भाषेचें स्वरूप बदणारा दुसरा एक फेरफार फारशीच्या संगतीनें मराठींत आला आहे. तो उच्चारासंबंधानें आहे. इंग्रजींतल्याप्रमाणें फारशींत बरेच शब्द व्यंजनांत उच्चारतात. उदाहरणार्थ रोघन, माफू, सृहबत्, इमारत, दूर, हजीमत्, मेहनत्, मैदान्, अलबत्, खुप, अफसोस्, वगैर फारशी शब्द घ्या. हे शब्द महाराष्ट्रांतील लोकहि मुसुलमानांप्रमाणेंच उच्चारूं लागले; व ह्या उच्चाराची लकब जातिवंत मराठी शब्दांनाहि ते नकळत लावूं लागले. उपयोग् गड्बड्, सांगून् म्हणतात, आपणास्, लांबचा, आठ्वण्, नांदत, वगैरे मराठी शब्द येथें लिहिले आहेत त्याप्रमाणें व्यंजनान्त उच्चारण्याची संवय मराठ्यांनीं मुसुलमानांपासून घेतली असें म्हणण्याला कारणें आहेत. पैकीं एक हें कीं, ज्ञानेश्वरींत नियमानें हे शब्द व्यंजनान्त उच्चारत नसून स्वरान्त उच्चारले जातात. दुसरे कारण असें आहे कीं, मोरोपंताच्या कवितेंत स्वरान्त लिहिलेलें अक्षर व्यंजनान्त उच्चारिलेलें प्रायः माझ्या वाचण्यांत एकहि आलेलें नाहीं. जर व्यंजनान्त अक्षरें उच्चारण्याची पद्धति मराठींत शुद्ध व संस्कृत मानिलेली असती, तर मात्रावृत्तें व गणवृत्तें बनविण्यास मराठी कवींना फार सोपें जातें. तिसरें कारण असें आहे कीं, ज्ञानेश्वराच्या वेळीं व त्याच्या पूर्वी प्रायः सर्वस्वीं सर्व वाक्यगत मराठी शब्द स्वरान्त असत व तो स्वर फारच थोड्या स्थलीं अ असे. उपयोग वगैरे वर जे मराठी शब्द दिले आहेत, ते ज्ञानेश्वरांच्या वेळीं उपेगु, गाडबड्य, सांगौनु, म्हणती, आपणासी, लांवु, आठवणी, नांदतु, असे लिहीत व उच्चारींत असत. परंतु ह्या अंत्य इकारांचा व उकारांचा लोप होऊन हे शब्द प्रायः अकारान्त झाले व हें रूपान्तर होत असतांना त्यांना फारशींचा संसर्ग झाला. त्यामुळें त्याचें उच्चारहि फारशीच्या धर्तीवरच होऊं लागले. अलीकडे इंग्रजीच्या संसर्गानेंहि असाच प्रकार होऊं लागला आहे. मी सर्कसला गेलों होतों, प्रस्तुत मद्रासनें आघाडी मारली आहे, ह्या वाक्यांतील सर्कसला, मद्रासनें वगैरे प्रयोग व उच्चार इंग्रजीच्या धर्तीवर आहेत. उच्चाराची हीच त-हा मुसुलमानी अमलांत चालू होती. ती रूढ होऊन उच्चाराप्रमाणें लेखनहि व्यंजनान्तच प्रचारांत येतें कीं काय, हें पुढील पांचशें वर्षांत कळून येईल.
