[ ५४४ ]
श्री.
श्रीह्माळसाकांतचरणीं तत्पर,
खंडोजीसुत मल्हारजी होळकर.
राजश्री दामोदर महादेव गोसावी यांसीः--
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष. वैजनाथ, व हरहंसलवचंद्रसेन इटावेकर सावकार याजकडे, नवाब वजीर याची कांहीं मामलत आहे, ह्मणून, वजिराकडील सज्यावल इटावियांत सावकार मजकुराच्या घरावर बसले आहेत. त्यास, सावकाराचे गुमास्ते -- कसराव नवाबाच्या लश्करांत मामलियाचा निर्गम करावयास आले आहेत. तर, त्याजला राहावयास तुह्मी आपल्या डेर्यापासी जागा देऊन, वजिरास अर्ज करून, सावकारमजकुराच्या मामलतीचा निर्गम करून देवणें; आणि, इटावियांत नबाबाचे सज्यावल बसले आहेत, त्यांजला उठवून नेवणें. सावकाराच्या कार्याविशई नवाब वजिरासहि पत्र लिहिलें आहे; तें तुह्मी आपल्या विद्यमानें देऊन कार्याचा निर्गम करून घेणें. सावकाराचें अगत्य धरून कार्य करणें. छ २३ शवाल. * बहुत काय लिहिणें ? हे विनंति.
( मोर्तबसुद)