ह्यांपैकीं रामचंद्र, शंकर, महादेव, गोविंद, बल्लाळ हीं नांवे अद्यापहि चालतात. जैत्रपाळ ह्याचें हस्व जैतु, जैतुगि वर दिलेल्या मराठ्यांच्या नांवांपैकी विसावें नांव जें जैतोजी त्याच्याशीं जुळतें. जैतोजी हें जैतो ह्या नांवाचें बहुमानार्थीरूप आहे. जैतुगि ह्या शब्दांतील गि हा, जी बद्दल अपपाठ नसल्यास, बहुमानार्थीप्रत्यय तर खास आहे. प्रस्तुत खंडांतील पहिल्या लेखांकांतील कोनेरी हें नांव व ह्या वंशावळींतील कन्हार हें नाव एकच आहे. ब्राह्मणांच्या नांवांच्या यादींतील सातवें नांव मल्लिभट्ट व यादवांच्या वंशावळींतील मल्लुगि हे दोन्ही शब्द मल्ल, मल्लो, मल्लूपासून निघाले आहेत. राजगि हें अर्वाचीन रायजी, राजजी, राजाजी, ह्यांचे प्राचीन रूप आहे. वेसुगि व वाडुगि हीं वेसु व वाडु ह्यांची बहुमानार्थी रूपें आहेत. ह्यांची येसूजी व वाडोजी अशी अर्वाचीन रूपें व चा य होऊन होतात. गांगेय ह्याचें गांगो हें रूप प्रसिद्ध आहे. सिंघण, सेउण, धाडियप्पा, परम्मदेव व भिल्लम ह्या शब्दांचीं अर्वाचीनरूपें मात्र फारशी सध्यां प्रचलित नाहींत. ब्राह्मणांच्या यादींत विडाडि हें नांव आलें आहे. तें बीडाद्रि ह्या नावाचें प्राकृतरूप आहे. हेमाद्रि ह्या शब्दाचें जसें हेमाडि, हेमाड, असें रूप होतें तसेंच हेंहि होतें. मराठ्यांच्या यादींतील चांगो व तेराव्या शतकांतील चांगदेव हीं नावें एकच आहेत. सारांश, महाराष्ट्रांतील विशेषनामांची परंपरा नवव्या शतकापर्यंत जाऊं शकेल. रामदासस्वामींची वंशावळ नवव्या शतकापर्यंत गेलेली प्रसिद्ध आहे. तसेंच पटवर्धन, घैसास, वगैरे आडनांवेंहि अशींच जुनीं आहेत. तेव्हां विशेषनामांच्या प्रदेशांत मराठ्यांच्या इतिहासाचा प्रवाह आज एक हजार वर्षे सारखा अप्रतिहत चालत आला आहे. मुसुलमानी अमलातं मेहरबान् अजम, वगैरे उपपदें ब्राह्मण व मराठे ह्यांच्या नांवांपाठीमागें लागत, परंतु मराठशाही पुनः झाल्यावर राजश्री, राजमान्य, हे जुने मायने पुन्हां उदयास आले. प्रस्तुतकाळीं मिस्टर, सर, वगैरे शब्द महाराष्ट्रांतील लोकांच्या नावामागें हमेश लागलेले दिसतात. कांहीं फारशी विशेषनामें घेण्यापलीकडे विशेषनामाच्या प्रदेशांत मुसुलमानी अमलांत म्हणण्यासारखी ढवळाढवळ झाली नाहीं. परंतु काहीं फारशी नांवें प्रचारांत आलीं ही लहानसान गोष्ट नव्हे. उद्यां एखाद्या भटानें आपल्या मुलाचें नांव टॉमस किंवा वुइल्यम ठेविलें तर तें जितकें विलक्षण दिसेल तितकींच फिरंगु, दर्याजी, वगैरे नांवें प्रथम ठेवतांना दिसलीं असतील. हीच टीका आडनांवांनाहि अशीच लागूं करतां येईल.
