श्री.
मार्गशीर्ष शु. ५ रविवार शके १७१५. ता० ८ दिसेंबर स १७९३.
विनंती विज्ञापना, चेनापटणांहून व्यंकटरामदिला याजकडोन अखबार आली ते पाठविली आहे. रा गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करतील. अवलोकनें मजकूर ध्यानात येईल. उत्तरें रवाना व्हावयास आज्ञा जाली पाहिजे रा। छ, ४ जावल हे विज्ञापना.
श्री.
कार्तीक शु. ५ रविवार शके १७१५. ता. ८ दिसेंबर स. १७९३.
विज्ञापना यैसीजे. येथील वर्तमान ता २० माहे राखर सोमवार पावेतो अखबार पत्रीं लेखन करुन सेवेसीं पत्राची रवानगी केली, त्यावरुन ध्यानास आलें असेल. तदनंतर येथील वर्तमान छ मजकुरीं रात्रीं दौलाची अर्जी गुजरली, छ २१ रोज मंगळवारीं प्रथम च्यार घटिकां दिवसां ख्वाबगाहामधें नवाब बरामद जाले, सैद उमरखान व अबदुल करींम व महमदषाबान यांचा सलाम जाला, लालन हज्यामाची याद केली. तो हाजर जाला, हाज्यामत होऊन येक प्रहर च्यार घटिकेस बरखास्त जाले. छ २१ रोज मंगळवार भारामल यांची अर्जी व शंकरराव भोंग यांचे दोन डबे जवाहिराचे व पोषागी सणगें वगैरे सरंजाम आला, तो गुजरला. रात्रीं दौलाची अजीं गुजरली. छ २२ रोज बुधवारीं दिवसां दरबार जाला नाही; रात्रीं दौलाची अर्जी गुजरली. छ २३ रोज गुरुवारीं सवारीचा हुकुम होऊन लवाजमा हजर जाला. दोन घटिका प्रथम दिवशीं खिलवतीमध्यें नवाब बरामद जाले. दौला व सरबुलंद जंग व धांसीमियां व अजमखान व रायेराम व मुनशी व मीरआलम व रावरंभा वगैरे मामुल इसमांचा सलाम जाला. हाथीवर जर्द अंबारीमध्यें नवाब सवार जाले. दोला मीर अलम उभयेतां खवासीमध्यें होते. किल्याबाहेर स्वारी आल्यानंतर फौज व गारद यांचा सलाम जाला. येक प्रहर तीन घटिका दिवसां कमठाणें येथें स्वारी डे-यास दाखल जाली.सर्वांच्या नजरा होऊन बरखास्त जालें. चार घटिका दिवस शेष राहिला असतां बंगल्यामध्यें नबाब बरामद जाले. मामुली लोकांचा सलाम जाला. दुरबीण लाऊन चहुकडील बाड्याचें राण पाहिलें, मगर हेच समंई बरखास्त जालें. रात्रीं खैर सला. छ २४ रोज शुक्रवारीं सवासे रथ व ध्यार हाथी गदीचे वगैरे स्वारीचा लवाजमा प्रातःकालीं हाजर जाला. दोन घटिका दिवसां नबाब स्वार होऊन जनान्यासहित शिकारीस गेले. शिकार करून येक प्रहर पांच घटिकेस डे-यास आले, आंबराईमध्यें डेरे देण्याचा हुकुम फरासखाण्याचे दारोग्यास जाला. रात्रीं रोषनींनें नवाब दौलाचेथे आले. त्याची व साहेबजादेची नजर जाली. च्यार धटिकेस आपलें मंकानांस आले. छ, २५ रोज मंदवारीं तीन घटिका दिवसां नबाब स्वार होऊन शिकारीस गेले. दौला समागमें होते. पांच परिंदाची शिकार करून आंबराईतून आले. दौला शिकारीस पुढें गेलें. त्यांस येक हारण फांशांत सांपडलें तें त्यांनीं गुजराणलें. बाड्यांत तीन माणसें सांपडलीं, त्याचे हात तोडावयाचा हुकुम जाला, आंबराईत भोजन दौलसहित जालें, येक प्रहर च्यार घटिकेस मकानास आले. रात्रीं साहा घटिकेस नबाब बरामद जाले पागावाले वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. जासुदाचे दारोग्यास हुकुम जालाजे वाड्या आंत कोण्ही माणु ( स ) न ये येसा बंदोबस्त करणें, छ. २६ रोज रविवारीं दोंन घटिका प्रथम दिवसां नबाब जनान्यासहित स्वार होऊन शिकारीस गेले. दौला स्वार होऊन मैलाराकडे गेले. अर्ज जाला. नवाबांनीं पांच परिंदाची शिकार करून अंबराईत आले. तेथें भोजन जालें. दोन खाने रवाना दौलाकडे मैलारास पाठविला. दौलांनीं चिते सोडोन