येथें तीन्ही भाषांत क्रियापदांना विकृति झाली आहे. मराठींत पुस धातूला लें प्रत्यय लागण्यापलीकडे पुरुष व वचन ह्मासंबंधानें जास्त विकृति झाली नाहीं; लिंगांसंबंधानें मात्र झाली आहे. फारशींत पुरुष व वचन ह्या दोन्हीसंबंधानें विकृति झाली आहे. आणि इंग्रजींत ed प्रत्यय लागून द्वितीय पुरुष एकवचनी st प्रत्यय आणीक लागलेला आहे. येणेंप्रमाणें तिन्हीं भाषांत मूळ क्रियापदाला भूतकाळीं विकृति होते. येथें विकृतिराहित्याच्या बाबींत अमुक भाषा पहिली व अमुक दुसरी अशी नंबरवारी लावतां येत नाही.
येणेंप्रमाणें मराठी, फारशी व इंग्रजी ह्या तिन्ही भाषा विकृतीला सोडून चालण्याच्या विचारात आहेत. त्यात इंग्रजीनें विकृतीला बरेच सोडिलें आहे. तिच्या खालोखाल फारशीचा नंबर लागतो. व मराठीनेंहि विकृतीपासून दूर रहाण्याचा कांहीसा अभ्यास केला आहे. परंतु फारशी किंवा इंग्रजी ह्यांच्या इतकी सटकसीतारामी अद्यापि तिनें पत्करिली नाहीं. आतां, १३१८ पासून १६५६ पर्यंत मराठीची फारशीशीं गांठ पडली होती. त्या अवधींत विकृति सोडण्याच्या कामीं फारशीची मराठीला कांहीं मदत झाली कीं काय ते पहावयाचें आहे. द्वितीयेचा ला प्रत्यय, किंवा षष्ठीचा ई उपसर्ग, किंवा अनेक वचनाचा आन् प्रत्यय मराठीला फारशीनें देण्याचा घाट घातला तेव्हा जास्त विकृति मात्र मराठीला फारशीपासून प्राप्त झाली. ह्यापलीकडे अविकृत होण्याला फारशीची मराठीला बिलकुल मदत झाली नाहीं. मराठींतील लिंगें, वचनें, पुरुष ह्यांच्या रूपावर फारशीचा काडीइतकाहि परिणाम झाला नाहीं. ह्याचें कारण असें कीं, फारशींतील पूर्वगामी शब्दयोगी अव्ययें मराठीत रुजून तिचें स्वरूप बदलण्याला सतराव्या शतकांतील राज्यक्रांतीनें वेळ राहिला नाहीं. फारशींतील ग्रंथसमूह व शास्त्रेंहि अशीं नव्हतीं कीं त्यांच्यापुढें तत्कालीन मराठी वाङ्मयानें दिपून व हतप्रभ होऊन मरून जावें. शिवाय, मराठीला त्या तीन शतकांत असे कांही कट्टे ग्रंथकर्ते मिळाले कीं त्यांना, कवडीचीहि अपेक्षा न करिता, केवळ कर्तव्य म्हणून मराठींत ग्रंथरचना करणें अगत्याचें वाटलें. ह्या अनेक कारणांनीं फारशीला मराठी भाषेचे अंतःस्वरूप प्रायः बदलतां आलें नाहीं. ज्ञानेश्वरापासून आतांपर्यंत म्हणजे १२९० पासून १९०३ पर्यंत मराठी भाषा हळूहळू विकृतीपासून परावृत्त होत आहे, परंतु ती तशी आपल्याच छंदाने होत आहे. ज्ञानेश्वरीसंबंधानें विवेचन करतांना ह्या स्वच्छंदवृद्धीचा वृत्तान्त देण्याचा विचार आहे.
वरील उदघाटनावरून एवढें निष्पन्न झालें कीं, फारशीं भाषेच्या अंतःस्वरूपाचा मराठी भाषेच्या अंतःस्वरूपावर म्हणण्यासारखा परिणाम घडला नाहीं. तीनशें वर्षांच्या जबरदस्तीनें मराठीचें अंतःस्वरूप वस्तुतः बदलावयाचें; परंतु हा बदल होण्याचा ओघ चार कारणांनीं थांबला, (१) मराठी भाषेचा स्वतःचा स्वभाव, (२) मराठी ग्रंथकारांचे प्रयत्न, (३) महाराष्ट्रांतील हिंदुधर्म, व (४) मराठ्यांनी सतराव्या शतकांत केलेली राज्यक्रांति. आतां यद्यपि मराठीचें अंतः स्वरूप फारशीच्या सान्निध्यानें बदललें नाहीं, तत्रापि तिच्या बहिःस्वरूपावर ह्या सान्निध्याचा बराच परिणाम झालेला आहे. उभयान्वयी अव्ययें, शब्दयोगी अव्ययें, उद्गारवाचक अव्ययें, सर्वनामें, विशेषनामें, क्रियाविशेषणें, विभक्तिप्रत्यय, इतर हजारों शब्द आणि प्रयोग, फारशींतून मराठींत आलें आहेत. हा परिणाम फारशी संस्कृतीचा मराठी संस्कृतीवर ठळक असा झाला आहे. मुसुलमान लोकांची संस्कृति महाराष्ट्रांतील लोकांच्या संस्कृतीहून त्यावेळीं बरीच कमी दर्जाची होती. त्यामुळें धर्म, शास्त्रें, कायदे, कविता, साहित्य, वगैरे सरस्वतीच्या प्रांतांत फारशीचा शिरकाव म्हणण्यासारखा झाला नाहीं. व्यवहारांत मात्र फारशी शब्दांचा भरणा फार झाला. व त्याचा ठसा मराठीवर इतका बेमालूम बसला आहे कीं, जोपर्यंत मराठी भाषा ह्या भूमंडळावर बोलली जाईल, तोंपर्यंत मुसुलमानाचें राज्य महाराष्ट्रावर कांहीं शतकें होतें, हें तींतील फारशी शब्द, प्रयोग व विभक्तिप्रत्यय ह्यांवरून कळून येईल.
ह्या तीनशें वर्षांच्या गुलामगिरीनें मराठीला फायदा काय झाला? एकंदर विचार केला असतां म्हणण्यासारखा फायदा काहींच झाला नाहीं. मराठींत एकाच अर्थाचे अनेक शब्द आले आणि तिची अर्थप्रदर्शक शक्ति व्यवहाराच्या प्रांतांत जास्त वाढली. ह्यापलीकडे मराठी भाषेला फारशीच्या सान्निध्यानें जास्त फायदा कांहीं झाला नाहीं. मोडी लिहिण्याची पद्धति हेमाडपंतानें मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत होण्याच्यापूर्वीच सुरू केली होतीं आणि बखरी लिहिण्याची पद्धति मुसुलमानांचें राज्य अस्तंगत झाल्यानंतर म्हणजे १६५६ नंतर प्रचारांत आली. खुद्द मुसुलमानांचें राज्य असतांना ह्या दोन्ही पद्धती अस्तित्वांत आल्या नाहींत. तेव्हां त्यांचें श्रेय मुसुलमानांना देता येत नाहीं.