(लेखांक ४२) पत्र अस्सल आहे. १६९१ त संताजी घोरपडे सेनापति होता, मानसिंग मोरे हप्त हजारी होता. धनाजी जाधव व हंबीरराव मोहिते हेहि सैन्यांत बड्या हुद्यावर होते. मल्हार दादाजी सरसुभेदार हें नांव मराठ्यांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. अमृतराव बिन तुकोराम निंबाळकर शिवाजीचा नातू होय. विठ्ठल गोपाळ सुभेदार प्रांत जाऊली, हा पुरुष त्यावेळच्या कुशल मुत्सद्यांत गणला जात असे. ह्याच्या शिक्क्यांत विठ्ठलस्य महाबुद्धे अशी अक्षरें आहेत.
(लेखांक ४९) याद नक्कल आहे. ह्या यादींतील हिंदु व मुसुलमान राजांचीं नावें हव्या त्या अनुक्रमानें, हव्या त्या प्रांतांतील, हवीं तितक्या वर्षांची दिलेलीं आहेत. युधिष्ठिरापासून १७०७ पर्यंत कशी तरी याद आणून भिडविली आहे. मोगल बादशाहांची-बाबरापासून अवरंगझेबापर्यंतची-याद बिनचूक आहे, परंतु भोगवट्याची वर्षे चुकलीं आहेत. ह्या यादीच्या शेवटीं अवरंगझेबाचें राज्य जाणार असें भाकीत त्यावेळीं हिंदुस्थानांत प्रचलित झाले होतें तें नमूद केलें आहे. ह्या लेखांकांतील हा भाग इतिहासकाराला अत्यंत महत्त्वाचा आहे.
(लेखांक ५३) १७०५ त धनाजी जाधव सेनापति, हंबीरराव मोहिते सरलष्कर, खंडोजी निकम समशेरबहाद्दर, संताजी पांढरे, शरफन्मुलूख व नेमाजी शिंदे, असे सैन्यांतील बडे हुद्देदार होते. लेख अस्सल आहे.
(लेखांक ६०-६६) हे सात लेखांक अस्सल असून ह्यांत दुस-या शिवाजीने शाहूराजाच्या फितव्याचा प्रतिरोध करण्याची खटपट कशी केली ते लिहिलें आहे.
(लेखांक ७१) ह्या लेखांकांत जातिवंत मराठ्यांचीं कुळें प्रारंभीं दिलीं आहेत. ह्या कुळांतील लोक आपल्या नांवापुढें राजे ही पदवी लावतात.
(लेखांक १६९, १७०, १७१) ह्या अस्सल लेखांत रामराजाची हकीकत आहे.
इतर लेखांविषयीं सध्या विशेष कांहीं लिहिण्यासारखे नाहीं. त्यांचा उपयोग संकलित वृत्तांत लिहितांना व इतर स्थलीं होणार आहे.
(१२) लेखांची विशेष माहिती दिल्यावर, आतां बावडेकरांची कुळकथा द्यावयाची परंतु हें काम बावडे येथील मराठी शाळेचे हेडमास्तर रा. गोरे हे विस्तारानें स्वतंत्र पुस्तकाच्या रूपानें करणार असल्यामुळे, ते येथें न करणें हेच इष्ट आहे.