मुसुलमानांच्या अमदानींत मराठी भाषेवरती केवढें घोर संकट आलें होतें त्याची यथार्थ कल्पना उतरण्यास एक अलीकडील प्रत्यंतर देतों. इंग्रजीचा मराठीला संसर्ग होऊन आज बरोबर पंचायशी वर्षे झालीं. ह्या अवधींत मराठीनें इंग्रजी शब्द व प्रयोग बरेच घेतले. ह्या प्रतिग्रहानें मराठीचें अंतःस्वरूप अद्यापि बदललेलें नाहीं व तिच्या स्वभावांतहि बिलकुल फेर पडला नाहीं. परंतु समजा कीं, and व that हीं उभयान्वयी अव्ययें, किंवा of, to, for, वगैरे पूर्वगामी शब्दयोगी अव्ययें, मराठींत योजिली जाऊं लागली, आणि इंग्रजी धर्तीवर मिशनरी लोकांप्रमाणें वेडेबागडे उच्चार व स्वर मराठी बोलण्यांत आपण आणूं लागलों. असा प्रकार अद्यापि झाला नाहीं व पुढेंहि होईल असें चिन्ह दिसत नाहीं. परंतु, समजा की, दुर्दैवानें असा प्रकार झाला. तर मराठी भाषेची जी स्थिति होईल असें आपणास वाटतें, तीच मुसुलमानी अंमलांत साक्षात् होण्याची वेळ आली होती. of, to, for, by हीं पूर्वगामी अव्ययें मराठी शब्दांच्या पाठीमागें योजावयाचीं म्हणजे विभक्तिप्रत्ययांना फांटा दिला पाहिजे. विभक्तिप्रत्ययांना फांटा दिला म्हणजे शब्दांचें सामान्यरूप करण्याची जरूर राहिली नाहीं. सामान्यरूप लुप्त झालें व विभक्तिप्रत्यय गमावले म्हणजे वाक्यरचना व क्रियापदप्रयोगहि बदलले पाहिजेत. असे एक ना दोन, शेंकडों बदल भाषेंत होऊन, मूळ भाषा कोणत्या थरावर जाईल, ह्याचा पत्ताच राहणार नाहीं. जी दशा नार्मन-फ्रेंच भाषेच्या दपटशाखालीं साक्सन भाषेची झाली, म्हणजे विभक्ति, वचन, लिंग, वगैरेंच्या प्रत्ययांचा लोप होऊन, सध्यांचीं इंग्रजी जशी तुटक भाषा झाली, तशी मराठी होईल. सरांश, असा प्रकार झाला असतां मराठीचा मराठीपणा जाईल व इंग्रजांच्या साक्सन भाषेचीं अधोगति तीस प्राप्त होईल. ही अधोगति चवदाव्या, पंधराव्या व सोळाव्या शतकांत मराठीला येत होती; व ती अनेक कारणानीं टळली. ह्या कारणाचा निर्देश खालीं करतो.
(१) वर अनेक स्थलीं उल्लेख केल्याप्रमाणें फारशीच्या संसर्गानें होणारी मराठीची अधोगति सतराव्या शतकांत झालेल्या व सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊं घातलेल्या राज्यक्रांतीनें टळली. मराठी भाषेवर येंऊं घातलेल्या संकटांचीं जीं अनेक निवारक कारणें आहेत, त्यांपैकीं हें कारण मोठें महत्त्वाचें असून शेवटचें होते.
(२) फारशीची व्याप्ति मराठीवर होऊं लागली असतां, मराठीनेंहि आपली छाप फारशी शब्दांवर ठेवून दिली. वर इसवी सन १५४१ व १५५८ तील दोन लेख दिले आहेत. त्यांत बीतपसीलु, नीमु, कारकून्, अशीं मराठी रूपें बितपसील्, नीम, ऐन्, कारकून् ह्या फारशी शब्दांना दिलेलीं आहेत. फारशी व्यंजनान्त शब्दांना उ हा प्रत्यय महाराष्ट्रांतील लोक लावीत. उ हा प्रत्यय मराठींतून जसजसा जात चालला, तसतसा अ हा प्रत्यय फारशीतील व्यंजनान्त शब्दांना मराठींत लागूं लागला. उदाहरणार्थ, कारकून् हा फारशी व्यंजनांत शब्द, उ प्रत्ययाचा लोप झाल्यानंतर, कारकून असा लिहिण्याचा प्रघात पडला. कारकून हा शब्द अकारान्त आहे, हें त्याला विभक्तिकार्य होत असतांना स्पष्ट होतें. जर कारकून हा शब्द मराठींत व्यंजनांत असता, तर त्याचें चतुर्थीचें रूप कारकुनाला असें न होतां कारकूनला [रा] असें झालें असतें. इंग्रजींतील जे व्यंजनांत शब्द मराठींत रूढ झाले आहेत, त्यांनाहि मराठींत घेण्यापूर्वी हा अ प्रत्ययाचा शिक्का मिळत असतो; जसें, बुक, बुकाला [बुकला नव्हे].
(३) वर सांगितल्याप्रमाणें फारशी शब्द मराठींत घेतल्यावर, त्याला दुसराहि एक संस्कार घडत असे.स्त्री-पुरुषवाचक शब्दांखेरीज फारशींत इंग्रेजी किंवा कानडी ह्या भाषांप्रमाणें इतर शब्द नपुंसकलिंगी असतात. मराठीचा प्रकार जर्मन किंवा संस्कृत ह्या भाषांप्रमाणें फारशीहून निराळा आहे. प्रत्येक शब्दाची प्रथम जात ठरवून, व त्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, किंवा नपुंसकलिंगी बनवून, नंतर त्याच्याशीं विभक्तीचा व्यवहार करावयाचा, असा मराठीचा कायदा आहे. फारशींतील नपुंसकलिंगी हजामत्, सफर, नजर हे शब्द मराठी्त स्त्रीलिंगी ठरवले गेले. तसेंच बाग, पायपोस, खुर्दा, वगैरे नपुंसकलिंगी फारशी शब्द मराठींत पुल्लिंगी बनविले गेले. हा दुसरा शिक्का मिळविल्यावर कोणताहि फारशी शब्द बहुतेक संव्यवहार्य झाला, अशी व्यवस्था होती.
(४) परंतु हे दोन शिक्के घेतल्यावर सगळेच शब्द संव्यवहार्य होत असें नसे. ज्या फारशी शब्दांत हय्, खय्, अयन्, घयन् व काफ ह्या अक्षरांचे कंठ्य उच्चार येत त्यांना देवनागरी ह, ख, अ, व घ उच्चारांची दीक्षा देऊन मग मराठींत घेत. हलवाई, खरीफ, काफला, घारत, कत्तल, अयनेमहाल, ह्या फारशींतून मराठींत आलेल्या शब्दांत हय्, खय्, अयन्, घयन्, व काफ् ह्या अक्षरांचे उच्चार मूळ फारशी शब्दांतल्याप्रमाणें नाहींत. हीं अक्षरें फारशींत घशांतून उच्चारतात. मराठींत वर लिहिल्याप्रमाणें उच्चारीत मीवह्, खरबूजह् ह्या शब्दांचा मराठीत मेवा, खरबूज असा आकारांत व अकारांत उच्चार करीत, क्वचित् खरबुजि असाहि उच्चार होत असे.