कोल्हापूर.
सह्याद्रीच्या कांहीं भागांतील पूर्वेकडे उघडणा-या खो-यांना ज्याप्रमाणें मावळे ह्मणतात, त्याप्रमाणेंच ह्या पर्वताच्या कांहीं भागांतील खो-यांना कोल ह्मणण्याची पुरातन कागदपत्रांत वहिवाट आहे. कोल्हापूराच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या खो-यांना कौल ह्मणत. ह्या कोलांतून देशांत येतांना वस्तीचा जो मोठा गांव त्याला पुरातन कालीं कोलापूर हाणत व अर्वाचीन कालीं कोल्हापूर अथवा कोल्हापूर ह्मणतात. कोल्हा ह्या जनावराच्या नांवाशीं ह्या शहराच्या नांवाचा कांहीं एक संबध नाहीं. कोल्हांपूरच्या पश्चिमेकडील खो-यांत फार पुरातन काळीं कोल ऊर्फ कोळ लोक रहात होते, त्यावरून त्यांच्या प्रांतालाहि कोळ ह्मणत असत. सह्याद्री पर्वतांतील कातकरी, भिल्ल, कोळी, कतवडी वगैरे मूळच्या लोकांपैकींच हे कोल ऊर्फ कोळ होत. कोल्हापूराचें करवीर हें संस्कृत नांव सापेक्ष दृष्टीनें अलीकडील आहे असें दिसतें.
महाबळेश्वर.
सह्याद्रीच्या ज्या खो-यांना सध्यां आपण मावळें ह्मणतों त्यांना हजार बाराशें वर्षापूर्वी मामल ही संज्ञा असे. ह्या मामलदेशांतील जी मुख्य देवता ही मामलेश्वर अथवा मामलेस्त. महाबळेश्वराच्या भोंवतालील खेड्यांतील लोक महाबळेश्वराला मामलेसरच ह्मणतात. मामलेसराला महाबळेश्वर हें नांव शास्त्रीपंडितांनीं आपल्या संस्कृत वाणीला साजेल असें दिलें आहे.