२५. वरील संक्षिप्त विवेचनावरून इतकें स्पष्ट आहे कीं, मानवसमाजाची हकीकत देतांना, संस्थांचें किंवा कृत्यांचे अधमोत्तमत्व ठरविण्याला स्थिरमान असूं शकत नाहीं. असूं शकतें, असें म्हणणें म्हणजे एका पूर्वग्रहांचाच आश्रय करणें आहे. आणि पूर्वग्रहाचा आश्रय करणें म्हणजे इतिहासाच्या सशास्त्र परिशीलनाला सर्वस्वी घातक आहे. बरें, वाईट; शुभ, अशुभ; वगैरे नीतिशास्त्रांतले जे अर्थ आहेत, ते गृहीत करून ऐतिहासिक प्रसंगांची, समाजांची व संस्थांची परीक्षा करणें, म्हणजे ठरीव नीतिशास्त्रांतल्या अर्थाच्या पलीकडे जाण्यांत मानवसमाजाला अटकाव करण्यासारखेंच आहे. तेव्हां इतिहासाचें परिशीलन करतांना, ह्या नैतिक पूर्वग्रहांना बिल्कुल रजा दिली पाहिजे. अशी रजा दिली म्हणजे स्वमतप्रदर्शन हे शब्द जगाच्या इतिहासांतून विसरून जावे लागतात, आणि History is the record of progress alone हें वाक्य निरर्थकतेच्या धुक्यांत विरून जातें. तात्पर्य, प्रगति झालेली आहे किंवा अधोगति झालेली आहे, हें पहाण्याचें काम नीतिशास्त्राचें आहे; इतिहासाचें नाही. शुभ, अशुभ; ब-या, वाईट; प्रगत, अधोगत अर्थाची जर इतिहास निवड करूं लागेल, तर त्याला नीतीतिहास असें नांव द्यावें लागेल. हानीची गोष्ट आहे कीं, असल्याच इतिहासांची बहुतेक सर्व भाषांत रेलचेल आहे.
२६. सूक्ष्मतेनें पहातां, निर्मेळ इतिहास म्हणून ज्याला म्हणतां येईल, त्याचें काम फक्त झालेल्या प्रसंगांची विश्वसनीय हकीकत देण्याचें आहे. कालाचें पौर्वापर्य लावून व प्रसंगाचें कार्यकारणत्व सिद्ध करून, भूत गोष्टी अशा अशा सातत्यानें झाल्या, इतकें सांगितलें म्हणजे इतिहासाची कामगिरी आटोपली. भूत गोष्टींचें कथन करतांना, नीतिदृष्ट्या ज्यांना आपण दुर्गुण म्हणतों त्या क्रौर्य, कौटिल्य वगैरे गुणांच्या जोरावर लढवय्ये लोक अल्पकालीन साम्राज्यें उभारतांना सांपडोत किंवा ज्यांना आपण सुगुण म्हणतों त्या दया, क्षमा, शांति वगैरे गुणांच्या जोरावर साधुपुरुष सनातनधर्माचें अनंतकालीन राज्य स्थापितांना आढळोत, इतिहासाचें काम आवडनिवड किंवा स्तुतिनिंदा न करतां, झाली गोष्ट जशीची तशी नमूद करून ठेवण्याचें आहे, न जाणों, ज्यांना एके काळी दुर्गुण म्हणून लोक समजतात, त्यांनाच पुढेंमागें ते सुगुण म्हणून कशावरून समजणार नाहीत? आज जो साधु दिसला, तो कालान्तरानें भोंदू ठरलेला, लोकांनीं पाहिलेला आहे; आणि क्रौर्याला शौर्य व कौटिल्याला मुत्सद्देगिरी हीं नामांतरें मिळालेलीं आहेत! असें सांगतात कीं, पूर्वीच्या एका राज्यांत, वादीप्रतिवाद्यांच्या खटल्याची हकीकत---जशी घडली असेल तशी---नमूद करून, तिचा स्पष्ट, मुद्देसूद व विश्वसनीय सारांश देण्याचें काम एका कामगाराकडे असे, आणि तो सारांश पाहून नीति व धर्मशास्रांच्या आधारें, शिक्षा ठोठावण्याचें काम दुस-याच एका अधिका-याकडे सोंपविलेलें असे. तसाच कर्मविभाग इतिहासाचा व नीतिशास्त्राचा आहे इतिहास भूतवृत्ताचा विश्वसनीय सारांश देतो व नीतिशास्त्र त्याचें उत्तमाधमत्त्व ठरवितें. इतिहासाचें खरें रूप म्हणतात तें हेंच. पीनलकोड ज्या वर्तनाला आज गुन्ह्यांत काढतें, त्यालाच शंभर वर्षांनीं पुढें सदगुण समजतें. नि:पक्षपातानें काढिलेला सारांश मात्र, यावच्चंद्रदिवाकरौ अजरामर राहतो.