श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५
विनंति उपर. “औरंगाबादचे तनख्या व।। वसूल किती व बाकी किंती याची याद पाठवितों " ह्मणोन लिहिलें, परंतु याद येत नाहीं. तुह्मांकडून याद येण्याचा उसीर. यास्तव याद लौकर यावी. कलम----१
.
“करनुळकराकडें ऐवज फसला. येविषयीं स्वस्थ असो नये. तगाद्यास कोणी पाठवावें. भिंवरायास फजीत करून ल्याहावे '' ह्मणोन विस्तारें लिहिलें; तें कळलें. त्यास तगाद्यास पाठविणें अथवा भिंवरायास पत्र लिहिणें-दोहींतही फळ नाहीं. अलफखानास येविषयीं आह्मीं पत्र पाठविलें होतें. त्याचा जाब आला कीं रणदुलाखां बाहदुर तेथें येत आहेत. दरबारचा जाबसाल होऊन आपल्या तिही ऐवजाचें ते बोलतील. त्यासे रणदुलाखानही लौकरच येणार आहेत. ते आल्यावर येविषयीं त्यांसि बोलणें होईल तें लिहून पाठवूं. कलम. १.
“बाळाजी रघुनाथ यांस दिवटी आबदागिरीची नेमणूक आहे. खिजमतगाराची नव्हती. त्यास याद प॥ त्याजवर करार होउन यावा." ह्मणोन लि।। त्यावरून यादीवर करार करून प॥ आहे. कलम. १.
“वसमतचे ऐवजाचें अद्याप ठरलें नाहीं. निश्चय करून लिहितों. याचें कारण दरबारची गोष्ट आजची पंधरा दिवसांवर जाती " ह्मणोन लिहिलें. त्यास, यास उपाय तुमचा काय आहे ? परंतु कामाची खराबी ! कलम. १.
“रावरंभाकडील तालुक्यास तगई देणें वगैरेचे जाब हरिपंतास सांगून लिहविलें. मागाहून पाठवू '' ह्मणोन लि।। उत्तम आहे. जाब लौकर यावे. कलम-----१.
मारडकराचें दिवाळें वाजलें याचा त।। लिहिला तो कळला. कलम १.
दुखणीं होऊन माणसे फार मरतात याचा त।। लिहिला तो कळला. कलम.------१
.
मुकुंद जोशी याचे इनामाचे दुमोहरी विषयीं वारंवार सूचना तेथें होती. त्याचा बयान लिहिला तो सर्व कळला. कोन्हेरपंतास या उद्योगास लाविलें. परंतु तुह्मी मुकुंद जोशी याची दुमोहरी सनद इतकीच सूचना लिहीत असावी. कलम-------१.
कलमें सुमार आठ र।। छ. ६ जिल्काद, हे विनंति.