(लेखांक ३, ४, ५, ६, ७, १४, १५, १६, १७, ५४, ५५, ५६, ५७, ७७, ७८, ७९, ८०). शहाजी, शिवाजी व शाहू ह्यांस पाठविलेलीं हीं पत्रे अस्सल नाहींत; नक्कल आहेत व मूळ नसून भाषांतर आहेत. हीं भाषांतरें शिवाजीच्या वेळेस केलेलीं नसून, अलीकडे कोणी तरी केलेलीं आहेत हें ह्या पत्रांच्या भाषेवरून स्पष्टच होतें. शिवाय मूळ फारशीचीं ही बराबर भाषांतरें आहेत असेंहि नाहीं, मुसुलमानधर्मरक्षक हें विशेषण भाषांतरकारानें शिवाजी व शाहू यांस दिलें आहे. परंतु तें वस्तुतः दिल्लीच्या पातशाहाचें विशेषण आहे. भाषांतरकारांस ही गोष्ट समजली नव्हती, कारण हा भाषांतरकार प्रायः इसवीच्या एकोणिसाव्या शतकांतला असून, तो विशेष चिकित्सक नव्हता. ह्या सर्व पत्रांत दिलेल्या जुलुसी सनांवर व तारखांवर माझा यत्किंचितहि भरंवसा नाहीं. तेव्हां ह्या पत्रांसंबंधानें येथें जास्त कांही लिहीत नाहीं. मूळ फारशी पत्रे साता-यास आहेत म्हणून कळतें तीं उपलब्ध झाल्यावर त्यांच्यासंबंधीं जें बोलावयाचें तें बोलावें हें इष्ट आहे.
(लेखांक ८) हें पत्र अस्सल आहे व हें १६६८ नंतर लिहिले आहे कारण, सुरतेस फ्रेंच लोकांनीं आपली पहिली वखार १६६८ त स्थापिली. शिवाजीने १६७० त सुरतेवर स्वारी केल्यानंतर म्हणजे १६७० च्या आक्टोबरानंतर १५ रबिलाबलीं म्हणजे १६७१ च्या जुलईत हें पत्र लिहिलें आहे. मुशे डुरो म्हणजे Monsieur Duroc ह्यावेळीं सुरतेच्या फ्रेंच वखारीचा मुख्य एजंट होता. ह्या पत्रावरून असें दिसतें कीं, त्या वेळचे फ्रेंच व्यापारी शिवाजीशीं सलोख्यानें वागत. ह्याच कारणास्तव सुरतेच्या स्वारींत शिवाजीनें फ्रेंच लोकांना स्नेहानें वागविलें व फ्रेंचांनींहि शिवाजीच्या लोकांशी स्नेहाचें वर्तन केलें. फ्रेंच लोकानीं शिवाजीच्या लोकांशीं उद्धपणा केला नाहीं. ह्याबद्दल ग्रांट डफ फ्रेंचांना दोष देतो. “The French purchased an ignominious neutrality by permitting Sivajee’s troops to pass through their factory. (duff Chap. VIII). शिवाजीचा फ्रेंच लोकांना आश्रय होता म्हणून फ्रेंचांनीं शिवाजीच्या बाजारबुणग्यांशी व सैनिकांशीं तक्रार केली नाहीं, ही गोष्ट डफला माहीत नव्हती. शिवाय, हिंदुस्थानासारख्या परराष्ट्रांत येऊन फ्रेंचानी मराठ्यांशीं भाडलें पाहिजे होतें, असा जो डफनें ध्वनि काढला आहे, त्याला कोणत्याहि नीतीचा आधार डफनें दिला नाहीं. एकंदरींत न्याय आणि नीति ह्यांना सोडून डफने हें विधान केलें आहे, हें उघड आहे. डफनें मराठ्यांचा इतिहास निःपक्षपातानें लिहिला आहे, असें समजणा-यांनीं ह्या विधानाचा विचार करावा.
फ्रेंच कंपनीचीं ह्यावेळचीं दफ्तर मराठ्यांच्या इतिहासाला कांहींशी उपयोगी पडतील. पारिसांत मराठ्यांच्या संबंधींचे कागदपत्र आहेत असें कळतें.
ह्या लेखांत, (१) अज् जाबती कपीतानें फ्रांशेश्, (२) मुक्काम पेठ रायबाग, (३) बंदर (ई) राजपूरी व (४) बंदर (ई) सुरतेसी, हे शब्दप्रयोग (१) फ्रेंच कप्तानाच्या अधिकाराखालीं असणारा कलाल, (२) रायबागच्या पेठेंत राहाणारा, (३) राजापूरच्या बंदरांत, व (४) सुरतेच्या बंदरास ह्यांबद्दल योजिले आहेत. तसेंच, सराफराजनामा व वर्तणूक हीं नामें नपूंसकलिंगी योजिली आहेत. साहेब वैभव लेहावया आज्ञा केली पाहिजे हें फारशीचें हुबेहुब भाषांतर आहे व साहेब हा प्रथमांत कर्ता फारशीतल्याप्रमाणेंच योजिला आहे. (१) शीरदीदे ठेवणें, (२) सराफराज होणें, (३) रवाना करणें, (४) आरीफ असणें, हे प्रयोगहि फारशी आहेत. सातव्या पृष्ठाच्या पहिल्या ओळींतील पहिलें हा शब्द पूर्वी ह्याअर्थी अव्वल ह्या फारशी शब्दाबद्दल घातला आहे.
पहिल्या व दुस-या लेखांचे मोडी अक्षर जाड ढोबळ आहे. फारशी दफ्तरांत मराठी मोडी अक्षर असेंच ढोबळ लिहीत. ह्या आठव्या लेखांकाचें मोडी, कानडी लोक मराठी मोडी लिहीत त्या प्रकारचें आहे. हें मोडी ढोबळ नसून वेलांट्यांच्या फरफाट्या ह्यांत अतोनात आहेत. ह्या पत्रांत म्हणोनु, होउनु, वगैरे शब्द आहेत. ह्या पत्रावर रूपेरी बेगडीचे ठिपके आहेत. ह्या पत्रांतील सालीं सोमनाथपंत डबीर ह्याचा मुलगा निळो सोमनाथ डबीरीवर होता असें दिसतें.