मी, तूं, तो, हा, असा, कसा, जसा, तितका, तेवढा, एवढा, जेवढा, केवढा, तितकाला, स्वतः, अमुक, आपण, काय, वगैरे सर्वनामें मराठींत इतर कोणत्याहि भाषेपेक्षां जास्त आहेत. तशांत, वर दिलेल्या आणीक नऊ दहा फारशी सर्वनामांची त्यांत भर पडल्यामुळें मराठींत सर्वनामांच्या योगानें जे नानाप्रकारचें बारीक बारीक सूक्ष्म भेद दाखवितां येतात ते इतर कोणत्याहि भाषेंत एकेका शब्दानें दाखवितां येत नाहींत. तो कसचा येतो? केवढाले हे आबे! वगैरे वाक्यांतील कसचा, केवढाले, ह्यांचीं इंग्रजींत एकेका सर्वनामाने भाषांतरें होत नाहींत. कसचा ह्याचें यथार्थ भाषांतर इंग्रजींत तर होत नाहीच; परंतु is there any the smallest chance of his coming? अशासारखा एखादा लांबच लांब प्रयोग करून इंग्रजीला हें काम कसेंबसे भागवून घ्यावे लागतें. खुद, फलाणा, हर वगैरे फारशी सर्वनामांसंबंधानें विशेष कांहीं सांगण्यांसारखें नाहीं. परंतु कस व चे ह्या सर्वनामांना नुसतें जाऊं देतां कामा नये. चे हें फारशींत प्रश्नार्थक सर्वनाम आहे व त्याचा मराठींत कोठचें व कसचें ह्या संयुक्त सर्वनामांत उपयोग होतो. ज्ञानेश्वरींत कोठचें व कसचें ही प्रश्रार्थक रूपें नाहींत. हरकसा हें रीतिदर्शक सर्वनाम हर व कस ह्या दोन फारशी सर्वनामांचा जोड करून बनविलेलें आहे. हरकशाहि युक्तीनें ये, असा ह्या शब्दाचा प्रयोग होतो. दरएक हें हरएक ह्या सर्वनामाचें अनुकरण करून आणि हर व दर ह्या दोन फारशी शब्दांचा घोटाळा करून बनलेलें रूप आहे. हर हें सर्वनाम आहे व दर हें शब्दयोगी अव्यय आहे, हें मूळ प्रयोगकर्त्यांना माहीत नव्हतें. जण हें सर्वनाम जन् ह्या फारशी नामावरून घेतलें आहे. जन् म्हणजे बायको. मराठींत किती जण, किती जणीं, अशीं पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपें योजितात. येथें कांहीच व नाहीच ह्या क्रियाविशेषणांविषयीं किंचित् उल्लेख करतों. हें दोन्ही शब्द फारशी कहींच व नहींच ह्या सकरणरूपी व अकरणरूपी क्रियाविशेषणांपासून आलेले आहेत. काहींच हें क्रियाविशेषण के आणि हींच व नहींच हें न आणि हींच ह्या दोन सर्वनामांपासून झालेलें आहे. कहींच म्हणजे काहींहि आणि नहींच म्हणजे न कांहीं असा अर्थ आहे. इंग्रजींत कहींच म्हणजे something व नहींच म्हणजे nothing असा अर्थ होतो. तो कांहींच बोलत नाही, तो नाहींच येत, असे प्रयोग ह्या शब्दांचे होतात. एकटा व दुकटा हीं संख्यावाचक विशेषणें फारशींतील एकता, दुता ह्या विशेषणांवरून आलेलीं आहेत.
सर्वनामाप्रमाणें फारशींतून मराठींत उभयान्वयी अव्ययेंहि बरींच आलीं आहेत संस्कृतांतील च व इंग्रजींतील and ह्या उभयान्वयी अव्ययांच्या अर्थी मराठींत व व आणि अशीं दोन अव्ययें आहेत. की हें अव्यय फारशी के ह्या अव्ययावरून मराठींत घेतलें आहे. ज्ञानेश्वरींत नियमानें व ऐतिहासिक पत्रांत विकल्पानें जे हे रूप येतें.
मराठीच्या व फारशीच्या सान्निध्यासंबंधानें आतांपर्यंत जे हे विशेष सांगितले त्याहूनहि एक विशेष बराच संस्मरणीय असा फारशीच्या संसर्गानें मराठींत आला आहे. तो विशेष चतुर्थीच्या किंवा द्वितीयेच्या ला प्रत्ययासंबंधाचा आहे. हा प्रत्यय फारशीं द्वितींयेचा प्रत्यय जो रा त्यापासून आला आहे. फारशींत राम ह्या शब्दाची द्वितीया रामरा अशी होते. मराठींत राम, ह्या शब्दाची द्वितीया ज्ञानेश्वराच्या वेळीं राम, रामा, रामासी, रामातें, रामाप्रति, अशी होत असे. पुढें फारशीच्या सान्निध्यानें रामाला अशी द्वितीया विकल्पानें होऊ लागली. राम् रामरा; राम रामाला (राम + आ + ला). अहमदनगर, अहमदनगररा ह्या फारशी द्वितीयेबद्दल अहमदनगर, अहमदनगरला किंवा अहमदनगराला अशी मराठी द्वितीया होऊं लागली. हा ला प्रत्यय कोठून आला, ह्याविषयीं दादोबा पांडुरंग, कृष्णशास्त्री चिपळोणकर व कृष्णशास्त्री गोडबोले ह्यांना गूढ पडले होतें (दादोकृत मोठं व्याकरण, दहावी आवृति, पृष्ठ ६५, चिपळोणकरकृत व्याकरणावरील निबंध, पृष्ठ ७३, गोडबोलेकृत व्याकरण). ज्ञानेश्वरींत हा ला प्रत्यय नसताना पुढे तो एकाएकीं कोठून आला? नामदेवाच्या अभंगांत हा ला प्रत्यय प्रथम आढळतो. ज्ञानेश्वर व नामदेव हे जर समकालीन होते, तर नामदेवाच्या ग्रंथांतच तेवढा ला प्रत्यय आढळावा आणि ज्ञानेश्वराच्या ग्रंथांत बिलकुल नसावा, हें आश्चर्य आहे. खरा प्रकार असा आहे कीं, ज्याचे अभंग आपण सध्यां वाचतों तो नामदेव सोळाव्या शतकांत होऊन गेला, व सोळाव्या शतकांत २०० वर्षांच्या घसटीनें ला प्रत्यय मराठींत रूढ होऊन नामदेवाच्या अभंगात आला. आतां लग् धातूपासून निघालेल्या लागून, लागीं, लगीं, ह्या रूपांचा द्वितीयेचा ला प्रत्यय अपभ्रंश आहे असें प्रतिपादन कोणी ग्रंथकार करितात.