[ ५७० ]
श्रीगणराज
चिरंजीव राजश्री गणपतराव बाबा यासी प्रतीः--
पुरुषोत्तम माहादेव व देवराव माहादेव अनेक आशीर्वाद उपरि येथील कुशल ता। छ २१ सफर मु॥ पुणें जाणोन स्वक्षेम लेखन करणें. यानंतर तुह्मांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाही, तर साकल्य लिहिणे. पूर्वी तीन च्यार पत्रे पाठविली आहेत, त्याजवरून कळले असेल. चांदोरीच्या पाटलाचा व राजश्री कृष्णराव गोविंद यांचा कर्जाचा लढा; त्याचा मजकूर लिहिला होता; त्याचे पत्नोत्तरी साकल्य लिहिले आहे. राजश्री व्यंकटभट जोगळेकर यांचे विचारें बंदोबस्त करून कर्तव्य ते करावें. येथील मजकूर तरः सिंदे होळकर यांची रवानगी दो चौ रोजांनी होणार. होळकराकडील कारभार राजश्री नारो गणेश यांजकडे सांगतात. राजश्री गंगाधर यशवंत यांचा खंड तीस लक्ष रुपये ठरला. मुक्तता शपथ घेऊन केली की, इजार. आपल्यापाशी द्रव्य न निघाल्यास दुप्पट देऊ. याप्रमाणें होऊन पुणियासी राहाणार राजश्री सदासिव रामचंद्र, राजश्री गोपाळराव गोविंद, यांचे विद्यमानें येऊन भेटले. अबरू मात्र संरक्षणार्थ माध्यस्थ गोपाळराव आले. वरकड बंदोबस्त कांहींच न जाला. पुढें होईल ते खरें. वरकड मंडळीचे खंड होतात. आपणास सुटका नाहीं. सख्ती बहुत आहे. दिल्लीस पत्रें क्रुद्धतेचीं जातात. संशय निघत नाहीं. वरकड पूर्वी साकल्य लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. श्री कृपा करील. चिंता न करणें. बहुत काय लिहिणें ? भेट होईल तो सुदिन ! हे आशीर्वाद.