[ ६०९ ]
श्री. शक १६५३ ज्येष्ठ वद्य ४
श्री ह्माळसाकांत
चरणी दृढभाव
होळकर मल्हार
राव
राजश्री नंदलाल मंडलोई पा। इंदूर गोसावी यांसि
अखंडिलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मलारजी होलकर दिमती राजश्री पंतप्रधान दंडवत सु॥ सन इसन्ने सलासीन मया अलफ. लिहिलें पत्र पाठविलें पावोन वर्तमान विदित जालें. लि॥ कीं पा। मजकुरी ताकीद करणें ह्मणोन लि॥, तरी ताकीद केली आहे. परंतु कोणी तुमचे अगोदर आलें नाही. त्यासी न कळत जाहलें, यासी उपाय नाही. मग राघोदास व मयाराम भेटले. ताकीद करविली- या कुळ माळवियांत तुमची प्रमाणीकता विश्वास, तुमचा आमचा घरोबा आणि तुह्मी बेइमानाची गोष्ट सांगावी, हें अपूर्व आहे ! पैकियाचा वसूल अद्याप झाडियानसी न दिल्हा यावरून काय ह्मणावें ? याउपरि पत्रदर्शनी पैकियाचा झाडा राजश्री नारो शंकर यापासीं करणें. आणि कोणेविसीं इमानांत अंतर न करणें. जाणिजे. छ १७ जिल्हेज. पैकियाचा झाडा न केला यास्तव राजश्री बापूजी बाजी पाठविले आहेत. तरी यांच्या विद्यमानें राजश्री नारोपंत यांसी ऐवज झाडा करणे. ऐसें न होय कीं इष्टत्वास अंतर पडेल. पैकियाच्या निशेचें वर्तमान नये तोंवरि मुकाम पडेल असें न करणें. सारांश गोष्टी स्नेहास अंतरता न होय तें करणें. काहीं कामकाजास राजश्री रामाराऊ गाडे पाठविले आहेत. तरी कार्य-भाग करून सत्वर पाठविणें. आणि पेशजी बुनंगे यांचे कबिले होते तेव्हां घोडी वगैरे वस्तभाव बारीच्या तोंडी गेली आहे ते पाठविणें. येविसीं बहुत लिहिणें नलगे. तुमचे जिभेची दि॥ देवास बाकी झाडियानसी देणे. उजूर न करणे. जाणिजे. रवाना छ १७ जिल्हेज. हे विनंति.
मोर्तब
सुद