(९) फारशीच्या जबरदस्तीनें मराठी भाषा छिन्नभिन्न न होण्याला चवथें कारण म्हटले म्हणजे चौदाव्या, पंधराव्या व सोळाव्या शतकांत झालेले मराठी ग्रंथकार होत. दरबारांत व व्यवहारांत जी मराठी भाषा चाले, तीत यद्यपि फारशी शब्द व प्रयोग बेसुमार शिरले. तत्रापि मराठी ग्रंथकारांच्या ग्रंथांत जेवढे म्हणून कमी फारशी शब्द प्रयोग येतील, तितके आले आहेत. जो शब्द किंवा प्रयोग सामान्यजनसमूहाच्या वापरण्यानें अत्यंत रूढ होऊन गेला, तोच तेवढा ह्या ग्रंथकारांनीं आपल्या ग्रंथांत येऊं दिला. आणि तोहि नियमानें येतच असे, असा प्रकार नाहीं. ला हा फारशी प्रत्यय नामदेवाच्या ग्रंथांत कित्येक ठिकाणीं आलेला आहे; परंतु एकनाथाच्या ग्रंथांत ह्याचा प्रयोग क्वचितच होतो. मागें एकनाथाची अर्जदास्त दिली आहे, तींत अत्यंत रूढ झालेले फारशी शब्द व प्रयोग आले आहेत, हें वाचकांच्या लक्षांत येईल. शिवाय, नरदेहाच्या शाक्त्यांवर रूपक करण्याच्या ओघांत, एकनाथानें तत्कालीन लहानमोठ्या मुसुलमान अधिका-यांचे स्वभाववर्णन केलेलें आहे व हें स्वभाववर्णन करतांना त्याला त्या त्या अधिका-याचें फारशी नांव आणणें जरूर पडलें. एकनाथाच्या भागवतांत किंवा रामायणांत त्याच्या अर्जदास्तीतल्या प्रमाणे फारशी शब्द नाहीत. दासोपंत, मुक्ताबाई, मुंतोजीबोवा, उद्धवचिदघन वगैरे तत्कालीन ग्रंथकारांच्याहि ग्रंथांत फारशी प्रयोग व शब्द अत्यंत कमी आहेत. ह्या सर्व ग्रंथकारांची भाषा जुनी मराठी आहे. आतां कालान्तरानें प्रत्येक भाषेंत सहजपणानें दर शंभर वर्षांत जो फेरफार होत जातो तो ह्या तीनशे वर्षांतील निरनिराळ्या काळी झालेल्या ग्रंथकारांच्या ग्रंथांत झाला आहे. परंतु फारशींपासून जितकें अलिप्त रहावेल तितके हे ग्रंथकार राहिले आहेत. ह्याचा परिणाम असा झाला कीं मराठी भाषेत आतल्याआंत दोन भाषा झाल्या, एक साधुग्रंथकारांची बिनफारशी भाषा व दुसरी व्यवहारांतील फारशीशब्दमिश्रित भाषा. उदाहरणार्थ, शिवाजीच्या वेळच्या किंवा पूर्वीच्या दरबारी पत्रांतील भाषा घ्या व ती तुकारामाच्या किंवा वामनाच्या किंवा रामदासाच्या भाषेशीं तोलून पहा, म्हणजे ही ग्रंथकारांची मराठी भाषा एक निराळीच होती हें लक्ष्यांत येईल. तत्कालीन मराठी ग्रंथकारांची भाषा दरबारी मराठी भाषेहून भिन्न होण्याचें कारण असें होतें कीं, ह्या ग्रंथकारांच्या ग्रंथांचे विषय, दरबारांतील किंवा व्यवहारांतील विषयांहून निराळे होते. ह्या ग्रंथकाराच्या ग्रंथांचे विषय प्रायः धर्म, वेदान्त व पुराणेतिहास, ह्यांपैकीं कोणता तरी एक किंवा सर्व असत. ह्या विषयांत फारशी शब्दांचा व प्रयोगांचा उपयोग करण्याची जरूर नसे. त्यांचें जगच निराळें असे. त्यामुळें ह्या ग्रंथकारांच्या ग्रंथांत मराठीचें मूळ, अस्सल व शुद्ध असें रूप कायम राहिलें. हे ग्रंथकार मुळीं झालेच नसते तर फारशी शब्दांचे व प्रयोगांचें जींत संख्याधिक्य आहे अशी मराठी राहिली असती. अशा मराठीस मराठी ही संज्ञा राहती किंवा नाहीं हाच प्रश्न आहे. साक्सनची फ्रेंचमुळें जशी इंग्रजी बनली किंवा हिंदीची फारशीमुळे जशी उर्दू बनली तशी मराठीची एखादी निराळीच भाषा बनती. आणि निराळी भाषा बनल्यावर मराठ्यांचें राष्ट्र असे शब्द वापरतां आले नसते. इतकेंच नव्हे, तर हे ग्रंथकार न होते, तर सतराव्याः शतकांत महाराष्ट्रांत झालेली स्पृहणीय राज्यक्रांति झालीच नसती.
