मराठीत विशेषण प्रायः विशेष्याच्या आधीं येतें, फारशींत आधींहि येतें व मागूनहि येतें विशेषण विशेष्याच्या पुढें घालण्याची चाल मराठीनें कित्येक स्थलीं फारशीपासून उचलली आहे. इसम मजकूर, पंडित मशारनिले, राव अजम, वडगांव बुद्रुक, नांदगाव खुर्द, बिरादरबुजुर्ग, आंग्रे वजारतमाब, गायकवाड सेनाखासखेल, इंग्रज बहादर, इष्टूर फाकडा, शिकंदर सानी, सालगुदस्त, वतनरोबस्त, हुजरात कुली, वगैरे प्रयोगांत विशेष्य आधीं व विशेषण मागून घालण्याची चाल मराठींत अगर्दी रूढ होऊन गेली आहे. ती इतकी कीं ह्या प्रयोगांत विभक्तिप्रत्यय व सामान्यरूपाचें विकरण विशेष्यास न लागतां विशेषणास लागतात; जसें, इसम मजकुरास, सालगुदस्तां, इंग्रज बहादरास, वगैरे ज्या दोन शब्दांच्या मध्यें षष्ठीची ई असते, त्या दोन शब्दांस विभतिप्रत्यय लावावयाचा असल्यास दुस-या शब्दास तो लावला लातो. जसें, बंदर ई सुरत, बंदर सुरतेस; बंदर ई राजापूर, बंदर राजापुरी; शहर ई पुणें, शहर पुण्यास; वगैरे.
मुसुलमान पातशहांच्या अमदानींत इ. स. १३१८ पासून इ. स. १६५६ पर्यंत फारशी भाषेच्या संसर्गानें मराठी भाषेच्या रूपांत काय काय फेरफार झाले. त्याचा वृत्तांत हा असा आहे. ह्या अवधींत व्यवहारांतील शेकडों फारशी शब्दानीं मराठींत कायमचें ठाणें दिलें. नामांचे व क्रियापदाचें जोड बनविण्याच्या ज्या फारशी पद्धती आहेत, त्यांच्या धर्तीवर शेंकडो प्रयोग मराठींत रूढ झाले. कित्येक फारशी सर्वनामें, क्रियाविशेषणें, उभयान्वयी अव्ययें व उद्गारवाचक शब्द मराठीशीं एकजीव बनून गेले. जीं शब्दयोगी अव्ययें मराठींतील पश्चाद्गामी शब्दयोगी अव्ययाप्रमाणें योजतां येण्यासारखीं होतीं, तीं मराठींत राजरोसपणें प्रविष्ट झालीं. तसेंच, जीं शब्दयोगी अव्ययें पूर्वगामी होतीं, त्यांनाही मराठीनें अद्यापि कांहीं संकुचित प्रदेशांत वावरण्याच्या बोलीवर राहू दिलें आहे. दोन फारशी विभक्त्या मराठींत येऊ पाहत होत्या. पैकीं फारशी षष्ठीच्या ईला प्रायः कायमची गचांडी मिळाली असून, द्वितीयेच्या ला (रा) ला मराठींने उदार आश्रय दिला आहे. शिवाय, व्यंजनान्त शब्द उचारण्याची दुष्ट खोडहि मराठीनें फारशीच्या संगतीनें उचलली आहे. आन् प्रत्यय लावून शब्दांचें अनेकवचन करण्याचाहि बेत मराठीचा होता परंतु शिवाजी व रामदास यानीं वेळींच दाबल्यामुळें, हें एक आणखी लचांड तिनें लावून घेतलें नाहीं. जर आणखी तीनशें वर्षे म्हणजे इ. स. १९०० पर्यंत मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत रहातें, तर मराठी येथून तेथून सर्व फारशीं पेहरावच करती यांत संशय नाहीं. ह्या विधानाची सत्यता कोणाच्या हृदयाला कदाचित् जशी भासावी तशी भासणार नाहीं. म्हणून साडेतीनशें वर्षांच्या अवधींत पृथ्वीवरील इतर कित्येक भाषांची परराज्याखालीं दैना काय झाली त्याची हकीकत देतों.
