[ ५६३ ]
श्री.
राजश्री बापूजी महादेव पुरुषोत्तम महादेव गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने॥ मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जावें. विशेष. तुह्मी छ १ माहे रा॥खरची पत्रें पाठविलीं, ती छ ११ माहे मिनहूस प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. दिल्लीकडील नजिबखान, व याकुब अल्लीखान, व ठाकूर सुरजमल, व सुजाअत दौले, व शाहाजादे वगैरेचें वृत्त तपशिलें लेखन केलें, व रायाची पत्रें पाठविलीं, ती पावून सविस्तर अवगत जालें. इकडील वर्तमान तरः माधोसिंगांनी बदफैली आरंभिली; नेणवियास फौज पाठवून मोर्चे लाविले; व कांहीं फौज माळवियांत रवाना केली, ती पाटणास आली. पुढें येऊन धूम करावी हा प्रकार योजिला. याचें पारपत्य करणें जरूर; याजकरितां, फौजेची संचणी करून, इंदुरीहून कूच करून, दरमजल मुकुंदवारीनजीक स्वारी आली. पुढें दरकूच जात असों. माधोसिंग उन्हरियाहून माघारा रणथंबोरीस गेला. पाटणीं फौज आहे. त्याचें पारपत्य करून, बंदोबस्त करून पुढें उपयोगीं कर्तव्य तें केलें जाईल. देशी निजामअल्लीनें बिघाड केला. बेदरावर आहे. श्रीमंत राजश्री दादासाहेब अमदानगरावर आहेत. फौज जमा जाली; आणि होती. मागे मोगलांवर जातात. सत्वर पारपत्य करितील, अगाध नाहीं. पैदरपै पत्रें पाठवून त्या प्रांतीचें सविस्तर वृत्त वरचेवर लिहीत जाणे. दिलारायाच्या पत्राचें उत्तर पाठविलें आहे. जाणिजे छ १५ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.