(लेखांक २८) लेख नक्कल आहे. परंतु शुद्ध आहे. मशरुल अनाम=लोकमान्य. मशहुरल हजरत=राजमान्य.
(लेखांक २९) लेख नक्कल आहे व अविश्वसनीयहि आहे.
(लेखांक ३०) लेख नक्कल आहे.
(लेखांक ३१) नक्कल आहे, शुद्ध आहे. ग्रांट डफ ज्याला दर्यासागर म्हणतो त्याचें खरें नांव दर्यासारंग होतें.
(लेखांक ३२) अस्सल आहे.
(लेखांक ३३, ३४, ३५, ३६) अस्सल आहेत. ३४ व्या लेखांकांत यशवंतराऊ शहाजी हें नांव आलें आहे. यशवंतराव शिवाजीच्या समकालीन होता व त्याच्या बापाचें नाव शिवाजीच्या बापाप्रमाणेंच शहाजी होतें. शहाजी हें फारशी-मराठी नाव सतराव्या शतकांत महाराष्ट्रांत रूढ झालें होतें.
शिवाजीनें पाठविलेल्या व शिवाजीला पाठविलेल्या ह्या ३६ पत्रांपैकीं लेखांक २८ अत्यंत महत्वाचा आहे. ह्या लेखांकांतील सर्व शब्द शिवाजीच्या तोंडचे आहेत. हें पत्र शिवाजीनें सांगितलें व बाळाजी आवजीनें लिहिलें. ह्या पत्राची भाषा कारकुनी नसून साहेबी आहे. शिपाई लोकांनीं अमुक रीतीनें कां वागावें व अमुक रीतीनें कां वागूं नये ह्याची फोड शिवाजीनें शिपायास करून दाखविली आहे. हें पत्र केवळ आज्ञापत्र नाहीं. पत्रांत जरब अतोनात दाखविली आहे; परंतु ती शिपायांच्या हिताची आहे असें आंतील मजकूर वाचून शिपायांनाहि वाटावें असा ह्या पत्राचा रोख आहे. हा हुकूम कारकुनाचा नसून खुद्द साहेबाचा म्हणजे शिवाजीचा असल्यामुळें, सैनिकांच्या आदरास तो विशेष पात्र झाला आहे हें उघड आहे. ह्या पत्रांत मराठी व कुणबी असा भेद केला आहे.
(लेखांक ३७) नक्कल. कयाळनिशी=मापा-याची कारकुनी.
(लेखांक ४०) नक्कल. अस्सलांत प्रधानांचे शिक्के आहेत. शिवाजीचा जसा भूखणकवी होता तसा संभाजीचा महेसदास होता. छंदोगामात्य ही पदवी संभाजीनें ज्या इसमास दिली होती त्याचें मूळ नांव कविकलस होतें. छंदोगामात्य ह्या शब्दाबद्दल ग्रांट डफ छंदगौमात्य असें लिहितो व ह्या शब्दाचा अर्थ Expounder of the Vedas, असा टीपेंत करतो. परंतु ह्या दोन्ही गोष्टी चूक आहेत. शुद्ध शब्द छंदोगामात्य आहे व त्याचा अर्थ सामवेदाध्यायी प्रधान असा आहे. छंदोगामात्य म्हणजे सामवेदी ब्राह्मणांची व्यवस्था करणारा अधिकारी. छंदोगामात्य म्हणजे Expounder of the Vedas हा अर्थ डफनें कोठून आणिला ईश्वर जाणे! ह्या जाड्या विद्वानांना अडचण म्हणून कोठेंच पडत नाहीं. ह्या इसमाची दुसरी पदवी कविकलश होती असें डफ म्हणतो. ह्या शब्दांतील कलश ह्या शब्दावरून तत्कालीन मराठ्यांनीं कलुशा हें प्रख्यात विशेषनाम निर्माण केलें. फारशींत व उर्दूंत कलुशा म्हणजे कुंटण असा अर्थ आहे. कविकलश ह्या नांवांतील कवि हीं अक्षरें गाळून कलश ह्या शब्दाचा कळुशा असा उच्चार थट्टेखोर व मत्सरग्रस्त लोक करूं लागले. कविकलश हा काश्मीरी ब्राह्मण होता. विक्रमांकदेवचरितांत बिल्हणानें आपल्या पूर्वजांची राजकलस, ज्येष्ठकलस, मुक्तिकलस अशीं नांवें दिलेलीं आहेत. त्याच धर्तीचें हें कविकलस नांव आहे. डफ म्हणतों त्याप्रमाणें ही पदवी नाहीं येणेंप्रमाणें कविकलस व छंदोगामात्य ह्मा दोन्हीसंबंधानें डफचीं विधानें निराधार व अज्ञानव्यंजक आहेत. कविकलसाला पंडितराई दिली म्हणून डफ म्हणतो तेंहि निराधार आहे. कारण ह्या लेखांकाच्या खालील पहिली सही मोरेश्वर पंडितरायाची आहे. ह्या पत्रांत बाटविला हा शब्द आला आहे भ्रष्ट=बाट्ट=बाट अशा परंपरेनें बाट हा शब्द मराठींत आला.