ह्या साधु व ग्रंथकार सुधारकांनीं तत्कालीन राज्यकर्त्यांचे व कुधारकांचे विचार हाणून पाडण्यास खालील मार्ग स्वीकारले. मुसुलमानांच्या करड्या अमलाखालीं राजकीय लेख लिहिण्याची किंवा राजकीय कृत्यें करण्याची सोयच नव्हती. पूर्वीचे जे जाधव राजे त्यांचे इतिहास व बखरीहि लिहून काम भागण्यासारखें नव्हतें. जाधवांचे राज्य मुसुलमानांच्या हातीं गेलें तें राष्ट्रांत सुखैकपरायणता, आलस्य, मत्सर, हलगर्जीपणा, बेसावधपणा वगैरे दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला असल्याविना गेलें नाहीं हें उघड आहे. जाधवांच्या राजवटीच्या शेवटल्या पांचपन्नास वर्षांचा इतिहास यथातथ्य लिहावयाचा म्हणजे हे सर्व दोष उघड करून दाखविले पाहिजेत. आणि हे दोष उघड करून दाखविले म्हणजे त्या उघडकीनें शहाणपणा शिकावयाचा सोडून देशांत कित्येक प्राणी असे असतात कीं अन्योन्य द्वेष करण्यासच त्या उघडकीचा त्यांना उपयोग होतो. स्वदेशाच्या इतिहासाचें सूक्ष्मपणें मनन करून व त्यांत दाखविलेल्या गुणदोषांतून गुणांचें ग्रहण व दोषांचा त्याग करून, स्वदेशाच्या कल्याणाचा मार्ग न स्वीकरितां, दोषांकडेच तेवढी दृष्टि देऊन, आपले पूर्वज मूर्ख होते व ते एकमेकांचा मत्सर करीत होते, तेव्हां आपणहि हाच मत्सर असाच पुढें चालविला पाहिजे, अशी कुढी व देशबुडवी भावना कित्येक कलिपुरुषांच्या मनात प्रादुर्भूत होते. तेव्हां जाधवांच्या बखरी किंवा चरित्रें लिहिण्याच्याहि भरीस ते प्रायः पडले नाहींत. राज्यकर्त्यात व आपणांत जातिसंबंधानें व आचारासंबंधानें ज्या बाबींत विशेष भेद मूळापासूनच होता त्या धर्माची कास ह्या साधुग्रंथकारांनीं धरली. आचारानें व धर्मानें राज्यकर्त्यांसारखे होऊन व त्यांच्याशीं तादात्म्य पावून राष्ट्रत्व नष्ट होतें हें ते पक्केपणीं जाणत होते. तेव्हां धर्माच्या बाबतींत जित व जेते ह्यांत मूळचा जमीनअस्मानाचा भेद होताच, तो त्यानीं आपल्या ग्रंथांत आणून स्वराष्ट्रत्व कायम ठेविलें. इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंतच्या ग्रंथकारांनीं धर्मासंबंधीं ग्रंथरचना मराठींत कां केलीं त्याचें हें रहस्य आहे. तसेंच बखरी व इतिहास न लिहितां त्यांनीं भारत, भागवत व रामायण ह्यांचेच अनेक अनुवाद केले. त्याचें कारण असें आहे कीं, त्यापासून राष्ट्रांतील कुधारकांना परस्पर उखाळ्यापाखाळ्या काढण्यास तर संधि मिळत नाहीं आणि इतिहासाच्या अध्ययनापासून जो नैतिक फायदा व्हावयाचा तो तर बराच होतो. महाराष्ट्रांत १६५६ च्या पुढें बखरी निर्माण कां झाल्या व त्याच्या आधीं भारत व रामायण ह्यांतील कथाच मराठींत प्रचलित कां होत्या, त्याचें कारण हें आहे. भारत, रामायण व धर्म ह्यांवर झालेले मराठी ग्रंथ महाराष्ट्रांत गांवोगांव वाचीत आणि त्यांतील भाषा व्यवहारांतील फारशीमिश्रित मराठी भाषेला आवरून धरी. सारांश, साधुसंतांचे ग्रंथ म्हणजे त्यावेळच्या फारशीमिश्रित धेडगुजरी मराठी बडबडीवर केवळ रामबाण औषध होतें
(१०) फारशीच्या संसर्गानें बिघडण्यापासून मराठी भाषेला हिंदुधर्मानेंहि राखिलें. जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर, येथील गोंधळी, बाळसंतोष, भाट, चित्रकथी, व भुत्ये तसेच गांवोगांवचे पुराणिक, हरदास व लळितकार, ह्यांची भाषा शुद्ध मराठी असे महाराष्ट्रांतील खालच्या प्रतीच्या रंगेल लोकांचीं एकच वाङ्मयात्मक करमणूक म्हटली म्हणजे श्रृंगारिक व भेदिक लावण्या म्हणण्याची व ऐकण्याची. त्यांचीहि भाषा त्यावेळी शुद्ध मराठी असे. बायकांच्या कहाण्या व पुरुषांच्या भूपाळ्या ह्यांच्यासारखी शुद्ध मराठी तर दुस-या कोंठेच नाहीं. संभावित लोक व वारकरी लोक अभंग व पदें म्हणत व तीं बरींच शुद्ध असत. सामान्य लोकांचें धार्मिक व इतर वाङ्मय हें असें शुद्ध जुन्या मराठींत सांठलें गेल्यामुळें, व्यवहारांत जो त्यांच्या तोंडाला फारशीचा विटाळ होत असे तो बराच धुतला जाई.
इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंत फारशीच्या सान्निध्यानें मराठी भाषेंत जे फेरफार झाले त्यासंबंधीं येथपर्यंत चार शब्द सांगितले. आतां, ह्या सान्निध्यापासून मराठीला तोटा झाला किंवा नफा झाला हें पाहणे फार हिताचें आहे. कारण दैवगतीनें मराठीची सध्यां एका यूरोपियन भाषेशीं गांठ पडली आहे. तेव्हां त्या गांठींतून रूपभंग न होता ती कशीं निभावून नेता येईल ह्याचा अंदाज ह्या पहाण्यापासून थोडीबहुत होणार आहे.
फारशीच्या सान्निध्यापासून मराठीला तोटा झाला किंवा नफा झाला हें पहावयाचें म्हटलें म्हणजे, ह्या दोन भाषांच्या मूळ स्वभावाची परीक्षा केली पाहिजे; इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंतच्या काळांत ह्या दोन्ही भाषा, भाषांच्या प्रगतीचे जे चार वर्ग आहेत, त्यांपैकीं कोणत्या वर्गांत होत्या हें पाहिलें पाहिजे; आणि ह्या दोन्ही भाषा बोलणा-या लोकांचीं संस्कृति कोणत्या दर्जाची होती हीहि बाब हिशेबांत घेतली पाहिजे.