शुद्रांस नुसत्या सौम्य नांवानें ओळखत व अतिशूद्रांस आ किंवा या प्रत्यय लावून हाका मारीत; जसे, ह-या मांग; राम्या महार, वगैरे. स्त्रियांस देवी, बाई, आउ, अवा, ई वगैरे प्रत्यय लावले जात; जसें, देवळदेवी, चांगुणाबाई, रमाऊ, रमाव्वा, रमाई, रमी, इत्यादि. ब्रह्मणांची एकरी नांवें जुन्या मराठींतल्याप्रमाणें प्रायः ओकारान्त असत; जसें, केसो, राघो, मोरो, वगैरे. मायेच्या बोलण्यांत हीं नांवें उकारान्त होत, जसें केसु, राघु, मोरु, शाहु, शिऊ, वगैरे. ह्या नांवांना बहुमानार्थी बा हा प्रत्यय लागत असे; जसे केसोबा, ज्ञानोबा, तुकोबा, इत्यादि. क्षत्रियांच्या नांवांना बहुमानार्थी जी हा प्रत्यय ओकारान्त, अकारान्त किंवा उकारान्त मूळ नांवांपुढे लागे; जसें ह्यादोजी, ह्यादजी, महादाजी, ह्यादूजी. हा जी प्रत्यय संस्कृत आर्य, महाराष्ट्री अज्ज, पासून आला आहे. महादेवार्य, महादाज्ज, महादजी, महादोजी, महादजी, महादूजी. उत्तरादाखल इंग्रजी Sir ह्या अर्थी जो शब्द महाराष्ट्रांत उच्चारतात तो आर्य, अज्ज, जी अशा परंपरेनें बनला आहे. नायकिणींच्या नांवांपुढे जी प्रत्यय येतो तो अज्झा नामक प्राकृत शब्दापासून आला आहे. स्त्रियांच्या नांवांपुढील आऊ, आई, आवा, हे प्रत्यय अयि, अव्वा वगैरे प्राकृत शब्दांपासून निघाले आहेत.
ह्या मराठी नांवांत कांही शब्द (१) शुद्ध संस्कृत आहेत, (२) काहीं महाराष्ट्रांतून जुन्या मराठींत आले आहेत, (३) कांहीं शुद्ध देशी आहेत, (४) कांहीं फारशींतून आले आहेत, (५) व कांहीं तेलंगी, कानडी वगैरे द्राविड भाषांतून आले आहेत. (१) नारायण, (२) कान्होजी, (३) दगडू, (४) फिरंगोजी, व (५) तिमाजी, हीं ह्याचीं अनुक्रमें उदाहरणें होत. आडनांवांचाहि असाच पंचविध प्रकार आहे. पिंगळे, सावंत, मराठे, काळे, शिर्के, गोरे, सांळुंके, भोसले, फर्जंद, पटवर्धन, घैसास, महाराव, यादव, जाधव, निंबाळकर, पोवार, मोहिते, चिटणीस, पोतनीस, आर्चाय, वगैरे आडनांवांत संस्कृत, महाराष्ट्री, देशी, फारशी व कानडी त-हेचीं आडनावें आहेत. ह्या आडनांवांपैकीं संस्कृत शिलालेखांतील व ताम्रपटांतील आडनांवांव्यतिरिक्त जुन्यांत जुनें असें मराठी लेखांतील आडनांव म्हटलें म्हणजे वाडीकर सावंत यांचें होय. मठ येथील देवालयांतील इ. स १३९७ तील लेखांत न-यसीदेव व भामसावंत अशीं सावंतांचीं दोन नांवे आलीं आहेत. न-यसीदेव ज्याअर्थी इ. स. १३९७ त हयात होता व त्यानें ज्याअर्थी आपला बाप भामसावंत ह्याच्याप्रीत्यर्थ मठ येथील देऊळ बांधिलें, त्याअर्थी १३९७ च्या आधीं दोन चार वर्षे भामसावंत वारला असावा. म्हणजे भामसावंताची हयात इ. स. १३६० पासून १३९७ पर्यंत सरासरी असावी. सावंतांचें मूळ आडनांव भोसले. भामसावंताचें आडनाव सावंत होण्यास त्याच्यापूर्वी दोन चार पिढ्या त्याचे पूर्वज कोणीतरी चक्रवर्ती राजाचे मांडलिक असले पाहिजेत. त्याशिवाय भोसलें हें आडनांव जाऊन सावंत हें आडनाव पडावयाचें नाहीं. अर्थात्, १३६० च्या पूर्वी शंभर वर्षे सावंताचें कूळ कोंकणांत सावंत ह्या नांवानें महशूर होतें असें दिसतें. म्हणजे इ. स. १२६० च्या सुमारास हे भोसले आडनांवाचे सावंत हयात होते हें उघड आहे. ह्याचा अर्थ असा होतो कीं, इ. स. १२६० मध्यें भोसले हें आडनांव कोकणांत प्रसिद्ध होतें. हे सावंतवाडीचे भोसले सातारकर भोसल्यांचे संबंधीं आहेत. ह्याला पुरावा प्रस्तुत खंडांतील १३८ वा व ६२ वा लेखांक यांचा आहे १३८ व्या लेखांकांत मनाबाई सरदेसाईणीनें कोल्हापूरच्या संभाजी महाराजांस काका ह्या शब्दानें गौरविलें आहे. व ६२ व्या लेखांकांत दुस-या शिवाजीनें सावंताना भोसले हे आडनांव लाविलें आहे. तेव्हां हें भोसल्याचें कुळ इ. स. १२६० पासून महाराष्ट्रांत आहे हे पूर्णपणें सिद्ध आहे. आतां सातारचे छत्रपति भोसले चितोडच्या वंशापैकीं आहेत अशी जी गप्प आहे तिच्याशीं ह्या सिद्धीचा कितपत मेळ बसतो तो पाहूं. सातारची बनावट वंशावळ येणेप्रमाणें:-
(वंशावळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)