जॉन बीम्स् ह्यानें आपल्या Comparative Grammar नामक ग्रंथात हेंच मत स्वीकारलें आहे. लग् धातूपासून निघालेल्या लागी ह्या शब्दाची शेवटली गी लुप्त होऊन ला हा द्वितीयेचा प्रत्यय झाला असें बीस्मचें म्हणणें आहे. ह्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ तो असें कारण देतों कीं जुन्या मराठींत (?) लागी व लागून अशीं रूपें होतीं ती जाऊन हा ला प्रत्यय वर्तमान मराठींत राहिला आहे. परंतु बीम्सचे हें म्हणणे १२९० पासून १८९० पर्यंतची ऐतिहासिक परंपरा पाहिली असता खरें आहे असें म्हणता येत नाहीं. आधीं जुन्या मराठींतील लागी व लागून हीं रूपें प्रस्तुत काळापर्यंत लुप्त झाली नसून सध्यांहि चालू आहेत. ज्याला मरून नुकतीच शंभर वर्षे झालीं, त्या महिपतीनें हा शब्द योजिला आहे.
नक्र बोलला तुज लागोन। तुझें नाम पतितपावन।
आणि माझा अव्हेर करून। जासी घेवोन गजेंद्रा॥
- भक्तिविजय
ज्ञानेश्वर (इ. स. १३००), मुंतोजी (१५५०), एकनाथ (१६००), नामदेव (१६००), मुतेश्वर (१६४०), वामन (१६६०), श्रीधर(१७००), मोरोपंत (१७७०), महिपति (१७९०), वगैरे ग्रंथकारांनीं आज सहाशें वर्षे हा शब्द योजण्याचा क्रम सारखा ठेविला आहे. तेव्हां हा शब्द अलीकडील काळांत केव्हांहि लुप्त झाला नाहीं, हें उघड आहे. बीम्स्चें म्हणणें खरें नसण्याला दुसरें कारण असे आहे की, कोणत्याहि शब्दयोगी अव्ययाला विभक्तिप्रत्ययाचे रूप येण्याला, तें शब्दयोगी अव्यय लोकांच्या बोलण्यांतून व लिहिण्यांतून हळूहळू कमी झालें पाहिजे. ह्या नियमाप्रमाणें पाहिलें असतां, ला हा द्वितीयेचा प्रत्यय ज्या मराठी ग्रंथकारांच्या लेखांत प्रथम दिसतो, त्यांच्या लेखांत लागी, लागून हीं रूपें कचित् आलीं पाहिजेत व त्याच्यानंतरच्या ग्रंथकारांच्या लेखांत मुळींच येतां कामा नाहींत. आतां नामदेवांच्या ग्रंथांत ला हा प्रत्यय प्रथम दृष्टीस पडतो, परंतु लागी हें शब्दयोगी अव्ययहि त्यांच्या अभंगात व भारतांत अनेक वेळां आलें आहे. तसेंच नामदेवाच्यानंतर झालेल्या एकनाथादि ग्रंथकारांच्या ग्रंथातहि तें हमेशा येतें. तेव्हां बीम्सची क्लृप्ति खरी नाहीं असे म्हणणें प्राप्त होते. आतां मुसुलमानांच्या ऐन अमदानींत वाढलेल्या नामदेव, मुक्ताबाई वगैरेंच्या ग्रंथांत फारशी रा पासून निघालेला ला हा द्वितीयेचा प्रत्यय जसा कित्येक ठिकाणीं योजिलेला दृष्टीस पडतो तसा प्रस्तुत खंडांत छापिलेल्या शिवाजीच्या पत्रांत दिसत नाहीं. सह्याद्रीच्या पूर्वेकडील मावळांत व पश्चिमेकडील तळकोकणांत फारशी भाषेचा संचार केव्हांहि फारसा नसल्यामुळें तेथील लोकांच्या बोलण्यांत फारशींतून घेतलेला द्वितीयेचा ला प्रत्यय बिलकूल येत नसून प्रायः स प्रत्यय येत असे. शिवाजीचे ब्राह्मण मुत्सद्दी एकोनएक मावळांतील किंवा तळकोकणांतील होते व ते स प्रत्ययाचा हमेश उपयोग करीत. जर लागी किंवा लागून ह्या शब्दयोगी अव्ययापासून ला