[ ५६४ ]
श्री.
वेदमुहूर्ति राजश्री अपाभट काका स्वामीचे सेवेसी:--
विद्यार्थी नारो बाबाजी फडके कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील क्षेम ता। छ १६ जावल मु॥ पुणें वर्तमान यथास्थित जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. राजश्री बापूजी माहादेव हिंगणे याचे गांवचा एकसाल ऐवज सरकारांत घ्यावयाचा करार करून मारनिल्हे याचे नावें वरात जाहाली आहे. त्यास, यांणी ऐवज न दिल्यास गांवची जप्ती करून ऐवज घेणें, ह्मणोन आमचे नावें सनद आहे. त्यास, हाली हिंगणे यांचे कारकुनांनी सरकारांत विनंति करून भाद्रपदअखेर निमे ऐवज, व कार्तिकअखेर निमे, याप्रो। दोहो हप्त्यांनी झाडून वरातेप्रमाणें ऐवज देतों, ह्मणून कबूल केलें आहे. याजकरितां आपणास हें पत्र लिहिलें आहे. तरी हपता भरे, तोंपावेतों त्यास ऐवजाविसीं निकड न करावी. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दिल्हा पाहिजे. हे विनंति.