श्री.
मार्गशीर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंति विज्ञापना, नवाब कमठाण्यावर राहिले. तेथें जाग्याचा बहुत संकोच. गांवांत जागा थोडी. बाडा बाहेर मोठा दिल्हा. दोन फोस अडीच कोसांवर जेथें ज्याची सोये तसे लष्करचे लोक राहिले. तेव्हां बाहेर अथवा कमठाण्यांत राहण्याची सोये नाहीं. जाणुन बेदरचे मंगळवार पेठेंत मी पहिलें राहिलों त्याच जागीं आहे. येथुन कमठाणें तीन कोस. बाड्यामुळें कोसं कोसाचा फेर जाणें येणें होतें. नेहमी तेथें कोल्हेरपंत व च्यार जोड्या जासुद ठेविले आहेत. रा। छ. २४ जमादिलावल हे विज्ञापना.
श्री.
मार्गशिर्ष वा १० शनिवार शके १७१५ ता. २८ दिसेंबर १७९३.
विनंति विज्ञापना, कमठाण्यावर नवाब राहिल्यास येक महिना जाला. सैर शिकार व दोलाची मिजाज मादंगी हेंच आजपर्यंत जालें, बेदरास येण्याचा बेत होता तो तुर्त राहिला. येक महिन्याचा सरंजाय कमठाण्यावर गेला. महिना पंधरा दिवस मुकाम आहेत. येकरामुदौला गफुरजंगाचे पुत्रे यांनीं आपली षादी करण्याकरितां हैदराबादेस जाण्याचा निरोप मागितला, परंतु दिल्हा नाहीं, मुलें माणसें येथेंच आणी यैसी ताकीद जाली. याचप्रों मीर आलम यांचीही मुलें माणसें आणविलीं, रा छ. २४ जावल हे विज्ञापना.