[ ५५७ ]
श्री.
पौ। छ २४ रबिलावल.
राजश्री दामोदर माहादेऊ गोसावी यासीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्नो। मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणें. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट जालें. लिहिलें कीं, श्रीमंत राजश्री दादा गणमुक्तेश्वराकडे गेले; आणि आपण रेवडी प्रांतें मुकाम केले; आणि आपली फौज खानखानाचे कार्याकरितां यथें आली; याजमुळें, वजीर पैका द्यावयासी गईगुदर करितात, ह्मणोन तपशीलें लिहिलें. ऐसियासी, श्रीमंत गणमुक्तेश्वरास गेले, त्या मजकुरांत तुह्मीच होतां. खानखानास लाहोरास पोहोचविण्याकरितां फौज द्यावी, या इत्यर्थांत तुह्मीच आहां. त्याजला लाहोरास पोचावयासी तुह्मीच आहां. हे सर्व मजकूर तुमच्याच विद्यमानाचे आहेत. वजीर पैका देतीलच. ते अनमान करितील, तरी तुह्मीच त्याजकडून देवाल, येअर्थी संदेह नाहीं. आह्माकडील मजकूर तरी आह्मी कूच करून पुढें जात असों. आमचे मुकामाची येथें कांहीं गुंता नाहीं. सत्वरीच कूच करून जात असों. वजिरांनी आमचा पैका न द्यावासा काय आहे ? तुह्मांवेगळा मजकूर कोणता जाला आहे ? सर्व कारभार तुमचेच विद्यमानाचा आहे. वजिरास ताकीद करून, ऐवज येसा तुह्मीच कराल. येविसीं सर्वप्रकारें तुमचा भरवसा आहे. रा। छ २२ रा।वल. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. ( मोर्तबसूद )
श्रीह्माळसाकांत चरणीं तत्पर
खंडोजीसुत ह्मल्हारजी होळकर