श्री.
पौष व. ७ गुरुवार शके १७१५ ता. २३ जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. दारा ज्याहा बाहदुर माहबतजंग यांचे शरीरीं समाधान नव्हतें. त्यांचा काल जाल्याचें वर्तमान नवावांकडें छ. १८ जाखर मंगळवार रात्रीं आले. नवाबांनी यैकुन बहुत अपसोस केला. माहालांत बेगमां आदिकरून सर्वांचा आकांत रात्रीं मोठा जाला. नौबत मना केली. कुच करण्याचा हुकुम आधीं जाला होता, त्यानंर तीन च्यार घटकेनें हें वर्तमान आलें. छ. १९ रोजीं नबाब स्वार होऊन सवा प्रहर दिवसां किले बेदरास दाखल जाले. तेही मोठे उदासीनपणें, खवासींत दौला व मीर आलम होते. गमी करून कोणासीं न बोलतां दाखल जाले. रा। छ. २० माहे जाखर हे विज्ञापना.
श्री.
पौष व. ७ गुरुवार शके १७१५ ता. २३ जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना, हषमतजंग वारले. सबब त्यांजकडील जागिरीचे गांव मौजे भातांबरें पा भालकी वगैरे पांच गांवची जप्ती नवाबांचे सरकारांतुन जाली. रा। छ. २० माहे जाखर हे विज्ञापना.