रसिद्ध झाले. १८९८ सालीं पहिला खंड मीं स्वतःच्या खर्चानेंच छापून काढिला. पुढे लवकरच पुणें येथील चित्रशाळेच्या मालकांनीं चवथा खंड छापून प्रसिद्ध केला. मध्यंतरीं ग्रंथमाला मासिक पुस्तकांतून दुसरा व तिसरा असे दोन खंड प्रसिद्ध झाले, व ते संपूर्ण झाल्यावर पांचवा खंडहि नुकताच पुरा झाला. आतां ह्या अंकापासून ८ व्या खंडास प्रारंभ करावयाचें योजिलें आहे. मधले दोन खंड म्हणजे सहावा व सातवा-दोघा तिघा सद्गृहस्थांनीं स्वतःच्या खर्चानें छापून प्रसिद्ध करण्याचें काम अंगावर घेतलें आहे. सहावा खंड श्रीमंत माधवराव विनायक किबेसाहेब व रा. रा. श्री. वि. आठल्ये ह्या दोन गृहस्थांनीं प्रसिद्ध करण्याचें योजिलें आहे व सातवा खंड प्रोफेसर चिंतामण गंगाधर भानू यानीं हातीं घेतला आहे. सहाव्या खंडांत इ. स. १७६१ पासून १७९६ पर्यंतचे व सातव्या खंडांत इ. स. १७४० पासून १७६१ पर्यंतचे लेख प्रसिद्ध होतील. हे सात खंड प्रसिद्ध झाले म्हणजे मराठ्यांच्या इतिहासांतील १७२८ पासून १७९६ पर्यंतचा भाग बराच व्यवस्थित झाला असें म्हणता येईल. बाकी ह्या अवधींतील मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांची यथासांग पूर्तता होण्यास बराच काल लागेल हें उघड आहे. रा. रा. वासुदेवशास्री खरे ह्यांनीं लाविलेलीं मिरज मळ्यांतील पत्रें अद्याप बरींच छापून निघावयाचीं आहेत. तसेंच पुण्यांतील इनाम कमिटीच्या दप्तरांतील रा. ब. वाड यांनीं काढलेले वेंचे अजून बाहेर पडावयाचे आहेत. शिवाय मेणवली येथील नाना फडणीस यांचें दप्तर अद्याप जसेंच्या तसेंच अस्पृष्ट आहे. सारांश, १७२८ पासून १७९६ पर्यंतचा मराठ्यांचा इतिहास निःशंकपणे समाधानानें लिहितां येण्यास अद्यापि बरीच सामग्री जगापुढें आणण्याची तजवीज केली पाहिजे. ही सामग्री बरीच, इतकेंच नव्हे तर, सडकून आहे हें तर सर्वश्रुत आहे. तसेंच, सामग्रीच्या वैपुल्याच्या मानानें तिच्या प्रसिद्धीकरणाचें मान फारच कोतें आहे हेंहि तितकेच सर्वश्रुत आहे. १८९८ पासून १९०२ पर्यंतच्या अवधींत मराठ्यांच्या इतिहासाच्या अश्रुतपूर्व साधनांचे एकंदर दहा भाग प्रसिद्ध झाले – रा. रा. खरे यांचे माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीसंबंधाचे चार भाग; रा. रा. पारसनीस यांच्या ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रव्यवहाराचा एक भाग; व मीं छापिलेले पांच खंड. सबंद पांच वर्षांत इतकी थोडी सामग्री बाहेर यावी, ही कांहीं समाधानकारक स्थिति नाहीं. अज्ञात सामग्रीचे निदान पंचवीस तीस भाग तरी प्रसिद्ध झाले असते, म्हणजे इतिहासजिज्ञासूंचें कांहींसे समाधान झालें असतें. आतां इतकें खरें आहे कीं लिहिणें सोपें असतें व करणे तितकेंच कठिण असतें. ग्रंथ छापून काढावयाचे म्हणजे पैसे लागतात, व