श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५
विनंति उपरि. नवाबांनीं श्रीमंतासी पत्र पाठविलें. त्याचे जबाबाचा मसविदा हिंदवी पाठविला. त्यांत परस्परें नोका लाऊन जबाब लिहिला. त्याचे कुन्हे ध्यानांत येण्याकरितां आलाहिदा पुरवणी तुह्मीं लिहिली. त्याप्रा। अक्षरश: मननांत आलें. हा मसविदा मध्यस्तास वाचून दाखविल्यांत त्यांजला कांहीं खुषी व्हावयाची नाहीं; हें समजोन त्यांस न दाखवितां मसविदा आपल्याजवळ ठेविला. पत्र जबाबाचें रघोतमराव यांजकडून आल्याचें वर्तमान समल्यावरून मध्यस्ताकडें कोन्हेरपंत यांस पाठवून त्यांजला विच्यारिलें कीं श्रीमंतांकडून हजरतीचे पत्राचा जबाब रवाना जाला. ऐसें आह्माकडें लिहिलें आलें. त्यास पत्र आलें कीं नाहीं ? उत्तर केलें कीं “पत्र आलें. परंतु अद्याप हजरतीस गुजराणिलें नाहीं. गुजराणिल्यानंतर पत्रांतील भाव काय याची इतला तुह्मांस होईल”. याप्रा बोलले. र। छ. ६ जिल्काद हे विनंति.