(लेखांक १३) पत्र अस्सल आहे. ह्या पत्राच्या सहाव्या ओळीत “पाठवणे” ह्या शब्दाच्यापुढें “व आणखी कांहीं नवल अपूर्व वर्तमान असेल तेंहि लेहोनु पाठवणें,” हें वाक्य घालावें.
जगन्नाथपंत व त्रिंबक वेंकटेश हे हुजूरचे कारकून होते. जगन्नाथपंताचें नांव शिवाजीच्या बखरींत एक दोन स्थळीं आलेलें आहे.
हें पत्र दिल्लीस जाण्याच्या अगोदर लिहिलें आहे. शिवापट्टण म्हणजे पुण्याजवळचें शिवापूर. मिर्जा राजा जयसिंग पुरंधराखालीं होता व त्याच्या पश्चिमेस शिवाजी शिवापुरास होता.
पत्राला श्रीकार नाहीं
(लेखांक १८) हें पत्र अस्सल आहे. शिवाजी विठ्ठल दत्तो सुभेदारास “दंडवत” लिहितो, रामराम लिहित नाहीं. सरनोबत=सेनापति. पत्राला श्रीकार नाहीं.
(लेखांक १९) लेख अस्सल आहे. श्रीकार नाहीं. दिवाळ=भिंत. चिंतामणी=गणपति. जी कोट घेण्याचा ह्या पत्रांत तह केला आहे त्याचें नांव दिलें नाहीं. गणपतीचे देवळास व कुणबिणींच्या घरांस भिंती व कोनाडे करून कोट घेऊन द्यावा, असा पत्राचा आशय आहे. परंतु कोटाच्या नांवाचा उल्लेख केला नाहीं.
(लेखांक २०) हें पत्र अस्सल आहे. ह्यावर जिजाबाईचा फारशी शिक्का आहे, तो बहुशः “जिजिआऊ वालिदा इ राजा सीवाजी,” असा असावा.
(लेखांक २१) पत्र अस्सल आहे. दस्तूर निळो सोनदेवाचें आहे. शिक्का अष्टकोनी असून त्यांत कोठेंहि चंद्रसूर्य नाहींत. शिक्क्याच्या ओळीं पांच आहेत व अक्षरें अगदीं स्पष्ट आहेत. जाबिता तह=आज्ञापत्र.
(लेखांक २२) वरीलप्रमाणें.
(लेखांक २३) पत्र अस्सल आहे. कृष्णाजी त्रिमळ, काशी त्रिमळ, विसाजी त्रिमळ व ह्या त्रिवर्गांची मातुःश्री ह्यांच्याजवळ आग्र्याच्यापुढें मथुरेस शिवाजीनें संभाजीस ठेविलें. कृष्णाजी त्रिमळ शिवाजीबरोबर आधीच आला. काशी त्रिमळ व त्याची आई संभाजीला घेऊन आली. आणि विसाजी मथुरेसच राहिला. विश्वासराऊ हा किताब कृष्णाजीपंताला शिवाजीनें दिला असें दिसतें. बखरींत एक लाख होन बक्षीस दिलें म्हणून म्हटलें आहे तें अतिशयोक्त आहें. वर्क सनद बक्षीस रक्षखाना=खजिन्यांतून पैशाचें बक्षीस देण्याची सनद. श्रीकार नाहीं.
(लेखांक २४) लेख अस्सल आहे. मध्यें कित्येक ठिकाणीं फाटला आहे. श्रीकार नाहीं.
(लेखांक २५) लेख अस्सल आहे. फाटला आहे श्रीकार नाहीं.
(लेखांक २६) लेख अस्सल आहे. शिवाजीनें नारळ व सुपारी ह्यांचा मक्ता केलेला होता असें दिसतें. श्रीकार नाहीं.