ग्रंथाची छपाईदेखील निघण्यापुरते ग्राहक मिळत नाहींत, ही मुख्य ओरड आहे. व ही ओरड सर्वस्वीं खरी आहे. परंतु ही ओरड हजार पांचशें वर्षांत मिटेल असा संभव क्वचित् दिसतो. इतिहासाच्या सामग्रीचे ग्रंथ कोणत्याही देशांत हजारोनें किंवा लाखोनें खपले आहेत असा प्रकार माझ्या तरी ऐकण्यांत किंवा वाचण्यांत कोठें आला नाहीं. तेव्हां आपलें हें महाराष्ट्रच तेवढें ह्या महासिद्धान्ताला अपवादक होत नाहीं; म्हणून मनाला वृथा शीण करून घेण्यांत अर्थ कोणता? मराठ्यांचा इतिहास सशास्त्र बनला पाहिजे हा जर मुख्य हेतु आहे, तर तो साध्य करून घेतांना कोणतीही अडचण जुमानतां कामा नये. पैसे नाहींत, गि-हाईक नाहीं, गुणग्राहक नाहींत, अशी वस्तुस्थिति यद्यपि असली तत्रापि साध्य हेतूच्या आड ती कां यावी हा प्रश्नच आहे. सबंध महाराष्ट्रांत ऐतिहासिक साधनांचे भोक्ते जर दोन तीनशेंच आहेत, तर तेवढ्यापुरत्याच तीनशें प्रती काढल्या म्हणजे विशेष खर्चातही येण्याचें कारण नाहीं. तात्पर्य, कसेंहीकरून व वाटेल ती तजवीज योजून मराठ्यांच्या इतिहासाची सामग्री होईल तितकी लवकर प्रसिद्ध झाली पाहिजे.
ह्या सर्व गोष्टी लक्षांत आणून प्रो. विजापूरकर यांणीं मराठ्यांच्या इतिहासाचीं हीं साधनें प्रसिद्ध करण्याचें काम अंगावर घेतलें आहे. आतांपर्यंत इ. स. १७२८ च्या पुढील काळचीं साधनें थोडींबहुत लोकांपुढें मांडिलीं. यापुढें हजार पांचशें पृष्ठें इ. स. १७२८ च्या पाठीमागील काळच्या म्हणजे शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम व दुसरा शिवाजी ह्यांच्या कारकीर्दीसंबंधींच्या माहितीनें भरून काढण्याचा मनोदय आहे. इ. स. १५५० पासून १७२८ पर्यंतच्या अवधींतील जेवढे म्हणून इतिहासोपयोगी लेख जमा झाले, तेवढे सर्व पुढील दोन तीन खंडांत छापून काढावयाचे आहेत. १७२८ च्या पुढील काळच्या इतिहासासंबंधीं शंभर लेख मिळविण्यास जितकी मेहनत लागते तितकी किंवा त्याहूनही जास्त मेहनत १७२८ च्या पूर्वीच्या इतिहासाच्यासंबंधाचें एक एक चिटोरें मिळविण्यास पुरेशी होत नाहीं. हीं चिटोरीं फार अस्ताव्यस्त पसरलीं असून त्यांच्यावर इतर आधुनिक दप्तरांचीं अनेक दडपणें बसलीं आहेत. कृष्णेच्या पूर्वेस व उत्तरेस औरंगाबादेपासून हरिहर व रायचूर या स्थानांच्या दिशेनें थेट तंजावरापर्यंत शाहाजी महाराजासंबंधींचे कागदपत्र फारशी व मराठी असे सांपडतात. कृष्णेच्या पूर्वेस, पश्चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस, देशांत, मावळांत व कोंकणांत शिवाजी महाराजांसंबंधीं कागदपत्र आढळतात. १७२८ च्या पूर्वीच्या बाकींच्या छत्रपतींचेहि लेख थोडे फार अनेक ठिकाणीं आहेत. हे लेख व्यवस्थितपणें शोधून काढण्यास द्रव्यसाहाय्य व अंगमेहनत सध्यांपेक्षा बरीच जास्त असण्याची अपेक्षा आहे.