आता इंग्रजी भाषेच्या सान्निध्यानें मराठी भाषेची काय स्थिति झाली आहे व होईल तें पाहूं.
केवळ ह्या दोन भाषांच्या अंतःस्वभावाकडे पाहिले असतां, इंग्रजीपेक्षां मराठी विकृतिक्षम जास्त आहे व पूर्वगामी शब्दयोगी अव्ययें योजण्याची पद्धति तिच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. तेव्हां ह्या दोन भाषांचा गुण्यागोविंदानें जोड बनणें प्रायः अशक्य आहे. इंग्रजीच्या सान्निध्यानें मराठींत इंग्रजी शब्द व प्रयोग येतील एवढेंच. म्हणजे मराठींत इंग्रजी शब्दाचें व प्रयोगांचे मिश्रण होईल.
परंतु इंग्रजीच्या सान्निध्यानें मराठींत इंग्रजी शब्द व प्रयोग ह्यांचें मिश्रण होईल, ही गोष्ट फारशी उद्वेगजनक नाहीं. ह्या बाबतींत काळजी निराळ्याच त-हेची आहे. ती ही कीं ह्या देशांत इंग्रजीची व्याप्ति इतकी भयंकर होत चालली आहे कीं मराठी मिश्र होण्यापेक्षा नष्ट होण्याचा संभव जास्त आहे.
गेल्या शतकांत ग्वालेरीपासून तंजावरपर्यंत मराठी भाषा प्रचलित होती. नाना फडणिसांचीं हैदर व टिप्पू यांस पत्रें मराठींत जात व महादजी शिंद्यांचा रजपूत राजाशीं व्यवहार मराठींत होई. तसेंच ग्वालेरीपासून तंजावरापर्यंत खासगी व सार्वजनिक दफ्तरें मोडीत व मराठीत लिहिली जात. मराठीची ही व्याप्ति जाऊन तिची जागा आतां इंग्रजीनें घेतली आहे. आतां निव्वळ महाराष्ट्रांखेरीज मराठी इतरत्र कोठें चालत नाहीं. म्हणजे मराठीच्या व्याप्तीचा महाराष्ट्रांच्या बाहेर संकोच झाला आहे.
मराठीचा संकोच महाराष्ट्राच्या बाहेर तर झालाच आहे परंतु, खुद्द महाराष्ट्रांतहि मराठीचा संकोच अतोनात होत आहे. गेल्या शतकांत महाराष्ट्रांत सरकारीं व दरबारी मराठी भाषा विराजत होती. आतां तिच्या जागीं सर्वत्र इंग्रजी झाली आहे.
सरकारी दरबारीं मराठीला मज्जाव झाला ही तर लांछनाची गोष्ट आहेच, परंतु उच्च व मध्यम प्रतीच्या शाळा व पाठशाळा ह्यांतूनहि मराठीचें निष्कासन झालें आहे.
आतां शाळा व पाठशाळा परकीय सरकारच्या ताब्यांत असल्यामुळें तेथें मराठीचा रिघाव नसल्यास कोणाचा उपाय नाहीं. परंतु, सार्वजनिक सभा, खासगी सभा, पुस्तकालयें, प्रांतिक सभा, पेढ्या, ह्यांचेंहि सर्व लिहिणें इंग्रजींतच होऊ लागले आहे. ह्या ठिकाणीं कोणीं मराठींत लिहूं व बोलूं नये असा कोणाचा प्रतिबंध नाहीं. पण देशहिताच्या कल्पना सध्यां इतक्या विपरीत झाल्या आहेत कीं त्याचें स्वरूप काय असतें ह्याचाहि विसर सर्वत्र पडल्यासारखा दिसतो.
पेढ्या, सभा व पुस्तकालयें सार्वजनिक संस्था पडल्याकारणानें तेथें कोणाचा पायपोस कोणाच्याहि पायांत नाहीं. अशी स्थिति असते व इंग्रजी लिहिण्याचा व बोलण्याचा सहजासहजीं प्रघात त्या ठिकाणीं पडत गेला असतो, अशी समजूत कोणी काढील. परंतु भाऊबहीण, बापलेक, स्नेहीसोबती ह्यांच्यांतील खासगी पत्रव्यवहाराहि इंग्रजींतच चालतो. ह्या स्थलीं सार्वजनिक सबब आणतां येणार नाहीं. परंतु इतकें मात्र कदाचित् म्हणता येईल कीं, ह्या लोकांना विचारी लोकांत गणतां येत नाहीं; इंग्रजी लिहिण्याचें ह्या अज्ञ लोकांना कौतुक वाटतें व राष्ट्रहित कशांत आहे हें कळण्याची त्यांना ऐपत नसते, म्हणून असा प्रकार होतो.
परंतु राष्ट्रहित कशांत आहे हें ज्यांस कळतें अशी आपली कल्पना आहे तेहि विद्वान् लोक इंग्रजीच लिहितात व बोलतात. इंग्रजांशीं किंवा सरकारशीं व्यवहार करण्यांत हे लोक इंग्रजींत बोलून थांबते तर ती गोष्ट केवळ न्यायाची होती. पण आश्चर्य हें कीं स्वजनाशीं व्यवहार करतांनाहि हे लोक इंग्रजीच वापरतात. डॉ. भांडारकरांना स्वधर्माविषयीं किंवा सामाजिक सुधारणेविषयीं मुंबईत बोलावयाचें असलें, किंवा न्यायमूर्ति रानड्यांना बकलच्या इतिहासावर नगरास व्याख्यान द्यावयाचें असलें, किंवा रा. कुंट्यांना स्वदेशाभिमानाविषयी खुद्द पुण्यांत भाषण करावयाचें असलें, किंवा प्रो. गोखल्यांना कोल्हापूरच्या मराठ्यांपुढे इंग्लंडची हकीकत सांगावयाची असली, कीं इंग्रजीचा आश्रय केल्याविना बोलण्यास त्यांना उमेदच येत नाहीं.