[ ५७९ ]
श्री.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बापूजीपंत स्वामीचे सेवेसीः--
पोष्य गोविंद बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल, ता। श्रावण सुध ११ मु॥ नदी वेत्रवती जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. यानंतर आपण कृपा करून पत्र पाठवलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. त्यास, श्रीमंत स्वामींनी तुह्मांस लिहिलें की, वसूल गोविंदपंतांनीं तुह्मांकडे काय दिल्हा तो लेहून पाठवणें. तर आह्मी जो ऐवज दिल्हा तो तुह्माकडेच भरणा केला. परभारें आह्मी वजिराकडे केला नाही. श्रीमंत राजश्री दादा स्वामीकडे व तुह्माकडे केला. त्याचा तपसीलवार हिसेब उतरून पाठविला आहे. व प्रगणे भुगाव येथील भरणा लाख रुपये तुह्माकडे केला. त्याचाही तपसील पाठविला आहे. हिसोबावरून सर्व ध्यानात येईल. वरकड आपण लिहितात कीं, वजीर रु॥ मागतो. तर श्रीमंत स्वामीनीं जागा आपले सरकारी ठेविली तर आह्मी काय करावें ? श्रीमंत राजश्री दादासाहेब व वजीर व तुह्मी एकत्र दिल्लीस वरसेभर होता. श्रीमंत राजश्री दादा स्वामीस विनंति करून बाकी अगर जागा सोडविली असती तर न होतें ? आह्मांस आपण लिहितात तर हे दरबदली श्रीमंत राजश्री दादा स्वामीजवळच करावी. त्यांचेप्रमाणे सर्व होईल. आह्मी आपले असो. सर्वदा पत्रीं सांभाळ करीत जावा. हिसोब पाठविला आहे याप्रमाणें रुजू पाहावा आणि उत्तर पाठवावें. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असों दीजे. हे विनंति.
राजश्री त्रिंबकपंत स्वामीस सां। नमस्कार. लि॥ परिसीजे. हिसोब पाठविला आहे. सर्व तुह्मी माहित आहा. रुजु पाहावें. उत्तर सविस्तर लिहिणें. बहुत काय लिहिणें लोभ असों दीजे हे विनंति.