Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४७८ ]
श्री.
पौ॥ फाल्गून वद्य १०
श्रियासह चिरंजीव राजश्री देवराव यांसीः--
दामोदर महादेव व पुरुषोत्तम महादेव आशिर्वाद उपरि येथी कुशल फागूण वद्य ७ मु॥ कलासूर जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. इंद्रमणासमागमें पत्र पा। तें पावलें. श्रीमंतांचे पत्र पाठविलें तें पावलें. त्याचें उत्तर पाठविलें आहे, तें पाहून लाखोटा करून श्रीमंताकडे रवाना करणें. त्याचें उत्तर येईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें. ते मोहराच घेतील. कदाचित् मोहरा न घेतल्या तर पनासा हजाराच्या मोहरा विकून रु॥ देणें, व पनास हजार रु॥ धोंडाजी नाईकाकडून देवणें, मोहरा ठेवणें, व तुह्मीं श्रीमंतास पत्र लिहिणें कीं ज्याप्रमाणें स्वामी लिहितील ते करूं व रामाजी चिटनीस यास कलमदान पाठविलें तें कासदापासीं देणें. गिरधराचे इजाफीयाविशीं लिहिलें. त्यास, तुमच्या लिहिल्यापूर्वीच तुह्मांस गिरधराचे व लक्षमणाचे इजाफीयाविशीं लिहिलें आहे, त्याप्रमाणें देणे. व त्रिंबक रंगनाथाचे मुलाचे व्रतबंधासही देविलें तें देणें. घरीं बहुत सावध असणें. लिहित जाणें. खेळत जाऊं नका. मातोश्री काकू व आक्काचे आज्ञेंत असणें. चिरंजीव गणोबाची निगा करणें. बाहेर जाऊं न देणें. हवेलीचें काम त्वरेनें करवणें. दिवाणखानियाचें काम अभंग करवणें. बहुत काय लिहिणें ? हे आशिर्वाद.
रा। यादो रंगनाथ यांसी नमस्कार विनंति उपर. तुह्मीं हिसेब दिल्हा. परंतु धोंडाजी नाईक व शंकराजी ना। रेघे याजकडे व्याज काय जाहलें तें कांहींच न लिहिलें. तर मित्तीवार हिसेब करून किती रुपये जाहले ते लिहिणें. वरकड हिसेब राहिला असिला तोही करणें. व्याजाचाही
राहिला असेल तो पाठवणें. हे विनंति.
रा। धोंडाजी नाईक स्वामीस नमस्कार विनंति उपर लि॥ परिसीजे. आह्मी उदईक शहरास जातों. तेथील काम दो चो दिवशीं उगवून पुढें जाऊं. कळलें पाहिजे. हे विनंति.
मातोश्री काकू व मातोश्री अक्का वडिलांचे सेवेसी सा। नमस्कार विनंति उपर. मी व नाना खुशाल आहों. चिंता न करणें.
पौ। फाल्गुन वद्य १०