देव वर्णानें गोरे असून त्यांच्या मानानें हे दनु, रक्षस् वगैरे आचारहीन लोक घामट, मलिन व काळे होते. ऋक्संहितेंत असुरांचाहि उल्लेख आहे. हे असुर म्हणजे निनेवे येथें पुढें ज्यांनीं इ.स. पूर्वी १५०० वर्षांच्या सुमारास राज्य स्थापिलें तेच होत ह्यांचा पूर्वेतिहास अद्याप सांपडला नाहीं. परंतु, हे लोक युद्धप्रिय, कज्जेदलाल व रात्रीचे छापे घालणारे होते, असें जें ऋग्वेदांत म्हटलें आहे तें त्यांच्या पुढील इतिहासावरूनहि संस्थापित होतें. इर्य अथवा ऐर्याण लोक आर्यांच्या अगदी शेजारींच उत्तरध्रुवापाशीं असावें. त्याचें आणि आर्यांचेंहि पूर्वीपासून वितुष्ट होतें, तें इतकें कीं, देव म्हणजे दुष्ट व असुर म्हणजे सुष्ट, असें मानण्यापर्यंत ह्यांची पुढें पुढें मजल गेली होती. पूर्वप्रलयीन काली आर्यांच्या शेजाराला असणारे व आर्यसंस्कृतीचा जबरदस्त छाप बसलेले असे हे दनु, दस्यु, रक्षस्, यातु, अहि, नराशंस, ऐर्याण व असुर लोक असावे. देवांची भाषा यांनीं बरीच उंचललेली दिसते. परंतु जातीनें, आचारानें व धर्मानें हे सर्व लोंक देवांच्याहून निराळे दिसतात. अर्थात् आर्यकुळांत यांची गणना करणें सयुत्किक नाहीं. Deutsche, Russie, Juts, Angle, Norse ऐर्याण व Assur यांच्या ऐतिहासिक व्युत्पत्त्याहि त्या त्या भाषांत समाधानकारक दिलेल्या आढळत नाहींत. ऋग्वेदांतील दनु वगैरे शब्दांवरून त्या ब-याच समाधानकारक त-हेनें लागतात, असें दिसतें. सारांश, ह्या लोकांची अनार्यात गणना करणें जास्त प्रशस्त आहे.
२२. युरोपीयन इतिहासकारांना आणीक एक मोठी विलक्षण खोड आहे. ती ही कीं, पुरातन व उत्तम असें जें जें कांहीं आढळेल, त्यांशीं आपल्या समाजाचा कांहींतरी बादरायण संबंध लावण्याची ते हांव धरतात. ग्रीस देशाच्या इतिहासापलीकडे जोंपर्यंत त्यांची माहिती गेली नव्हती, तोंपर्यंत ट्रॉय शहराशीं आपला संबंध लावून, हेलन नामक स्त्रीचें आपण वंशज आहों, असें प्रतिपादन करण्यांत त्यांना फुशारकी वाटे. कांहीं काळपर्यंत यहुदी लोकांना ते आपले पूर्वज मानीत. आणि अलीकडे संस्कृत भाषेशीं परिचय झाल्यापासून ते आपली गणना आर्यकुळांत करूं लागले आहेत. आर्यकुळाला सोडून, आपली स्थापना स्वतंत्ररीतीनें करूं पहाण्याचीहि कित्येकांची थोडथोडी प्रवृत्ति होत चालल्याचीं चिन्हें अलीकडे दिसूं लागलीं आहेत. ह्या बादरायण पद्धतीचा परिणाम असा होतो कीं, दर दहा वर्षांनीं त्यांचे ऐतिहासिक सिद्धान्त बदलत असतात. सारांश सत्यापेक्षां, स्वजातिगौरवाकडे या लोकांचें लक्ष विशेष असतें. हा दोष कोणत्याहि देशांतील निर्लेप, इतिहासकारांनीं टाळला पाहिजे.
२३. ह्या चार दोषांहून निराळा असा एक दोष यूरोपीयन इतिहासकारांच्या लेखांतून दृष्टीस पडतो. भविष्यकालांत विशिष्ट प्रसंगांसंबंधानें काय होईल, याचें विशिष्ट भाकित करणें, इतिहासाच्या प्रांताबाहेरचें आहे; अशी प्रतिज्ञा करून, अधूनमधून तशीं भाकितें करण्याची आपली नैसर्गिक चटक ह्या लोकांना आवरतां येत नाहीं. यूरोपियन लोक सर्व पृथ्वी पादाक्रांत करणार, इतर समाज त्यांच्यापुढें नामशेष होणार, अशीं विशिष्ट विधानें यूरोपीयनांनी लिहिलेल्या कोणत्याहि समाजाच्या इतिहासांत हटकून सांपडतात. आतां, हें सांगावयाला नकोच कीं भविष्यकाळीं काय काय चमत्कार होतील, हें सांगू जाणें शुद्ध वेडेपण आहे. आपल्याला माहित नाहीत अशा प्रेरणा सध्यां इतक्या आहेत व पुढें इतक्या नव्या होण्याचा संभव आहे कीं, प्रस्तुतची कोणचीं हीं विशिष्ट भाकितें भविष्यकाळीं खरीं ठरण्यास फारच थोडी कूस राहते. तेव्हां, जगाचा इतिहास लिहूं जाणा-या इतिहासकारांनीं ह्या विशिष्ट भाकित करण्याच्या हांवेपासून अलग राहिल्याविना, निर्भेळ सत्य निष्पन्न होणें अत्यंत दुरापास्त आहे विशिष्ट भाकितें म्हणजे एकप्रकारचे आपल्याला संमत असे पूर्वग्रहच होत.