श्री.
वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६
ता. १६।५।१७९४
श्रीमंत रावसाहेब मामुली हवाल्याचे पत्र. ( ता. १६ शवालचे )
श्री वैशाख वद्य १ शुक्रवार शके १७१६,
ता. २।५।१७९४
विनंती विज्ञापना. नवाबाची सालगीरे छ ११ माहे शवाल रविवारी सबब दौलांनीं नजर करावयाचा सरंजाम सोन्या रुप्याची खरबुजें तयार करविलीं. नवाबास अर्जी पाठविली. दोन घटका दिवस असतां येणें ह्मणोन हुकुम जाला. त्या प्रा दौला सरंजामसुद्रां हजर जाले. रात्री दोन घटिकेस नवाब बरामद जाले. दौलांनी सोन्याची खरबुजें पांच हजारांची व रुप्याची दोन हजारांची खरबुजें बादाम, पिस्ते आक्रोड भिश्री चिरोंजे याचे खाने पनास व पानेसुपारी लवंगा इलायची फुले अत्तर गुलाब याप्रा सरंजाम व गुल अनारी रंगाचा पोषाख गुजरावुन नजर केली. मीर आलम व पागावाले आदिकरून सर्वांनीं नजरा सालगिरेच्या केल्या. नाच राग रंग होऊन साहा घटिकेस बरखास जालें. रा छ १६ माहे पवाल हे विज्ञापना.