प्रत्यय निघाला असतां, तर महाराष्ट्रांतील सर्व भागांत ह्या लाचा उपयोग, निदान नामदेवानंतर शंभर दीडशें वर्षांनीं तरी, सर्व महाराष्ट्रांत व्हावयाला पाहिजे होता. परंतु तसा प्रकार झालेला नाहीं. ला प्रत्यय शिवाजीच्या वेळेस मावळांत व तळकोकणात फारसा लावीत नसत हें तर काय, पण दादोबा पांडुरंग व कृष्णशास्त्री चिपळोणकर ह्यांच्या वेळींहि ला प्रत्यय कोकणांत फारसा योजीत नाहींत व देशांत हमेशा योजतात, असा भेद भासत होता (दादोकृत मोठें व्याकरण, दहावी आवृत्ति, पृष्ठ ६५ व चिपळोणकरांचे व्याकरणावरील निबंध, पृष्ठ ७३). येणेंप्रमाणें बीम्सची ही क्लुप्ति केवळ निराधार आहें असें मला वाटतें. ज्ञानेश्वरींत आ, स. सी, ते हे द्वितीयेचे किंवा चतुर्थीचे प्रत्यय होते. लागीं, लागौनी, लाग, लागा, अशीं लाग ह्या नामाचीं व क्रियापदाचीं रूपें ज्ञानेश्वरींत व तिच्या पुढील सर्व ग्रंथांत येतात. हें घर माझ्या लागीं नाहीं, अशा वाक्यांत लाग शब्दाची जशी सप्तमी सध्यां आपण योजतों, तशीच ज्ञानेश्वरींतहि योजीत असत. ह्यासंबंधीं विशेष विवेचन ज्ञानेश्वरींतील भाषेचा विचार अन्यत्र करावयाचा आहे त्यावेळीं करतां येईल.
फारशींत कित्येक शब्दांचें अनेकवचन आन् हा प्रत्यय लावून करतात. त्याचें अनुकरण जुन्या ऐतिहासिक पत्रांत अनेक स्थलीं केलेलें दृष्टीस पडतें. उदाहरणार्थ, राजश्री वाड ह्यांच्या शाहू छत्रपतीच्या रोजनिशीच्या १८५ व्या पृष्ठावर मोकदमानि हा शब्द आलेला आहे. मूळ फारशी शब्द मोकदम व त्याचें अनेकवचन मोकदमान्. मोकदमान् ह्या रूपाला मौजा ह्या शब्दाशीं जोडण्याकरितां षष्ठीची फारशी ई जोडून मोकदमानी मौजा असा प्रयोग केला आहे. मोकदमान् ई मौजा ह्याचा अर्थ गावचे मोकदम असा होतो. हा षष्ठीचा ई प्रत्यय द्वितीयेच्या रा प्रत्ययाप्रमाणें मराठींत रूढ झाला नाहीं. फक्त मौजा, नजदीक वगैरे काहीं शब्दांच्यापुढें मात्र सध्यां आलेला आढळतो. ही षष्ठीची ई मराठींत रूढ न होण्याचें कारण असें आहे कीं, ही ई ज्याची षष्ठी करावयाची, त्या नामाच्या पूर्वी लागते. इंग्रजींत जसें ofशब्दयोगी अव्यय नामाच्या पाठीमागें लागतें तशी ही फारशी ई नामाच्या पाठीमागें लागते. विभक्तीचा प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय नामाच्या मागें लावण्याचा मराठीचा स्वभाव नाहीं. तेव्हां ही षष्ठीची ई मराठींत टिकली नाहीं. परंतु रा हा द्वितीयेचा प्रत्यय फारशींत मराठीप्रमाणें नामाच्यापुढें लावतात. तेव्हां तो मराठीच्या स्वभावाला जुळण्यासारखा असल्यामुळें मराठी विभक्तिप्रत्ययांत कायम होऊन बसला आहे. इतकेंच कीं, द्वितीयेचा रा प्रत्यय लागतांना फारशींत नामाचें सामान्यरूप होत नाहीं, व मराठींत, त्या भाषेच्या नियमाप्रमाणें होतें. उदाहरणार्थ, गोविंद ह्या नामाचें फारशी पद्धतीनें गोविंदरा असें द्वितीयेचें रूप होईल; परंतु मराठींत गोविंदाला असें रूप होतें.