महंमद आदिलशाहा ४ नोव्हेबर १६५६ त वारला, असें डफ म्हणतो. परंतु ज्याअर्थी तो २६ मोहरम १०६७ हिजरीस वारला, त्याअर्थी १५ नोव्हेंबर १६५६ हीच त्याच्या मरणाची खरी तारीख समजली पाहिजे. ग्रांट डफनें २६ मोहरम बद्दल १६ मोहरम तवारिखेंत वाचलें असें दिसतें.
ह्या पत्रांवरून विजापूरचे आदिलशाहा, जाउलीचा चंद्रराय मोरे व शिवाजी राजे भोसले, ह्या तिघांचा १६५६ त कोणत्या प्रकारचा संबंध होता तें समजतें. जाउलीचा चंद्रराय मौरे वस्तुतः विजापूरच्या आदिलशाहाचा मांडलिक होता. शिवाजी राजे भोसले हा आदिलशाहाचा सरदार जो शहाजी राजे भोसले त्याचा मुलगा असून, ह्यानें इ. स. १६४३ पासून १६५६ पर्यंत घाटमाथ्यावर स्वतंत्र सत्ता स्थापण्याचा उपक्रम केला होता. ही सत्ता पुण्यापासून रोहिडखो-यापर्यंत स्थापिल्यावर शिवाजीच्या प्रांताची हद्द चंद्रराय मो-याच्या राज्याच्या हद्दीला येऊन भिडली. चंद्रराय मोरे दिसण्याला यद्यपि आदिलशाहाचा मांडलिक होता, तत्रापि अलीकडील दहा पांच वर्षांत शिवाजीचें व इतर बंडखोरांचें अनुकरण करून तोहि स्वतंत्रपणेंच वागूं लागला होता. चंद्ररायाचे हे स्वतंत्र वागणेंच त्याच्या नाशाला कारण झालें शिवाजी बोलून चालून स्वतंत्र बंडखोर बनला होता आणि त्याच्या प्रांताला भिडून दर्शनी परतंत्र व वस्तुतः स्वतंत्र अशा चंद्ररायाचा प्रांत होता. स्वतंत्रपणे वागण्याचा उपक्रम केल्यामुळें व आदिलशाहीशीं संबंध अजीबात तोडून न टाकल्यामुळे चंद्ररायाची स्थिति अगदीं निराश्रित अशी झाली होती. अशा निराश्रित स्वातंत्र्येच्छु संस्थानिकांची शिवाजीशीं गाठ पडून, विजापुरांतील बलिष्ठ सत्तेचा आश्रय तुटल्यामुळे, चंद्ररायाचा नाश झाला. त्यामुळे विजापुरातील आदिलशाहांना राग किंवा दुःख बिलकुल झाले नाहीं उलटें, एक शिरजोर स्वातंत्र्येच्छु संस्थानिक नष्ट झाला हें पाहून, त्यांना प्रायः समाधानच वाटलें. नाहींतर विजापुरांतील सर्वश्रेष्ठ कारभारी जो दियानतराव तो शिवाजीला चंद्ररायासंबंधानें असें शांततेचें पत्र न लिहिता. विजापुरचा मांडलिक व संस्थानिक जो चंद्रराय मोरे त्याचा प्रांत शिवाजीनें घेतला, ह्या कृत्याचा अर्थ विजारपूरच्या पातशाहीवर शिवाजीनें हल्ला केला असा वस्तुतः होतो. हा हल्ला झाला असतां, विजापुरानें शिवाजीवर चालून जाऊन त्याला नेस्तनाबूद करावयाचें. परंतु तसें कांहीं एक न करतां, चंद्ररायाचा नाश झाला असतां, शिवाजीनें घेतलेल्या प्रांतांतील कोणते गांव चंद्ररायाचें व कोणते विजापूरकरांचे ह्या विषयीं विजापुरचा सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी जो दियानतराव तो शिवाजीचा मुजुमदार जो निळी सोनदेव त्याशीं वाटाघाट करतो. ह्या सामोपचाराच्या वाटाघाटीवरून असें अनुमान निघतें कीं, शिवाजीची स्वतंत्र सत्ता विजापुरकरांना ह्या वेळीं मान्य झाली होती व विजापूरच्या शिरजोर संस्थानिकांना शिवाजीने मारिलें असतां विजापुरकरांना त्याचें कांहीच वाटत नसे. ते शिवाजीच्या हालचालींकडे लक्ष एवढ्यापुतेंच देत कीं त्यानें आपल्या प्रांतांत कांही गडबड करूं नये. १६५६ पर्यंत शिवाजीनें मावळांत व कोंकणात जी धामधूम चालविली होती ती बंद करण्याला विजापूरकरांनीं म्हणण्यासारखी काहींच खटपट का केली नाहीं त्याचें बिंग हें आहे. अहमदनगरची निजामशाही बुडाल्यावर तिची वांटणी दिल्ली व विजापूर येथील पातशाहांनीं केली. पैकीं विजापूरच्या वांटणीस मावळातील व कोंकणांतील जो नवीन प्रांत आला त्यांत १६५६ पर्यंत शिवाजीनें खवडव चालविली होती. ह्या प्रांतावर विजापूरचा जसा अम्मल बसावा तसा बसला नव्हता व तेथील संस्थानिक व अधिकारी विजापूरच्या अंकित जसे व्हावे तसे झाले नव्हते. ह्या बेबंद संस्थानिकांना, किल्लेदारांना व अधिका-यांना शिवाजीनें नेस्तनाबूद केलें, हें विजापूरच्या मुत्सद्यांना एका प्रकारें इष्टच वाटलें. बेबंद व शिरजोर संस्थानिकांचा व किल्लेदारांचा शिवाजीनें नाश केल्यावर, शिवाजीची व्यवस्था लावतां येईल असा ह्या मुत्सद्यांचा अंतस्थ हेतू होता. ह्यामुळें १६५६ पर्यंत शिवाजीच्या विरुद्ध मोहिम करण्याचा उपक्रम विजापूरच्या मुत्सद्यांनीं केला नाहीं. परंतु १६५६ नंतर विजापूरच्या मुळच्या वाई, क-हाड वगैरे प्रांतांत जेव्हा शिवाजी शिरूं लागला, तेव्हां अफजलखानाला शिवाजीवर पाठविणें विजापूरकरांना अवश्य झालें. अफजलखानाच्या मोहिमेचा काय परिणाम झाला हे सर्वत्र प्रसिद्धच आहे. ह्या १६५६ पर्यंतच्या हालचालीवरून असें दिसते कीं विजापूरच्या मुत्सद्यांचीं मनें शिवाजीनें उत्तमोत्तम पारखिलीं होतीं.