परराज्याखालीं भाषेची दैना काय होतें. हे पहावयाचें असल्यास फार दूर जावयाला नको. इंग्लंडांत इसवीच्या दहाव्या शतकांत साक्सन लोक रहात होते; त्यांच्या भाषेला आंग्लोसाक्सन् असें नांव आहे. ह्या साक्सन लोकांना नार्मन लोकांनी इ. स. १०६६ त जिंकिलें. नार्मन लोक फ्रेंच भाषा बोलत असत. इंग्लंडांत नार्मन लोकांचे राज्य झाल्यापासून सरकारदरबारांत फ्रेंच भाषा सुरू झालीं. कायदे, कानू, वगैरे सर्व लिहिणें फ्रेंच भाषेंत होऊं लागलें व आंग्लोसाक्सन भाषा मागें पडलीं. इंग्लंडांत ह्या फ्रेंच भाषेचा अंमल तीनशें वर्षे होता. तेवढ्या अवधींत साक्सन भाषा अगदीं बदलून गेली. नार्मन शब्दांच्या दडपणाखालीं साक्सन भाषा केवळ दडपून गेली एवढेंच नव्हे, तर तिचें अंतः स्वरूपहि छिन्नभिन्न झालें. विभक्तिप्रत्यय प्रथम नाहींसे होऊ लागले. नंतर अंत्यस्वरांनी पोबारा केला. क्रियापदांचीं निरनिराळ्या काळांचीं रूपे नष्ट झालीं. साक्सन भाषेंत अंतःस्वर बदलून अनेकवचनें होत असत, तीं तशीं व्हावयाचीं थांबलीं. विशेषणांवर विभक्तिकार्य होइनासें झालें. is किंवा es प्रत्यय लावून षष्ठीचें एकवचन होत असे, तें नुसते s लावून होऊं लागलें व त्यांचेहि बहुतेक सर्व कार्य of किंवा to ह्या शब्दयोगी अव्ययांच्या योगेंच साधण्याची पद्धति पडली. ene प्रत्यय लागून षष्ठीचें अनेकवचन पूर्वी होत असे, तें ह्या तीनशें वर्षात अजिबात बंद झालें. लिंगवचनांत, उच्चारांत वगैरे सर्व बाबींत जमीनअस्मानाचे फेरफार झाले. ते इतके कीं, १०६६ च्या पूर्वीची साक्सन भाषा १३६६ त मुळीं राहिलीच नाहीं. तिच्या जागीं निराळीच साक्सन व फ्रेंच ह्या भाषांच्या मिश्रणानें बनलेली अशी इंग्लिश भाषा अस्तित्वांत आली. ह्या इंग्लिश भाषेंत साक्सन भाषेंतील कांहीं शब्द तेवढें राहिले आहेत. बाकी साक्सन भाषेंत व सध्यांच्या इंग्रजींत फारसें साम्य नाहीं. साक्सन शब्दहि इंग्रजींत फ्रेंच किंवा लॅटिन शब्दांपेक्षां कमी आहेत. वेब्स्टर व राबर्टसन ह्यांच्या कोशांतील शब्द मोजून, रा. टेम्रिल ह्या गृहस्थानें असें सिद्ध केलें आहे कीं, एकंदर ४३,५६६ शब्दांपैकीं २९,८५३ शब्द फ्रेंच किंवा लॅटिन व १३,२३० शब्द साक्सन, इंग्रजींत आहेत. म्हणजे एक शब्द जर साक्सन असेल तर अडीच शब्द फ्रेंच किंवा लॅटिन असतात. येणेंप्रमाणें नार्मन लोकांच्या दडपणाखालीं साक्सन भाषा अगदीं चिरडून गेली. ह्यासंबंधानें Race and Language ह्या पुस्तकांत M. Andre’ Lefe’vre म्हणतो:-