इसवी सन १३१८ त अशी वस्तुस्थिति असल्यामुळे मुसुलमानांजवळ मराठ्यांना शिकविण्यासारखे कांहींच नव्हतें. ते राज्याधिकारी होते व त्यांची भाषा फारशी होती, तेव्हां व्यवहार चालण्याकरितां फरशीचा उपयोग दरबारांत होऊं लागला. पहिलीं पांच पन्नास वर्षे कोण्याहि ब्राह्मणानें, मराठ्यानें, किंवा कुणब्यानें ह्या मुसुलमान अधिका-यांची खासगी किंवा सरकारी कसलीही नोकरी केली नाहीं. मुसुलमानांची खासगी नोकरी चातुर्वर्ण्यांतींल मनुष्याकडून होणें अशक्यच होतें. परंतु द्वेषानें व अभिमानानें सार्वजनिक नोकरीहि कोणी करीत नसत. ह्याचमुळें मुसुलमानी अमलांत वेठीची जुलमी पद्धत अमलांत आली. वाटेल तें सार्वजनिक काम पाहिजे तेव्हां हव्या त्या माणसांकडून जुलमानें करून घ्यावयाचें हा वेठ या शब्दाचा अर्थ आहे. ही वेठ जेव्हां सुरू झाली तेव्हां संभावित ब्राह्मण व मराठे कालान्तरानें व निरुपायानें सरकारी नोकरी करूं लागले, व अर्थात् फारशी शब्दांचीहि ओळख करून घेऊं लागले. ह्यावेळी महाराष्ट्रांतील तालुक्यांच्या कमाविसदरांजवळ दुभाषांचे काम हिंदुस्थानांतील कायस्थ लोक करीत. इसवी सन १४१६ तील जे फारशी-मराठी कागद आहेत त्यांवर ह्या कायस्थ दुभाषांची नावें आहेत. महाराष्ट्रांत हे मुसुलमान आले ते येथें कायमचे राहिले व त्यांनी शंभर दीडशें वर्षांत बरेच लोक बाटवून मुसुलमान केले. शेवटी ह्या बाटविण्याची मर्यादा इतकी वाढली कीं, प्रत्येक खेडें, ओढा व डोंगराचें शिखर ह्याच्या आंत, जवळ किंवा वर मस्जीद, दर्गा किंवा पीर स्थापन झाला. हिंदूंचीं देऊळें व मुसुलमानांचे तकिये एकमेकाला येऊन भिडले. बाट्यांच्या, मुसुलमानी अधिका-यांच्या व फकिरांच्या तोंडून निघालेले फारशी शब्द महाराष्ट्रांतील सर्व लहानमोठ्या जातींतील लोकांच्या कानावरून हमेश जाऊं लागले व व्यवहारांत जिकडे तिकडे फारशी शब्दांचा सुळसुळाट झाला. शास्त्र, धर्म, नीति, आचार इत्यादि महत्त्वाच्या प्रांतांत फारशी शब्द मुळींच शिरले नहींत. वल्के, बाजार, दरबार, फौज, अदालत, सराफी, जमीन, जुमला, सावकारी वगैरे कारभाराच्या जागीं बोलल्या जाणा-या जबानींत फारशी शब्दांचा अंमल मामूर झाला. उदाहरणार्थ, घरासंबंधीचे कांही देतों. खाना, दार, सराई, इमारत, झनाना, दिल्ली दरवाजा, दरवाजा, दालन, हौद, दिवाणखाना, ओसरी, महाल, ऐनेमहाल, रंगमहाल, संदुकखाना, मुदबखखाना, आतषखाना, दिवाळ, देवळी, कप्पी, घुमट, जमीन, फारशी, तक्त, तक्तपेशी, हलका, कुलुप, खलबतखाना, किल्ली, छपर, आरक, घुसलखाना, तालीमखाना, तावदान, खजीना, अंबार, कारंजें, आबदारखाना, फवारा, बुरुज, गच्ची, चुनेगच्ची, पिंजरा, पलंग, खुर्ची, मेज, वगैरे. बाजार, दरबार, फौज, जमीन, वगैरे संबंधानेंहि असेच शेंकडो फारशी शब्द तेतां येतील. ते कोणच्याहि फारशी किंवा मराठी कोशांत सांपडण्यासारखे आहेत. मराठींत फारशी शब्द शिरले आहेत हें जगजाहीर आहे. परंतु ते कोणत्या बाबीसंबंधानें विशेष शिरले आहेत. त्याचा तपशील वर दिला आहे.
फारशी बोलणा-या मुसुलमानांचे राज्य महाराष्ट्रावर ३५० वर्षे होतें. त्याअर्थी मराठींत फारशी शब्द यावे ही सामान्य गोष्ट आहे. फारशीच्या व मराठीच्या सान्निध्यांत विशेष जो आहे तो निराळाच आहे. तो विशेष हा मराठींत बरेच विशिष्ट प्रयोग फारशीवरून आलेले आहेत. शफथ खाणें असा एक प्रयोग मराठींत करतात. शपथं गृह् असा प्रयोग संस्कृतांत आहे. शफथ घेणें असा मूळचा मराठी प्रयोग पूर्वी होता व सध्यां चालू आहे. परंतु खाणें ह्या क्रियापदाचा शफथेशीं जोड देण्याची कल्पना फारशी प्रयोगावरून मराठीत आली आहे फारशीत कसम् खुर्दन् असा प्रयोग असतो. कसम् = शफथ; खुर्दन = खाणें. हाक मारणें असा एक मराठी प्रयोग आहे. ह्याला जुन्या मराठींत बोलावणें व संस्कृतांत निमंत्र् असे शब्द आहेत. उचैःनिमंत्रणं कृ असाहि संस्कृत प्रयोग होईल. परंतु निमंत्रणं मारयति किंवा प्रहरति असा प्रयोग संस्कृतांत नाहीं. बांग जदन् म्हणून फारशीत प्रयोग आहे त्यावरून मराठीत हाक मारणें असा प्रयोग घेतलेला आहे बांग = हाक किंवा आरोळी; जदन् – मारणें. तसेंच याद राखणें असे मराठी संयुक्त क्रियापद आहे. तें याद दाष्तन् ह्या फारशी प्रयोगापासून घेतलें आहे. याद = आठवण; आणि दाष्तन् = राखणें. असें शेंकडो प्रयोग फारशीवरून मराठींत घेतलेले आहेत. उदाहरणार्थ खालीं कांहीं प्रयोग देतों. (तक्ताः पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)