हीच टीका इतर गृहस्थांच्याहि इंग्रजी लेखांसंबंधानें करतां येईल. ह्या सर्व लोकांना काय भुरळ पडलें असेल तें असो. इंग्रजींत लिहिणें म्हणजे कांही अजब चमत्कार करणें आहे असें ह्यांना निःसंशय वाटत असावें असें दिसतें. खरें म्हटलें असतां इंग्रजी लिहिण्यापासून ह्यांना वरकरणी फायदा किती असला तरी वस्तुतः कांहीं फायदा आहे असें वाटत नाहीं. श्रेष्ठ इंग्रज ग्रंथकारांप्रमाणे आंग्लभाषाप्रभुत्व ह्यांच्यापैकी एकालाहि येणें दुरापास्त आहे. तेव्हां विलायती सरस्वतीपुत्रांत ह्यांना उत्तम इंग्लिश ग्रंथकार म्हणून कोणी मान देतो असा बिलकुल प्रकार नाहीं. एकप्रकारचें तकलादु व बटबटीत इंग्रजी हे लोक लिहितात, असाच अभिप्राय ह्यांच्या इंग्रजीवर इंग्रज टीकाकारांकडून प्रायः पडला जातो. जिवापाड मेहनत करून परभाषेंत लिहावें आणि तत्रस्थ लोकांनीं फार तर intelligent म्हणून सर्टिफिकेट द्यावें, ह्यांत ह्यांना काय अभिमान वाटत असेल न कळे! हें ह्या लोकांच्या इंग्रजीभाषेसंबंधानें झालें. ह्यांच्या ग्रंथांतील विचारासंबंधानें पहातां, यूरोपांतील मोठमोठ्या पट्टीच्या शास्त्रज्ञांच्या विचारांच्या तोडीचे सिद्धान्त ह्यांच्याकडून निर्माण झाले आहेत असें किंचितच म्हणतां येईल. केन्, ब्राडला वगैरेचे विचार जितपत प्रगल्भ व खोल असतात तितपतच ह्या लोकांचे असतात. ग्लाड्स्टन्, हक्सल्ले, बन्सेन, मूलर, हंबोल्ट, ह्यांच्यापासून केन व ब्राडला, जितके दूर आहेत त्यापेक्षां आपल्याइकडील ही पुढारी मंडळी वरील मंडळींच्या फारशी जवळ नाहींत. येणेंप्रमाणें भाषाप्रभुत्व किंवा विचारसामर्थ्य वस्तुतः इतर राष्ट्रांतील लोकांना थक्क करून टाकण्यासारखें नसतांना, परभाषेंत लिहून तींतील लहानमोठ्या ग्रंथांच्या व चोपड्यांच्या गर्दीत गडप होऊन जाण्यांत काय पुरुषार्थ असेल तो असो! ही कृति केवळ तळ्याच्या पाण्यांत पडणा-या धुळीच्या कणाच्या मासल्याची दिसते! कोटश्च कीटायते! परंतु जेथें सर्वत्र उलटा प्रकार झालेला दिसत आहे. तेथें राष्ट्रांतील पुढारी म्हणून नांवाजली जाणारी मंडळीहि कांहींशी भांबावत जावी, ही सरळच गोष्ट आहे. सध्याच्या काळाचा महिमाच असा आहे कीं, स्वधर्म टाकावा, स्वदेश सोडावा व स्वभाषा विसरावी असें विचारवंतांना व देशाभिमान्यांनाहि वाटावें!
असा मराठीचा संकोच सध्यां चोहोकडून होऊं लागला आहे. सरकार परदेशी पडल्यामुळें तें ह्या भाषेला वा-यालाहि उभें राहूं देत नाहीं. व एतद्देशीय विद्वान् लोकांच्या स्वदेशाभिमानाच्या कल्पना कांहीं अपूर्व झाल्यामुळें, गंभीर ग्रंथरचनेच्या कामीं इंगजी भाषा वापरल्यानें मराठीचा आपण कांहीं गुन्हा करतों, हे त्यांच्या गावींहि नसतें. येणेप्रमाणें इंग्रजांच्या अमलाखालील महाराष्ट्रांत मराठीचा संकोच अत्यंत झालेला आहे. दहा पांच मोठीं मराठी संस्थाने आहेत, तेथीलहि दरबारी भाषा अलीकडे इंग्रजीच बनत चालली आहे. अशीच स्थिति शंभर दीडशें वर्षे चालली, तर मराठी निःसशय-मिश्र नव्हे- भ्रष्ट नव्हे- तर अजिबात नष्ट होईल.
मुसुलमानांची संस्कृति मराठ्यांच्या संस्कृतीहून कनिष्ट असतां व फारशी ग्रंथसमूह मराठींतल्यापेक्षां संपन्न नसतां, आणि मराठीतील ग्रंथकारांनीं स्वभाषेला उचलून धरिली असतां, तीनशें वर्षात फारशीने मराठीला गिळंकृत करण्याचा जर घाट घातलेला आपण इतिहासावरून पहातों, तर जेथें राज्यकर्त्यांची संस्कृति मराठ्यांच्या संस्कृतीहून कांहीं बाबतीत निःसंशय श्रेष्ठ आहे, जेथें इंग्रजी ग्रंथसमूह मराठी ग्रंथसमूहाहून सहस्रपट मोठा आहे. व जेथे देशांतील विद्वानांनींहि स्वभाषेला सोडल्यासारखीच आहे, तेथें तीनशेंच्या ऐवजीं शंभर दीडशे वर्षांतच स्वभाषेचा अंत झाल्यास नवल कसचें? मी म्हणतों ह्या विधानांत अतिशयोक्ति बिलकुल नाहीं. चालली आहे अशीच जर स्थिति शंभर दीडशें वर्षे चालेल, तर मराठी भाषेचें दुसरें तिसरें काय होईल?
आणि स्वभाषा नष्ट होणें म्हणजे देशावर केवढी घोर आपत्ति येणें आहे! गेलीं पंचायशीं वर्षे तर आपण बहुतेक फुकट घालविलीं. त्या सगळ्या अवधींत ज्याला प्रतिभासंपन्न म्हणता येईल असा मराठींत एकच ग्रंथकार उदयास आला आणि तोहि दहा पाच निबंध लिहून भर तारुण्यांत मावळून गेला. ह्यापुढें गमाविली गोष्ट पुनः साधावयाची असेल व बुडालों आहो त्याहून जास्त बुडवायचें नसेल, तर स्वभाषेला, म्हणजे स्वतंत्र विचाराला, म्हणजे स्वदेशाला, कायेनें, वाचेनें व मनानें आपण शब्दशः वाहून घेतलें पाहिजे नाहींतर, प्रसंग कठिण आहे!