(१०) प्रस्तुत खंडांत छापिलेल्या पत्रांसंबंधानें चवथी विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे गांवें, खेडीं, प्रदेश, नद्या, प्रांत, तालुके, इलाखे, थडी, देश, ह्यांच्या नांवाची आहे. मुसुलमानांच्या पूर्वी व वेळीं ह्यांचीं नावें कशीं होती व ह्यांच्या हद्दी कोठवर होत्या, ह्याचा विचार इतका महत्त्वाचा आहे कीं, महाराष्ट्रांचा मध्ययुगीन व शिवकालीन इतिहास त्याच्या शिवाय दुर्बोध राहील. परंतु, पुढील एक दोन खंडांत कांही फारशी लेख यावयाचे आहेत ते छापून झाल्यावर ह्या मनोरंजक व बोधप्रद प्रकरणावर खुलाशानें लिहिण्यास सोईचें पडेल.
(११) शिवकालीन पत्रव्यवहारासंबंधीं सामान्य विचार येथपर्यंत झाला. आतां ह्यापुढें प्रस्तुत खंडांत छापिलेल्या शिवाजीच्या प्रत्येक पत्रासंबंधानें बाकींच्या कांहीं बाबीविषयीं विशेष माहिती नमूद करितों.
[लेखांक १ व २]. हे दोन्हीं लेखांक अस्सल आहेत. ह्या दोहोंतहि शिक्का व मोर्तब फारशी आहेत. षाहनूरगादअल्ली दिनायतराव अशा शिक्क्यांचा पाठ मीं छापील पत्रांत दिला आहे, परंतु तो चुकला आहे. खरा पाठ दियानतराव बंदेहईआली आदिलशाह् असा आहे. ह्या दुस-या पाठाचा अर्थ आली आदिलशाहाचा सेवक दियानतराव असा होतो. मुसुलमानांची ही शिक्क्याची फारशी पद्धत शिवाजीनें उचलली. शिवाजी व त्याचे कामगार ह्यांनीं फारशीच्या ऐवजीं मराठी व संस्कृत भाषा वापरली इतकेंच महंमद आदिलशहा १५ नोव्हेंबर १६५६ त वारला. व त्याचा मुलगा आली आदिलशहा गादीवर आला. ह्या दोघांच्या कारकीर्दीत दियानतराव विजापुरास दफ्तरदारीच्या कामावर होता. ह्याची जन्मभूमि चंदन किल्ल्याजवळील ओझर्डे गांव होतें. हें गांव महंमद आदिलशहानें आपल्या मर्जीतला जो नूरखान त्यास दिलें. तें चंद्रराव मोरे ह्याचें राज्य घेतल्यावर शिवाजीनें चंद्ररावाच्या राज्यांतील गांव म्हणून काबीज केलें. ही खबर दियानतरावास कळतांच त्यानें हें गांव आपलें वतनस्थल आहे म्हणून निळो सोनदेवास पत्रें लिहिलीं. हीं पत्रे १६५६ च्या नोव्हेंबरांत महंमदशहा वारल्यावर लिहिलीं. ह्यावरून चंद्रराव मो-यांचे राज्य शिवाजीनें घेऊन १६५६ च्या नोव्हेंबरांत थोडेच महिने झाले होते असें दिसतें. चवथ्या खंडाच्या प्रस्तावनेंत चंद्रराव मो-यावर शिवाजीनें १६५५ च्या एप्रिलपासून १६५६ च्या मार्चापर्यंत केव्हांतरी स्वारी केली, असें मी लिहिलें आहे. आतां ह्या पत्रांवरून असें नक्की म्हणतां येतें कीं १६५६ च्या मार्चांत शिवाजीनें चंद्ररावाचें राज्य घेतले. १६५५ च्या नोव्हेंबरापर्यंत महाबळेश्वरास सडकून पाऊस असतो व त्या सुमारास तें स्थान मोहीम करण्यास अशक्य असतें. १६५५ च्या नोव्हेंबरानंतर उघाड झाल्यावर शिवाजीनें मो-यावर स्वारी केली व त्याचा सर्व प्रांत १६५६ च्या मार्च एप्रिलपर्यंत काबीज केला. येणेंप्रमाणें ह्या पत्रांवरून शिवाजीच्या एका मोहिमेचा काळ पक्का ठरला.