(लेखांक ९) हें पत्र अस्सल आहे. अक्षर पहिल्या लेखांकातल्यासारखें जाडे घोसदार आहे. निळो सोनदेउ व रखमाजी शिवदेऊ शिवाजीला साहेब ह्या शब्दानें संबोधतात. त्याअर्थी व इतर पत्रांत हाच शब्द योजिला असल्यानें, शिवाजीचे कारभारी शिवाजीस साहेब या संज्ञेनें संबोधीत असत हें उघड आहे. साहेब म्हणजे His Majesty.
ह्या लेखांकाची तारीख ठरविणें बरेंच घोटाळ्याचें आहे. ह्यासंबंधीं विस्तारानें विवेचन मुख्य प्रस्तावनेंत करावयाचें आहे. हें पत्र खबरनविसाच्या दफ्तरांतील आहे.
(लेखांक १०) हें पत्र अस्सल आहे. हें पत्र सरंजामी म्हणजे ज्याला सध्यां रेव्हेन्यू म्हणतात त्या दफ्तरांतील आहे. अफजलखान व फाजलखान ह्यांना पराजित केल्याच्या सुमारास शिवाजीनें नवे कारभारी केले. त्याच वेळीं निळो सोनदेवास मजमूदार नेमिले.
१६६० च्या नोव्हेंबराच्या पूर्वी मोरोपंत पेशवे त्रिंबक व शिवनेर हे औरंगझेबाचे किल्ले घेण्यात गुंतला होता. तसेंच, ह्या सुमारास सुरगिरी म्हणजे देवगिरी म्हणजे दौलताबाद म्हणजे औरंगाबाद घेण्याचा शिवाजीचा विचार होता.
हें पत्र बावडेकरांच्या दफ्तरांतील अत्यंत महत्त्चाचें आहे. निळो सोनदेव यास मजमूदार नेमिल्याचा हा तह म्हणजे निश्चयलेख आहे. डफ आपल्या इतिहासाच्या सातव्या भागांत अबाजी सोनदेव यास मजमू दिली म्हणून म्हणतो परंतु तें ह्या पत्रावरून निराधार आहे असे दिसतें.
(लेखांक ११) हें पत्र अस्सल आहे. ह्यात अफजलखान अशीं अक्षरें स्पष्ट आहेत. अबदुल, अबदला वगैरे अफजलखानाचीं नावें बखरींतून व पवाड्यांतून आढळतात तीं अपभ्रष्ट आहेत.
हिंदु व मुसुलमान ह्यांचीं इनामें जशीचीं तशी चालवावीं असें ह्या पत्रांत म्हटलें आहे. ह्यावरून जिंकलेल्या प्रांतांतील हिंदूंच्याप्रमाणेच मुसुलमानांचीं इनामें शिवाजी चालवी असें दिसतें.
हें पत्र सरंजामीपैकीं आहे. ह्यावर श्रीकार नाहीं.
(लेखांक १२) हें पत्र अस्सल आहे. मंसरुंल हजरती=मशहूर अलहजरत्. मशर=प्रसिद्ध, मान्य अल्=चा. हजरत्=राजा, स्वामी, साहेब, मशहुरल हजरत = राजमान्य. येणेंप्रमाणें ह्या पत्रांत राजमान्य हा अर्थ एकदां मराठींत व एकदां फारशींत असा दोनदां व्यक्त झाला आहे. मराठींतील राजमान्य राजश्रीप्रमाणें मशहुरल हजरत् हा फारशीतील मायना आहे. तो तीन साडेतीनशें वर्षे प्रचारांत असल्यामुळें, मराठी राजमान्य हीं अक्षरें घालून शिवाय तोहि घालीत असत. ह्या शब्दांचा अर्थ प्रायः सर्व लोकांना कळत नसे. शब्द योजण्याचा मात्र सर्वत्र परिपाठ होता.
१६६३ च्या एप्रिलांत शाहिस्तेखान चाकण घेऊन पुण्यास येऊन राहिला होता. पुण्यास आल्यावर शाहिस्तेखानाने सिंहगडास फितूर केला. ही बातमी शिवाजीस कळतांच, त्यानें मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार ह्यांस राजगडाहून सिंहगडास जाण्यास हुकूम केला व बरोबर तान्होजी मालुस-यास नेण्यास सांगितलें. नंतर थोडक्याच दिवसांत शिवाजीनें शाहिस्तेखानावर पुण्यांत छापा घातला. शाहिस्तेखान पुण्यांत येण्याच्या पूर्वी शिवाजी कोंकणांत नामदारखानावर जाणार होता. परंतु सिंहगडीं फितवा झाल्यामुळें तो बेत तकूब करावा लागला.
ह्या पत्राला जी टीप दिलेली आहे, ती बावडेकरांच्या एका जुन्या पिढीजाद कारकुनानें मूळ पत्राच्या पाठीवर लिहिली आहे. तींत ह्या पत्राचें अक्षर निळोपंताचे असावें असें म्हटलें आहे. परंतु, निळोपंताला शिवाजीनें पाठविलेलें पत्र निळोपंताच्या हातचें कसें असू शकेल? निळोपंताच्या वळणावर दुसरें कोणाचें अक्षर असेल.