२८. अखिल मानवसमाजाच्या इतिहासाचें वास्तवरूप कोणतें ह्या प्रश्नाचा उलगडा करतां करतां जग, विश्व, World, Universe, वगैरे शब्द योजावे लागले आहेत. परंतु, ज्या अर्थाच्या विवक्षेनें हे शब्द योजिले, त्याची उपलब्धि व्हावी तशी ह्या शब्दांपासून होत नाहीं. History of the World किंवा History of the Universe ह्या वाक्यांतील World व Universe ह्या शब्दांचा अर्थ”अखिल मानवसमाज” असाच केवळ नाहीं. World या इंग्रजी शब्दाचा अर्थ आपण रहातों ती पृथ्वी किंवा संपूर्ण ब्रह्मांड असाहि आहे. Universe ह्या शब्दाचाहि असाच व्यापक अर्थ आहे. History of the World किंवा Universe लिहूं पहाणा-यांच्या मनांत पृथ्वीचा किंवा ब्रह्मांडाचा इतिहास लिहिण्याचा काहीं विचार नसतो; फक्त पृथ्वीवरील मनुष्यजातीचाच तेवढा इतिहास लिहिण्याचा आशय असतो. World म्हणजे मनुष्यकोटी असाहि एक अर्थ होतो; परंतु त्याच्याबरोबरच ब्रह्मांडाचीहि कल्पना मनांत उद्भवते. मराठींतील जग व विश्व, हेहि शब्द असेच भ्रामक आहेत. तेव्हां असले हे भ्रामक शब्द काढून टाकून, “जगाचा किंवा विश्वाचा इतिहास,” असे बडे बडे शब्द न योजतां “मानवेतिहास” असे सार्थ शब्द योजणें प्रशस्त दिसतें. ह्या योजनेनें पुष्कळ निरर्थक संदेह नाहींसे होतील. व इष्ट अर्थाला योग्य शब्द वापरल्यासारखें होईल. परंतु, बाब विशेष महत्त्वाची आहे, असें नाहीं.
२९. मानवेतिहासाचें वास्तव रूप निवडल्यावर तो लिहिण्याची सशास्त्र पद्धति कोणती, तें पहाणें ओघासच येतें. कारण, वेडावांकडा कां इतिहास होईना, तो कोणत्या तरी पद्धतीनें लिहिला पाहिजे, मग ग्रंथकर्त्याच्या मनांत पद्धतीचा स्फोट झाला असो किंवा नसो. अगदी गचाळ मानवेतिहास सोडून दिले व मान्य तेवढेच जमेस धरले, तर असें दिसून येतें कीं, व्यवस्थितपणें मानवेतिहास लिहिण्याच्या यूरोपियन लोकांच्या तीन पद्धति आहेत:- (१) कालानुक्रमिक पद्धति; (२) दैशिक पद्धति; व (३) कौलिक पद्धति. ऐतिहासिक कालाच्या प्रारंभापासून दरवर्षी किंवा दर शंभर वर्षात पृथ्वीवर काय काय वृत्तें घडलीं, त्यांची कालानुक्रमानें हकीकत देण्याची जी पद्धति तिला कालानुक्रमिक पद्धति म्हणतात. तोडून घेतलेल्या वर्षी किंवा वर्षसंख्येंत मानवसमाजाच्या निरनिराळ्या जातींनीं निरनिराळ्या देशांत काय उद्योग केला, तें कालानुक्रमानें सांगण्याचा ह्या पद्धतीचा हेतु असतो. परंतु घेतलेल्या वर्षसंख्येंत कित्येक जाती लोपून गेलेल्या असतात, कित्येक जातींचे उद्योग व उलाढाली अर्धवट संपलेल्या असतात व कित्येकांनीं देशान्तरें केलेलीं असतात. त्यामुळें होतें काय कीं, कित्येक जातींचे वृत्तांत मध्येंच कोठेंतरीं संपतात. कित्येकांचे मध्येंच सोडून द्यावे लागतात व कित्येकांचे धागे पुन: पुढल्या वर्षसंख्येंत धरणें प्राप्त होतें. वारंवार असेंहि होतें कीं, एका काळीं मानवसमाजाचीं चळवळ मूळचीच फार थोडी असल्यामुळें किंवा तिची माहितीच थोडी असल्यामुळें, लिहावयाला मुळींच हकीकत नसते; किंवा असलीच तर अतिच थोडी असते. उलट कधीं कधीं असाहि प्रसंग येतो कीं, शेंकडो जातींच्या एकाच काळीं हालचाली सुरू होतात व त्यांच्या हकीकतीची व्यवस्था लावतां लावतां पुरेपुरेसें होतें. कालानुक्रमिक पद्धतींत हा असा गोंधळ माजत असल्याकारणानें मानवेतिहासलेखनाला ती फारशी प्रशस्त नाहीं दैशिकपद्धतींत देखील असेच दोष आहेत. वस्तुत: पहातां देश म्हणून देशांना असा इतिहास मुळींच नसतो. पृथ्वीच्या पाठीवरील निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या जातींनीं शेंकडों वर्षे कायमची वस्ती केल्यावर तत्तज्जातिविशिष्ट देशांचा म्हणजे त्या देशांतील लोकांचा इतिहास लिहिण्याची शक्यता उत्पन्न होते. प्रलयाच्या अलीकडील प्राचीन काळीं अमुक देश अमक्याचा अशी व्यवस्था नसल्यामुळें किंवा माहीत नसल्यामुळें कधीं कधीं अनेक प्रांत सोडून देणें भाग पडतें व अर्वाचीन काळाच्या जसजसें जवळ येत जावें, तसतशी प्रत्येक देशाची माहिती फुगत जाते. शिवाय, एकाच देशांत एकापाठीमागून एक अशा अनेक लोकांचीं राज्यें होत जात असल्यामुळें, दैशिक पद्धतीनें हकीकतीचा धागा सुसंगत रहात नाहीं.