[ ६२० ]
श्री. कार्तिक शु॥ १ शके १६५४
० श्री ॅ
राजा शाहु नर-
पति हर्षनिधान
बाजीराव बलाळ मुख्य
प्रधान
मा। अनाम तेजकर्ण मंडलोई पा। इंदोर यासि बाजीराउ बलाळ प्रधान सु॥ सलास सलामीन मया अलफ. तुह्मी विनंतीपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें व जेठमल येथें आला. यांणी कितेक निवेदन केलें, त्याजवरून कळलें. ऐशास, तुह्मी एकनिष्ठ मातबर जमीदार, तुमचा गौर करावा हें जरूर. राजश्री मल्हारजी होळकर येथें आले होते. यांस तुमचेविशी कित्येक आज्ञा करणे ते केली आहे. ते तुमचा गौर करून रयत जागियावर खुशाल राहे तेच करितील. तुह्मी आपला खातरजमा असों देणें. पेशजीचे कमाविसदारानें परगणे मजकूरचे रयतीस तसदिया दिल्ह्या ह्मणोन कळलें. त्यास तो दूर करावा ह्मणोन मारनिल्हेस आज्ञा केली. त्यांणींहि तो कमावीसदार दूर केला आहे. याउपरि तुह्मी परगणे मजकूरचे रयतीचा दिलासा करून, रयत गेली असेल ते आणून, परगणियाची आबादानी करणें. हरएकविसी तुमचा गौर केला जाईल. जाणिजे. छ ३० रबिलाखर. आज्ञाप्रमाण.
लेखन
सीमा