(५) फारशींतील कित्येक भारदस्त शब्दांचा मान न राखतां वाटेल तसा उच्चार करून ते मराठींत घेत. पाच्छा, पैजार, माया [पैसा], अबळा, पैरण, खर्चवेच, तक्कया, बबर्ची हे मराठी शब्द फारशी शब्दांच्या उच्चारांच्या हालअपेष्टा करून घेतले आहेत.
मराठीनें हे जे आपले संस्कार फारशी शब्दांवर चालविले त्यांच्यामुळें ह्या फारशी शब्दांचा नूर उतरून गेला व ते इतर मराठी शब्दांप्रमाणें वापरले जाऊं लागले. जिंकणा-या लोकांची फारशी भाषा असतांहि मराठींचे माहात्म्य रहाण्याला मराठीचे व मराठ्यांचे कांहीं गुण कारण झाले. ते गुण येणेंप्रमाणें:-
(६) मुसुलमानी अंमल सुरू झाला तेव्हां प्रथम कांहीं वर्षे सरकारी दफ्तर फारशींत लिहीत असत. परंतु गांवें, पुरुष, स्त्रिया, शेतें, वगैरेंची विशेषनामें फारशींत लिहल्यानें त्यापासून फार घोटाळा होऊं लागला. फारशी अक्षरमालिका इंग्रजी अक्षरमालिकेप्रमाणेंच अत्यंत अपूर्ण आहे. तींत कांही उच्चारांना फाजील अक्षरें आहेत व ब-याच उच्चारांना अक्षरेंच नाहींत. शिवाय, फारशींत हा एक मोठा दोष आहे कीं, तिच्या अक्षरमालिकेंत अ, इ, उ, ऋ, ऐ, वगैरे स्वरांना अक्षरें नाहींत. त्यामुळें फारशी शिकस्ता नांवाच्या मोडी म्हणजे जलद लिहिण्यांत कोणत्या अक्षराला कोणता स्वर लावावयाचा, हें ठरवितां येत नाहीं. हा दोष परभाषेंतील विशेषनामें फारशींत लिहितांना तर फारच भासमान होतो. उदाहरणार्थ, सफर अशी तीन अक्षरें जर फारशींत काढली व त्याचा एक शब्द बनविला, तर त्याचे सफर, सिफर, सफिर, सुफर, सफुर, सिफिर, सुफिर, सिफुर, सुफुर असे अनेक उच्चार होतील. ही अडचण मराठी विशेषनामें लिहिण्यांत फार येऊं लागल्यामुळें, दरबारी जाहीरनामे पुरशिसा, चकनामे, निवाडे, दानपत्रें वगैरे लिहिण्यांत वर फारशी व खालीं मराठी भाषेचा उपयोग होंऊ लागला. मराठीची लिपि देवनागरी असल्याकारणानें, तिचें श्रेष्ठत्व, फारशीहून जास्त भासूं लागलें; व दरबारी लिहिण्यांतहि मराठीचा प्रवेश झाला. दरबारी लिहिण्यांत मराठीचा प्रवेश झाल्यामुळें, तींत पुष्कळ फारशी शब्द शिरले हें खरें आहे. परंतु दरबारांत शिरल्यापासून तिला एक फायदा झाला. तो हा कीं, ती एकीकडे कुजत पडावयाची राहून, तिच्यांत केव्हां तरी उर्जित होण्याची शक्यता राहिली. शिवाय, दरबारांत शिरल्यापासून मराठीला दुसरा एक फायदा झाला. मराठ्यांनी सतराव्या शतकांत स्वराज्य स्थापिलें व सर्वत्र मराठींत लिहिणे सुरू केलें. त्यावेळी दरबारांतील सर्व लिहिणें मराठींत लिहितां येण्यास मुळींच अडचण पडली नाहीं. कारण, सर्व दरबारी शब्द व पद्धती सतराव्या शतकाच्या सुमाराला मराठींत रूढ झाल्या होत्या. दरबारी लिहिण्याचे शब्द मराठींत नाहींत, अशी अडचण शिवाजीच्या वेळेस पडली नाहीं. तर फारशीच्या संसर्गानें मराठीत जे फारशी शब्द दुहेरी झाले होते. ते काढून कसे टाकावे, ही अडचण त्यावेळीं पडली. ही अडचण दूर करण्याकरितां राजव्यवहारकोश तयार करावा लागला.
(७) दरबारांत मराठी भाषा प्रचलित रहाण्याला दुसरें कारण देशस्थ ब्राह्मणांची फर्डी कारकुनी होय. प्रथम जेव्हां महाराष्ट्रांत मुसुलमानी झाली, तेव्हां जाधवांच्या राजवटींतील सर्व पद्धती मुसुलमान अधिका-यांना ब्राह्मण कारकुनांपासून शिकाव्या लागल्या. मजजवळ जमाखर्च लिहिण्याच्या व वसूलबाबींच्या यादीच्या कांहीं जुन्या हेमाडपंती पद्धती आहेत. त्या जुन्या मोडींत लिहिलेल्या आहेत. हें हेमाडपंताचें दफ्तर ब्राह्मण कारकुनांकडून मुसुलमान अधिका-यांना समजून घ्यावें लागे. पुढे पुढें तर अशी स्थिति झाली कीं, ही जुनी पद्धत समजून घेण्याची व हिशेब ठेवण्याची यातायात मुसुलमान अधिका-यांनी ब्राह्मण कारकुनाकडेसच सोपविली. अहमदनगर व विजापूर येथील मुख्य दफ्तरदार ब्राह्मण होते. येणेंप्रमाणें फारशीच्या बरोबर मराठी भाषा दरबारांत अंशतः प्रचलित करण्यास ब्राह्मणांची फर्डी कारकुनी कारण झाली, ही महाराष्ट्रांतील कारकुन मंडळीना मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
(८) फारशीनें मराठीला नेस्तनाबूत केलें नाहीं, ह्याला तिसरें एक कारण झालें. महाराष्ट्रांतील कोट्यवधि लोकसंख्येंत राज्यकर्त्या मुसुलमानांचें प्रमाण शेंकडा एकहि नव्हतें. बाट्यांची संख्या वाढल्यावर हें प्रमाण किंचित् वाढलें. परंतु त्याबरोबर बाट्यांच्या बोलण्यांतील मराठी शब्दांच्या वैपुल्याचाहि परिणाम अस्सल मुसुलमानांवर झाला. ह्या परिणामाची मर्यादा पुढें पुढें तर इतकी वाढली कीं, दक्षिणेंतील मुसुलमान पादशहा व त्याचें अधिकारीमंडळ फारशी बोलावयाचें सोडून दक्षिणी उर्दू बोलूं लागलें. दक्षिणी उर्दू म्हणजे जींत मराठी शब्द पुष्कळ आहेत अशी उर्दू भाषा.