मराठी भाषा फारशीच्या कचाटींतून शाबूत राहण्याला हे ग्रंथकार व त्यांच्या ग्रंथांतील विषय कारण झाले म्हणून वर प्रतिपादन केलें आहे. हा प्रकार कसा झाला त्याचा पुढें खुलासा करतों. कोणत्याहि देशावर परराज्य आलें म्हणजे त्या देशांतील लोकांचें चरित्र नानाप्रकारें संकुचित होतें. हा संकोच लैकिक म्हणून जे सर्व व्यवहार आहेत त्यांत भांसू लागतो. सार्वजनिक बोलणें, सार्वजनिक लिहिणें, सार्वजनिक कृत्यें करणें ह्या सर्व बाबतींत राज्यकर्त्यांच्या भाषेचा व कृत्यांचा संचार होतो. तो इतका उत्कट होतो की देशी भाषेंत बोलणें व देशी त-हेनें चालणें गौण, लाजिरवाणें तिरस्करणीय आहे असें देशांतीलच लोकांपैकीं कांहीस वाटू लागतें; व ते स्वदेशांतील चांगल्याहि संस्थांना वाईट समजूं लागतात. स्वदेशांतील पोषाकाची त-हा, स्वदेशांतील घरें बांधण्याची त-हा, स्वदेशांतील भाषेची त-हा, स्वदेशांतील धर्माची त-हा, स्वदेशांतींल काव्यांची त-हा, वगैरे सर्व गोष्टी त्यांना त्याज्य वाटतात व परकीय राज्यकर्त्यांच्या वाईट व चांगल्या अशा सर्वच त-हा संग्राह्य भासूं लागतात. उघडच आहे, राज्यकर्त्यांनीं राज्य मिळविलेलें असतें, तेव्हां त्यांच्यांत चांगले गुण असल्यावांचून तें त्यांना मिळवितां आले नसावें असा सिद्धांत लोक सहज करतात. तसेंच, देशांतील लोकांनीं राज्य घालविलेलें असतें, तेव्हां त्यांच्यांत वाईट गुण असल्यावांचून तें त्यांनीं गमाविलें नसलें पाहिजे, असाहि दुसरा सिद्धान्त सहज उत्पन्न होतो. व ह्या दोन सिद्धान्तांची सांगड घालून देशांत कित्येक कुधारक निपजत असतात. ह्या कुधारकांचा समज असा असतो कीं, राज्यकर्त्यांची भाषा, धर्म, पोषाख, व इतर संस्था स्वीकारल्या असतां, आपण राज्यकर्ते, निदान राज्यकर्त्यांप्रमाणें तरी, होऊं. ह्या खोट्या समजावर वाहवत जाऊन, हे लोक देश, धर्म व भाषा ह्या तिहींची अवनति करण्यास कारण होतात.