५९. ऐशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत इतिहासाची ही अशी संकुचित स्थिति होती. तुलनेचा जेथें अभाव होता, तेथें मानवसमाजशास्त्र उदयास येणें दुरापास्तच होतें. कालपरत्वें देशपरत्वें नाना समाजांच्या नैकविध चरित्रांचें जेव्हां सूक्ष्म अवलोकन करावें, तेव्हां समाजशास्त्राची निर्मिति होण्याचा संभव असतो. यूरोपांत देखील समाजशास्त्र हें नांव निर्माण होऊन साठ सत्तर वर्षे लोटलीं नाहींत. तेव्हां, ऐशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रांत त्या शास्त्राचा उदय झाला नाहीं, ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट नाहीं. तत्रापि, समाजशास्त्रांपैकीं राजनीति म्हणून जी शाखा आहे, तिच्यावर शक १६२२ च्या सुमारास एक ग्रंथ झालेला प्रसिद्ध आहे. तो रामचंन्द्रपंत अमात्य यांनी रचिलेला राजनीतिवरील प्रबंध होय. ह्यालाच “संभाजी राजाची राजनीति” असें दुसरें नांव आहे. ह्यांत राजनीतीचें पद्धतशीर व सशास्त्र विवेचन आहे, असें नाहीं. परंतु, अनेक महत्त्वाच्या व कुशलतेच्या राजनैतिक सूचना ह्या ग्रंथांत सांपडतात. न्याय व नीति हीं राज्याचीं मुळें आहेत, इंग्रजादि जलचरांना राज्यांत रहाण्यास कायमची जागा देऊं नये, वांशिक अस्सलाई लक्षांत घ्यावी, वगैरे अनुभवोत्पन्न शेकडों सूचना मोठ्या मार्मिक आहेत. महाराष्ट्रीय राजनीतीवर जो कोणी ऐतिहासिक पद्धतीनें ग्रंथरचना करूं इच्छील, त्याला हा ग्रंथ अत्यंत उपयोगीं पडेल. राजनीतीवर दुसरा ग्रंथ नानाफडणीसानें सवाई माधवरावाकरितां रचिलेला “नारायणशिक्षा” हा होय. यद्यपि हा सूत्ररूप आहे, तत्रापि ह्यांत अनेक अनुभविक व मार्मिक सूचना आहेत. तिसरा मराठी राजनैतिक ग्रंथ म्हटला म्हणजे चिटणीसकृत राजनीति हा होय. ह्यांत नारद, कणिक, वगैरेंच्या नीतीप्रबंधांतली सटरफटर माहिती एकत्र जुळविलेली आहे. अमात्यांचा किंवा फडणिसांचा अनुभव चिटणिसांना नसल्यामुळें, त्यांचा ग्रंथ महाराष्ट्रीय नीतिशास्राच्या परिशीलनाला फारसा पोषक होण्याचा संभव नाहीं. राजनीतिखेरीज समाजशास्राच्या दुस-या कोणत्याहि शाखेवर किंवा उपांगांवर मराठी ग्रंथरचना त्याकालीं झाली नाहीं.
६०. समाजयंत्र व राज्ययंत्र ह्यांच्यांसंबंधीं धर्मशास्त्रांतून व कामंदक्यादि नीतिशास्त्रांतून जी व्यवस्था सांगितलेली आहे, तीच कालदेशवर्तमानानुसार त्या कालीं मान्य समजली जात असे. पुरातन आर्यसमाजयंत्रांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशी चतुर्वर्णात्मक विभागणी असे, तिच्या ऐवजीं ब्राह्मण व शूद्र अशी द्विवर्णात्मक पद्धंति शक १२२२ पासून १५२२ पर्यंत मान्य समजूं जाऊं लागली. शेटे, महाजन, वगैरे वैश्य जाति यादवांच्या राज्यापासून महाराष्ट्रांतील ग्रामसंस्थांत व नगरसंस्थात चालू होत्याच. परंतु त्यांचा धंदा मारवाड व गुजराथ या दोन प्रांतांतील वाण्यांनीं, मुसुलमानी अमलांत आक्रमून टाकिला. त्यामुळें, महाराष्ट्रांतील शेटे, महाजन वगैरे लोक शेतीवर उदरनिर्वाह करूं लागले. महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीचें विवेचन करतांना, वैश्यजातींच्या धंद्यांत झालेल्या ह्या क्रांतीचा विचार करणें अत्यवश्यक आहे. मुसलमानी अमलांत क्षत्रियांचाहि धंदा लुप्त झाल्याकारणानें, तेहि लोक शेतीवरच निर्वाह करूं लागले आणि त्यांच्यापैकीं ब-याच कंगाल लोकांचा अंतर्भाव शूद्रादिवर्गांत चुकीनें व संकरानें होऊं लागला. ब्राह्मणांपैकीं ब-याच पोटजाती शूद्रादिकांचा व्यवहार करूं लागल्या आणि त्यांचाहि समाहार भ्रष्ट अथवा पतित ब्राह्मणांच्या वर्गांत होण्याचा प्रसंग जवळ येऊन ठेपला. अशा संकटसमयीं शहाजी व शिवाजी राजे भोसले आणि रामदास, दादोजी कोंडदेव, निळो सोनदेव, वगैरे क्षत्रिय व ब्राह्मण यांनी स्वधर्माचें म्हणजे स्वतःच्या कर्तव्याचें पुनरुजीवन करून महाराष्ट्रांतील चातुर्वर्ण्य बरेंच पुनरुज्जीवित केलें. समाजयंत्राचे पुरातन विभाग मुसुलमानीं अमलांत जे लुप्त होऊं पहात होते, ते पुन: उदयास आले आणि पुरातन धर्मशास्रांचा व व्यवहाराचा पुन: मेळ बसूं लागला. ह्या मेळाचा परिणाम असा झाला कीं, समाजयंत्र व राज्ययंत्र ह्यांच्यासंबंधींच्या पुरातन कल्पनाच त्या कालीं यथास्थित पटल्या गेल्या आणि नवीन धर्मग्रंथ मराठींत करण्याचें कारण पडलें नाहीं. कायद्याचे जे निरनिराळे विभाग आहेत, ते रूढि व शास्त्र ह्यांच्या पायांवर उभारले गेले आणि प्राचीन व अर्वाचीन समाजव्यवस्थेची एकवाक्यता झाली. शक ११०० पासून शक १७२२ पर्यंत महाराष्ट्रांतील कायदेपंडितांनीं शेंदीडशें धर्मप्रबंध त्या त्या स्थितीला व रूढीला अनुलक्षून पुरातन श्रुतिस्मृतींना न सोडतां रचिलेले आहेत. सारांश, समाजयंत्र व राजयंत्र यांना अनुलक्षून ११०० पासून शक १७२२ पर्यंत बराच ग्रंथसमूह संस्कृतांतून व मराठी पंचायतींतून झालेला आहे. ह्या विस्तृत व प्रचंड सारस्वताचें पृथक्करण व एकीकरण कुशल व विद्वान् कायदेपंडितांची व इतिहासज्ञांची प्रतीक्षा करीत आहे. धर्मग्रंथांचें व पंचायतीचें पृथक्करण व एककिरण झाल्यावांचून, महाराष्ट्रीय समाजयंत्राचीं गुह्यें नीट उलगडणार नाहींत.