फारशी भाषेचें साम्राज्य झालें असतां, मराठी वाचविण्याला व वाढविण्याला जे उपाय पूर्वी योजिले गेले तेच उपाय सध्यांहि योजिले पाहिजेत. भाषेचा संकोच म्हणजे आपल्या हालचालींचा संकोच, हें लक्षात घेतलें पाहिजे. जसजशा आपल्या हालचाली संकुचित मर्यादेंत येऊं लागल्या, तसतसा मराठी भाषेचा संकोच झाला. तेव्हां मराठी भाषेचा विकास करण्याला आपल्या राष्ट्रीय हालचाली वाढविल्या पाहिजेत. हालचाली न वाढवितां भाषेचा विकास करूं पहाणें म्हणजे तदबाह्य शक्ति न लावितां एखादी वस्तू हालवूं जाण्यासारखें आहे. धार्मिक, सामाजिक, व्यापारिक, राजकीय राष्ट्रीय, लौकिक, शास्त्रीय, वगैरे सर्व प्रांतांत पुनः नव्यानें जेव्हां आपण जोरानें हालचाल करावयास लागूं तेव्हां त्या त्या प्रांतांत मराठी भाषेचा उपयोगहि आपल्याला सहजगत्या करावा लागेल. भाषेंत शास्त्रीय ग्रंथसंपत्ति व्हावी ह्या सदिच्छेनें कोणी प्राणिशास्त्राच्या गूढ सिद्धांताचें प्रणयन मराठींत केलें, तर तो त्याचा प्रयत्न व्यर्थ जाईल. कारण राष्ट्रीय हालचालींची मर्यादा प्राणिशास्त्रांच्या सिद्धांतांचें प्रणयन अवश्य वाटण्यापर्यंत गेलेली नाहीं. मनुष्याची कर्तबगारी नमूद करण्याचें साधन भाषा होय. जेथें कर्तबगारी नाहीं तेथें भाषेनें नमूद तरी काय करावें? मुसुलमानी अमलांत मराठ्यांच्या सर्व राजकीय हालचाली बंद झाल्या. त्याबरोबर राजकीय वाङ्मयहि मराठींत व्हावयाचें बंद झालें. अशा अडचणीच्या प्रसंगीं महाराष्ट्रांतील साधुसंतांनीं हालचालीचें एक निराळेंच स्थान उत्पन्न केलें. तें स्थान धर्म व भक्ति ह्यांचे होतें. ह्या स्थानांत राष्ट्रातील सर्व लोकांचे एकीकरण करण्याचा त्यांनीं प्रचंड उद्योग केला; व हा उद्योग लोकांना समजून देण्याकरितां मराठी भाषेचा उपयोग केला म्हणजे मराठींत ग्रंथरचना केली. पंचवीस वर्षांपूर्वी विष्णुशास्री चिपळोणकरांनींहि हाच मार्ग स्वीकारला. विष्णुशास्री हालचाल करणारा मनुष्य होता, व जी हालचाल करण्याचा त्याचा मनोदय होता ती समजून देण्याकरितां मराठींत लिहिणें त्याला जरूर वाटलें. मराठी भाषेला उर्जितदशेला आणणें ह्या प्रयोगाचा अर्थ कांहींतरी राष्ट्रहिताची हालचाल करणे हा आहे; दुसरा काहीं नाहीं. जेव्हां आपल्या इकडील कोणी गृहस्थ इंग्रजीत लिहितो किंवा बोलतो तेव्हां स्वदेशाच्या हालचालीशीं त्या बोलण्याचा किंवा लिहिण्याचा साक्षात् संबंध नसतो किंवा असल्यास फारच दूरचा असतो, असें म्हणणें ओघास येतें. रा. रा. टिळकांनीं आर्याचें मूलस्थान हे पुस्तक इंग्रजींत लिहिलें ह्याचा अर्थ असा होतो कीं, ह्या पुस्तकांतील विषयाचा उपयोग इकडील लोकांना नसून तिकडील लोकांना आहे म्हणजे हे पुस्तक तिकडील हालचालींच्या हितार्थ लिहिलेलें आहे, हें उघड आहे. रानड्यांनीं मराठ्यांचा इतिहास इंग्रजींत लिहिला ह्याचाहि अर्थ हाच आहे; व इंग्लिश लोकांची मतें महाराष्ट्रासंबंधानें नीट करण्याकरितां हे पुस्तक आपण लिहितो, असें त्यांनीं स्पष्ट म्हटलें आहे. तेव्हां स्वदेशाचें हित व स्वभाषेचा उपयोग हे समानार्थक शब्द होत हें स्पष्ट आहे. जेथें स्वदेशाचें हित नाहीं, तेथे प्रायः स्वभाषेचेंहि हित नाहींच. ह्यासंबंधानें येथें आतां जास्त पाल्हाळ करावयाला वेळ नाहीं. हें प्रकरण एखाद्या स्वतंत्र निबंधाचाच विषय होण्याच्या योग्यतेचें आहे.
(९) शिवाजीच्या पत्रांच्या अनुषंगानें मोडी अक्षर व फारशीच्या सान्निध्यानें मराठी भाषेचें स्थित्यंतर, ह्या दोन बाबींचा येथपर्यंत ऊहापोह झाला. आतां शिवाजीच्या पत्रासंबंधानें तिसरी विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे स्त्रीपुरुषांच्या नावाची होय.
इ. स. १२९० पासून १६५६ पर्यंत महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्यातील निरनिराळ्या वर्णाच्या नांवांपुढे निरनिराळे विशिष्ट शब्द येतात. राजांच्या नांवांपुढे देव किंवा राज, राऊ, राव असे शब्द येतात; जसे सिंघणदेव, कृष्णदेव, रामदेव, बिंबदेव, वगैरे कधीं कधीं हे दोन्ही शब्द नांवापुढें जोडले जात, जसें रामदेवराव. क्षत्रियांच्या नांवांपुढे सिंग, राऊ किंवा जी हे प्रत्यय लागत; जसें, मानसिंग, विकटराऊ, अमृतराऊ, धनाजी, शिवाजी, शहाजी, वगैरे. कधीं कधीं हे दोन्ही प्रत्यय लागले जात; जसें शिवाजीराऊ, धनाजीराऊ ब्राह्मणांच्या नांवांपुढें गृहस्थ असल्यास देव, पंत, पंडित किंवा जी असे प्रत्यय लागत; जसें, ज्ञानदेव, नारोपंडित, नारोपंत किंवा नारोजी, ब्राह्मण भिक्षुक असल्यास, त्याच्या नांवापुढें भट्ट हें पद लागे; रामभट, गुंडभट वगैरे. वैद्य, शास्त्री किंवा ज्योतिषी असल्यास, नांवापुढें तदर्थवाचक शब्द लागत; जसें, बाळज्योतिषी, नरसिंहवैद्य, कृष्णशास्त्री, रामाचार्य, इत्यादि सामान्य ब्राह्मणांना हे प्रत्यय लावीत नसत; जसें मोरो त्रिमळ, केसो नारायण, काशी त्रिमळ, विसा मोरो, दादो नर्सो, वगैरे. वैश्यांना सेठी, देव हीं उपपदें लावीत; जसें, नामदेऊ, दामासेठी, रामसेठी, हरिसेठी, वगैरे.