श्री.
श्रीसद्गुरु बाळकृष्णस्वामी प्रसन्न ।। श्रीसत्यपूर्णगुरुभ्यो नमः ।। अथ मूळपुरुषविचारः ।। तालीख ।। श्रीमूळपुरुष लक्ष्मीधरभट्ट ।। गोत्र उपमन्य वसिष्ठ ।। कुळदेवता भैराळलिंग मंगसोळी ।। कोल्हापूर महालक्ष्मी ।। वरदेवता भुवनेश्वरी ।। आराधि देवता सिद्धबिडेश ।। मंडपदेवता शमी ।। पुरोहित मंचभट्टी अन्योन्य ॥ स्थळदेवता रामलिंग ।। मिर्जला परमेश्वरी ॥ श्रीशमनामीर ग्रामदेवता ।। अडीशेरी कोठीस॥ लक्ष्मीधर त्याचा पुत्र मंचिभट्ट ॥ त्याशि पुत्र २ दोघ ॥ मूळवृत्ति ॥ तास १ बेडग ज्योतिष अष्टाधिकारी ॥ २ तार्द्दाळ, ३ तंदलगे, ४ कुलकरण देश हुकेरी ।। वज्रचंडे पटेलकी देश मुर्तजाबाद ।। एकवाटा। दुसरा वाटा ॥ ज्योतिष्य अष्टाधिकारी मुर्तजाबाद ।। हवेली खेडीं १०॥ गृहस्ताचीं घरे ॥ इनामें ॥ आतां वाटा॥ वडील पुत्र बिडंभट्ट त्याशि मृगनहळ्ळीस ठेविलें॥ त्याचा वाटा पुरातन जाहला असे ॥ मृगनहळ्ळी ज्योतिष ॥ हवेली ज्योतिष ॥ इनामें गृहस्ताचीं घरें ॥ इतुका वाटा ।। अथ यादि पुरुष ।।
( अथ यादि पुरुष वाचण्यासाठी येते क्लिक करा. )
रघुनाथभट्ट बिन्न नामदेवभट्ट यानें सुलतान महंमद पादशाह सदर मेहर्बानी केली ।। हक ॥ ०|० जमीन पाव चावर ।। फश्की ।। तेल॥ नमक ॥ तसरीफ ॥ मुढा व दिवाली प्रताप तनखा चावडी रोज पैसे ४ चबुतरा कोतवाली ॥ पंचोत्री पैसे २॥
ही याद इ. स. १६२७ पासून १६५६ पर्यंत राज्य करणा-या सुलमान महंमद आदिलशहाच्या वेळची आहे. त्यावेळीं रघुनाथभट्ट बिन नामदेवभट्ट, ज्योतिषी मिरजकर, हयात होता व त्याची मूळपुरुषापासून पंधरावी पिढी होती. म्हणजे रघुनाथभट्टाचे मूळ पुरुष, २२ वर्षे दर पिढीस धरिलीं असतां, इ. स. १३०० च्या सुमारास हयात होता असें दिसतें. त्यावेळेपासून १६५६ पर्यंतचीं ब्राह्मणांचीं काहीं नांवें ह्या यादींत आहेत. ह्या यादीत (१) संस्कृत लक्ष्मीधर, (२) महाराष्ट्री पिल्लंभट्ट, (३) देशी डोंगरोबा, व (४) कानडी तिमप्पा, हीं नांवें आलीं आहेत.
महाराष्ट्रांतील मराठ्यांचीं व ब्राह्मणांचीं नांवें १३०० पासू १६५६ पर्यंत कशी होतीं त्याचा मासला वरील दोन यादींवरून पहातां येतो. त्यावरून असें दिसतें कीं ब्राह्मणांचीं नांवे ह्या तीन साडेतीनशें वर्षांत आंतररूपानें फारशी बदललीं नाहींत, बाह्य रूपाने मात्र किंचित् बदललीं आहेत. गांगो पाटेलु, राघो पाटेलु ह्याऐवजीं सध्यां आपण गंगू पाटील, राघू पाटील असें ह्मणतों. गांगो व राघो ह्या जुन्या रूपांचीं भाषेंतील इतर शब्दांप्रमाणें गंगू व राघू अशीं रूपें सध्यां झालीं आहेत. मोरो, विसाजी, वगैरे रूपें अद्यापहि प्रचलित आहेत. तेव्हां विशेषनामांची परंपरा १३०० पासून आजपर्यंत बिनतूट चालत आली आहे हें स्पष्ट आहे.
आतां इ. स. १३०० च्या पाठीमागें विशेषनामांची परंपरा अशीच बिनतूट आहे कीं काय तें पाहूं. एतदर्थ मुसुलमानांच्या पूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणा-या जाधवांच्या वंशावळीतींल नांवे खालीं देतों व त्यांची मुसुलमानी अमलाच्या वेळच्या नावाशीं तुलना करतों.
( जाधवांची वंशावळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. )