फारशीच्या संसर्गानें मराठीला आणीक एक खोड लागली. ती ही कीं, फारशींतील शब्दसिद्धीचे प्रत्यय मराठी स्वीकारूं लागली. ये (उच्चार ई) प्रत्यय लागून फारशींत भाववाचक किंवा धंदावाचक नाम होतें, जसें, दोस्त, दोस्ती. ह्या धर्तीवर मराठींतील नामें अशीं होतः- वैद्यक, वैद्यकी; एक, एकी; दु, दुही; बेक, बेकी; मांत्रिक, मांत्रिकी; वैदिक, वैदिकी; मधुकर, माधुकी; वगैरे. फारशी प्रत्यय शुद्ध मराठी शब्दांना लावल्याचीं उदाहरणे कांहीं देतों, म्हणजे हा प्रकार जास्त विशद होईल. (खालील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
फारशीवरून मराठींत दोन चार समास करण्याचाहि नवीन पद्धती आल्या. फारशींत दोन शब्दांच्यामध्यें अलीफ म्हणजे आ येऊन एक समास होतो; जसें बराबर. ह्याच धर्तीवर मराठींत पटापट, सटासट, सरासर, धराधर वगैरे सामासिक शब्द होतात. फारशींत कित्येक शब्दांच्यामध्यें वाव म्हणजे उ किंवा ओ येऊन समास होतो; जसें, दार उ दार, घर उ घर, रान्, उ रान=दारोदार, घरोंघर, रानोरान वगैरे. फारशी जेव्हां महाराष्ट्रात सर्वत्र पसरली, त्यावेळी लोकांच्या तोंडांत एकाच अर्थाचे फारशी व मराठी असे दोन शब्द एकदम येऊं लागले. उदाहरणार्थ घरदार, चीजवस्त, कागदपत्र, शेतजमीन, देहेगाव, दानधर्म, भेटमुलाकत, सरदारमानकरी, प्रांतमुलूख, वेळवखत वगैरे. येथें दार, चीज, कागद, जमीन, देह, दान, मुलाकत, सरदार, मुलूख व वखत ह्यांचा अर्थ घर, वस्तु, पत्र, शेत, गांव, धर्म, भेट, मानकरी, प्रांत व वेळ असा अनुक्रमें आहे. एकाच अर्थाचे दोन फारशी शब्द ह्याच वेळीं प्रचारांत आले; जसे जमीनजुमला, शिपाईप्यादा, नक्दपैसा, बंदागुलाम, खबरअफवा, वगैरे. फारशी शिकतांना हे शब्द प्रथम कित्येकांच्या तोंडीं बसले व नित्य वापरण्यानें ते समाजांत प्रचलित झाले. हे मराठी-फारशी मिश्र शब्द पौनः पौन्य किंवा अतिशय किंवा जोरदारपणा दर्शवायाचा असल्यास मराठींत योजतात. हे चारी प्रकार ज्ञानेश्वरींत नाहींत हें सांगावयाला नकोच.
येथपर्यंत सांगितलेल्या विशेषांपेक्षाहि एक चमत्कारिक विशेष आतां सांगावयाचा आहे. तो विशेष फारशींतून मराठींत रूढ झालेल्या विशेषनामांसंबंधाचा आहे. सामान्यार्थवाचक शब्द परभाषेतून घेण्यानें स्वभाषेंत थोडाथोडका बदल होतो असें नाहीं. परंतु परभाषेंतील विशेषनामें स्वभाषा स्वीकारूं लागली, म्हणजे ती बोलणा-या लोकांच्या भ्रष्टपणाची कमाल झाली म्हणून समजावें. अबा, बाबा, अबू, अमा, मामा, अमी, मामी, नाना, नानी, ननी, काका, काकी, चिच्या, वगैरे मराठींतील टोपण नांवे फारशी आहेत. तसेंच सुलतानराव, जानराव, बाजीराव, रुस्तुमराव, शहाजीराव, शाहू, फिरंगोजीराव, दियानतराव, सर्जेराव, हैबतराव, सर्फोजीराव, गुलबाई, दर्याजीराव, वगैरे विशेषनामेंहि मुसलमानी अमलांत प्रचारांत आलीं. सौदागर, मुश्रीफ, सराफ, चिटणीस, पोतनीस, हेजीबराव, दिवाण, पेशवे, वाकनीस, दफ्तरदार, वगैरे फारशी आडनांवेंहि मराठींत रूढ झालीं. बिन्न ह्या फारशी शब्दानें पितापुत्रांचा संबंध दाखविण्यापर्यंत ज्या देशांतील भटाभिक्षुकांचीहि मजल जाऊन पोंहोचली, त्या देशांतील भाषेच्या भ्रष्टपणाबद्दल जास्त काय लिहावयाचें आहे?